संतोष प्रधान

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या निधनाने देशातील वयोवृद्ध आणि ज्येष्ठ राजकारणी काळाच्या पडद्याआड गेला. वयाच्या २०व्या वर्षी सरंपचपद भूषविलेल्या बादल यांनी सात दशकांच्या राजकीय कारकिर्दीत पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्रीपद तसेच केंद्रात मंत्रिपद भूषविले आहे. सुमारे १९ वर्षे बादल यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले होते. दहा वेळा विधानसभेवर निवडून आलेले बादल गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. मात्र देशात एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषविण्याचा मान बादल यांच्याकडे जात नाही. मग असे विक्रमवीर मुख्यमंत्री कोण?

प्रकाशसिंग बादल किती वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले होते?

प्रकाशसिंह बादल यांनी १९७० ते १९७१, १९७७ ते ८०, १९९७ ते २००२, २००७ ते २०१७ अशी एकूण १९ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. याशिवाय १९७२ ते १९७७, १९८० ते ८३ आणि २००२ ते २००७ या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले होते. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाच्या सरकारमध्ये त्यांनी कृषिमंत्रिपदही सांभाळले होते.

आणखी वाचा- विश्लेषण : प्रकाशसिंग बादल : देशहित जपणारा समन्वयवादी राजकारणी!

देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद कोणी भूषविले आहे?

तो मान सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांच्याकडे जातो. त्यांनी सर्वाधिक म्हणजे २४ वर्षे १६६ दिवस मुख्यमंत्रीपद भूषविले होते. चामलिंग हे सिक्कीम डेमॉक्रेटिक पक्षाचे सर्वेसर्वा होते. १९९४पासून २०१९पर्यंत ते मुख्यमंत्रीपदावर होते. १९९४, १९९९, २००४, २००९ आणि २०१४च्या विधानसभा निवडणुकांमध्ये चामलिंग यांच्या पक्षाला बहुमत मिळाले होते. २००९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने सर्व ३२ जागा जिंकल्या होत्या. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ३२ सदस्यीय विधानसभेत चामलिंग यांच्या पक्षाचे १५ आमदार निवडून आले होते. थोड्याच दिवसांत १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर अन्य चार आमदारही अन्य पक्षांमध्ये गेले. परिणामी चामलिंग हे एकवेम आमदार पक्षात शिल्लक राहिले. पक्षात फूट पडल्याने त्यांचे विरोधी पक्षनेतेपदही गेले.

जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषविलेले अन्य मुख्यमंत्री कोण आहेत?

पश्चिम बंगालचे ज्योती बसू यांनी २३ वर्षे १३८ दिवस मुख्यमंत्रीपद भूषविले होते. बसू यांचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा विक्रम सिक्कीमचे चामलिंग यांनी मोडला होता. बसू आणि चामलिंग या दोघांनीही लागोपाठ पाच विधानसभा निवडणुकांमध्ये विजय संपादन केला होता. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे गेले २३ वर्षे मुख्यमंत्रीपदी आहेत. अजून दोन वर्षे मुख्यमंत्रीपद कायम राहिल्यास देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा विक्रम पटनायक यांच्या नावे होऊ शकेल. गोगांग अपांग (अरुणाचल प्रदेश – २२ वर्षे २५० दिवस), लालथनवाला (मिझोराम – २२ वर्षे ६० दिवस), वीरभद्र सिंह (हिमाचल प्रदेश – २१ वर्षे), माणिक सरकार (त्रिपुरा – २० वर्षे), एम. करुणानिधी (तमिळनाडू – १८ वर्षे ३६२ दिवस), प्रकाशसिंग बादल (पंजाब – १८ वर्षे ३५० दिवस), यशवंतसिंह परमार (हिमाचल प्रदेश – १८ वर्षे ८३ दिवस), श्रीकृष्ण सिंन्हा (बिहार – १७ वर्षे ), नितीशकुमार (बिहार – १६ वर्षे) यांनीही दीर्घ काळ हे पद भूषवले.

महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदावर कोण होते?

राज्यात वसंतराव नाईक यांनी सर्वाधिक ११ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. त्यानंतर विलासराव देशमुख यांनी आठ वर्षांपेक्षा अधिक तर शरद पवार यांनी सात वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.

santosh.pradhan@expressindia.com

Story img Loader