Akhada tradition in Kumbh Mela: कुंभमेळा धार्मिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्वच अनुषंगाने महत्त्वाचा ठरत आहे. पापक्षालनासाठी प्रयागच्या संगमावर होणाऱ्या गर्दीत उठून दिसणारा संच म्हणजे साधूंचा. सध्या कुंभमेळ्याच्या विस्तीर्ण मैदानावर कोणी विधी करत आहेत, तर कोणी योग साधनेचे प्रदर्शन, तर कोणी ध्यानसाधनेत मग्न आहेत, तर कोणी अनुयायांना दीक्षा देत आहेत. अलीकडेच माजी अभिनेत्री ममता कुलकर्णीने घेतलेल्या किन्नर आखाड्याच्या दीक्षेनंतर कुंभमेळ्यातील आखाडे पुन्हा एकदा विशेष चर्चेत आले आहेत. या आखाड्यांचा प्रभाव प्रचंड आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे आखाडे नेमके काय आहेत? ते कसे अस्तित्त्वात आले? आणि ते का महत्त्वाचे ठरत आहेत याचा घेतलेला हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आखाड्यांचे रहस्य

आखाडा किंवा आखाडे हा शब्द मूळतः कुस्ती आणि अन्य क्रीडा प्रकारांसाठी असलेल्या शारीरिक व्यायामशाळांशी संबंधित आहे. मात्र, कुंभमेळ्याच्या संदर्भात याचा अर्थ भिन्न आहे. येथे हा शब्द १३ पारंपरिक साधू संप्रदायांचे प्रतिनिधित्व करतो. Divine Kumbh: Echoes of Eternity: Ganga, Shipra, Godavari, and Sangam या पुस्तकात पत्रकार आणि लेखक दीपक कुमार सेन यांनी प्रत्येक आखाड्याचे व्यवस्थित वर्णन केले आहे. हे आखाडे आठ ‘दाव्यां’मध्ये (विभाग) आणि ५२ ‘मरह्यां’ (केंद्रे) मध्ये विभागले जातात. तर प्रत्येकाचे विभागाचे नेतृत्व महंत (प्रमुख) करतात. आखाड्यांचा उगम नक्की कधी झाला याचा शोध घेताना आदी शंकराचार्यांचा संदर्भ दिला जातो. त्यांनी संन्याशांना एकत्र करून आखाड्यांची स्थापना केल्याचे मानले जाते. तर काही अभ्यासक हे आखाडे नैसर्गिकरित्या विकसित झाल्याचे मानतात. संन्यासी समुदायांनी स्वतःच्या संघटना आणि रचना निर्माण करण्यास सुरुवात केल्यावर या आखाड्यांची निर्मिती झाल्याचे ते मानतात.

फक्त साधू नाही तर व्यापारी

ब्रिटिशपूर्व कालखंडात महाकुंभातील साधू केवळ धार्मिक वर्चस्वासाठी प्रसिद्ध नव्हते. तर, सोनं, रेशीम आणि मसाले यांसारख्या वस्तूंच्या व्यापारात गुंतलेले होते. त्यामुळे कुंभमेळा हे केवळ तीर्थाटनाचे स्थळं नव्हते, तर महत्त्वाची बाजारपेठ असल्याचे इतिहासकार कामा मॅक्लीन यांनी म्हटले आहे. किंबहुना १८ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत अनेक आखाडे योद्ध्यांप्रमाणे कार्यरत होते. आधुनिक कालखंडात त्यांनी आपली व्यावसायिक आणि योध्याची भूमिका सोडलेली असली तरी त्यांचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रभाव आजही टिकून आहे.

शैव, वैष्णव, उदासीन आणि शीख

या साधूंचे १३ आखाडे शैव, वैष्णव, उदासीन आणि शीख अशा चार प्रमुख गटांमध्ये विभागले जातात. शैव आणि वैष्णव यांच्या अनुक्रमे शिव आणि विष्णू या उपास्य देवता आहेत. नित्यनंद मिश्रा यांनी आपल्या कुंभ: द ट्रॅडिशनली मॉडर्न मेळा या पुस्तकात उदासीन आखाड्यांचे निष्पक्ष (तटस्थ) प्रवृत्तीचे म्हणून वर्णन केले आहे, तर शीख आखाडा शीख धर्माच्या शिकवणीचे अनुसरण करतो. मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार १३ आखाड्यांपैकी ७ शैव, ३ वैष्णव, २ उदासीन आणि १ शीख आखाडा आहे. शैव आखाड्यातील साधू कपाळावर त्रिपुंड्र धारण करतात. हे आखाडे विशिष्ट अनुक्रमाने मिरवणूक काढतात. महानिर्वाणी आखाडा आणि अटाळा आखाडा आघाडीवर असतात. त्यानंतर निरंजनी आखाडा आणि आनंद आखाडा असतात. शेवटी जुना आखाडा असतो. त्याच्या बरोबर अवाहन आणि अग्नि आखाडे असतात.

अटाळा आखाड्याचा विशेष

अटाळा आखाडा हा सर्वात प्राचीन आखाड्यांपैकी एक मानला जातो आणि इसवी सन ७ व्या शतकात त्याची स्थापना झाल्याचे मानले जाते. या आखाड्याचे मुख्य केंद्र वाराणसी येथे असून प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैनसह संपूर्ण भारतभर त्याची केंद्रे आहेत. ऐतिहासिक संदर्भानुसार हा आखाडा केवळ तीन उच्च वर्णांतील (ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य) पुरुषांनाच प्रवेश देत असे, त्यामुळे तो तुलनेने लहान राहिला आहे. २०१६ पर्यंत यामध्ये सुमारे ५०० साधू होते.

जुना आखाडा

याउलट जुना आखाडा हा सर्वात मोठा आखाडा असून त्यामध्ये सुमारे ५ लाख साधू आहेत. तो केवळ सर्वात मोठाच नव्हे, तर सर्वात जुना आखाडा मानला जातो. त्याच्या अनेक उपशाखा आणि केंद्रे संपूर्ण भारतभर पसरलेली आहेत. इतिहासकार कामा मॅक्लीन त्यांच्या “Seeing, Being Seen, and Not Being Seen: Pilgrimage, Tourism, and Layers of Looking at the Kumbh Mela” या लेखात नमूद करतात की, जुना आखाडा माध्यमांबरोबर चतुराईने संवाद साधतो. त्यांनी छायाचित्रकार आणि पत्रकारांबरोबर विशेष हक्क निश्चित करण्यासाठी करार केले आहेत.

वैष्णव आखाडे आणि त्यांची परंपरा

वैष्णव आखाड्यांचा उगम १८ व्या शतकात झाला. सुरुवातीला हे सात आखाड्यांचे संघटन होते, परंतु नंतर त्यांची निरवाणी, दिगंबर आणि निर्मोही अशा तीन प्रमुख आखाड्यांमध्ये पुनर्रचना करण्यात आली. प्रत्येक वैष्णव आखाड्याच्या ध्वजावर हनुमानाची प्रतिमा असते. हे आखाडे शैव अखाड्यांनंतर स्नान मिरवणुकीत सहभागी होतात. निरवाणी आखाडा विशेषतः शरीराच्या बळकटीवर जोर देणारा आहे. दिगंबर आखाडा हा सर्वात मोठा वैष्णव आखाडा आहे. ज्यामध्ये ४५० शाखांमध्ये दोन लाखांहून अधिक साधू आहेत. हा आखाडा सीता, राम आणि हनुमान यांची उपासना करतो.

निर्मोही आखाड्याची भूमिका आणि उदासीन आखाड्यांची वैशिष्ट्ये

निर्मोही आखाडा वैष्णव परंपरा जपण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. सेन यांनी म्हटले आहे की, प्रत्येक वैष्णव आखाड्याचे साधू विशिष्ट रंगांचे वस्त्र परिधान करतात आणि ओळखचिन्हे (निशाण) लावतात. निर्मोही अखाड्याचे निशाण पिवळ्या रंगाचे असते. दिगंबर आखाड्याचे निशाण मिश्रित (मोत्याच्या रंगाचे) असते. निरवाणी आखाड्याचे निशाण चंदेरी रंगाचे असते.

उदासीन आखाड्यांचा तटस्थ दृष्टिकोन

मिश्रा यांनी म्हटले आहे की, उदासीन साधू हे शैव, वैष्णव किंवा शीख संप्रदायांशी पूर्णतः संलग्न नाहीत. शीख धर्मीयांमध्ये तीन उदासीन आखाडे आहेत, जे गुरु नानक यांच्या शिकवणीचे पालन करतात आणि शीख धर्मग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहिब’ प्रमाण मानतात. हे उदासीन आखाडे बडा (मोठा) उदासीन आखाडा आणि नया (नवीन) उदासीन आखाडा अशा दोन प्रमुख गटांत विभागले जातात. ते यज्ञात मद्य अर्पण करतात. मिश्रा लिहितात की, हे आखाडे अनाथांसह लहान मुलांना नागा साधू म्हणून दीक्षा देण्याची प्रथा देखील पाळतात.

शीख आखाडा आणि किन्नर आखाड्याची नव्याने होणारी ओळख

शीख आखाडा हा निर्मला आखाडा म्हणूनही ओळखला जातो. स्नान मिरवणुकीत ते शेवटी सहभागी होतात. हरिद्वारमधील कणखल येथे मुख्यालय असलेल्या या आखाड्यात सुमारे १५,००० साधू आहेत आणि त्याची केंद्रे संपूर्ण भारतभर पसरलेली आहेत. मिश्रा यांनी म्हटले आहे की, या आखाड्याचे साधू हिंदू आणि शीख धर्मग्रंथांचा सन्मान करतात. त्यामध्ये वेद, भगवद्गीता आणि उपनिषदे तसेच तसेच शीख धर्मग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहिब’ यांचा समावेश आहे.

किन्नर आखाड्याची कुंभमेळ्यात वाढती उपस्थिती

२०१९ पासून कुंभमेळ्यात ‘किन्नर आखाडा’ देखील महत्त्वाची भूमिका बजावू लागला आहे. हा १४ वा अखाडा विशेषतः तृतीयपंथीयांसाठी स्थापन करण्यात आला आणि मागील कुंभमेळ्यात त्याला मान्यता देण्यात आली. मात्र, दीपक कुमार सेन यांनी indianexpress.com ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘आखाडा परिषदेने’ (Akhara Parishad) या आखाड्याला अद्याप अधिकृत मान्यता दिलेली नाही.

स्पर्धा आणि संघर्ष

कुंभमेळा आध्यात्मिक एकतेचे प्रतीक मानला जात असला तरी तो आखाड्यांमधील तीव्र स्पर्धा आणि संघर्षांनीही भरलेला आहे. गेल्या काही शतकांपूर्वी हरिद्वार कुंभ हा आर्थिक आणि आध्यात्मिक वर्चस्वासाठीचे रणांगण होते. या महोत्सवावर नियंत्रण मिळवण्यासाठी साधू आखाडे स्पर्धा करत. जो आखाडा सर्वश्रेष्ठ ठरत असे त्याला प्रथम स्नानाचा मान मिळत असे. हे संघर्ष अनेकदा हिंसक चकमकींमध्ये बदलत असत आणि त्यामुळे ब्रिटिशांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं होत. शस्त्रांनी सज्ज असलेले आणि ब्रिटिश सत्तेविरोधात उठाव करू शकणारे संत हा त्यांच्या दृष्टीने मोठा धोका होता.

१७६० च्या हरिद्वार कुंभमेळ्यात प्रथम स्नान करण्याच्या अधिकारावरून उग्र संघर्ष उफाळून आला होता. १८०८ साली कॅप्टन रेपर यांनी लिहिलेल्या नोंदींनुसार या संघर्षात तब्बल १८,००० साधू (बहुतेक वैष्णव) ठार मारले गेले. मात्र, मिश्रा यांनी हा आकडा अतिशयोक्त असू शकतो असे मत मांडले आहे. १७९६ साली हरिद्वारच्या कुंभमेळ्यात देखील अशाच स्वरूपाचा संघर्ष झाला होता. शैव साधू आणि निर्मला शीख यांच्यातील संघर्षात सुमारे ५०० जणांचा मृत्यू झाला. ब्रिटिशांनी या प्रतिस्पर्धांना नियंत्रित करण्यासाठी १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात एक नियमन प्रणाली तयार केली. ज्यात सर्वात शक्तिशाली आखाड्यांना प्रथम स्नान करण्याचा अधिकार देण्यात आला. आजही आखाड्यांमधील तणाव मिरवणुकांच्या भव्यतेवर, झेंड्यांच्या संख्येवर आणि विधी कसे पार पडतात यावरून दिसून येतो. सेन यांनी म्हटले आहे की, सध्या आखाडा परिषद ठरवते की, कोणत्या अखाड्याला सर्वप्रथम गंगास्नान करण्याची संधी मिळेल. मोठे आखाडे सहसा प्रथम प्रवेश करतात.

नागा साधूंच्या प्रथेबाबत ब्रिटिशांच्या अडचणी

नागा साधूंच्या नग्नतेचा मुद्दा देखील इतिहासात वादाचा विषय ठरला होता. १८४० साली ब्रिटिशांनी ‘सार्वजनिक शालीनता’ जपण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून नग्नता बेकायदेशीर ठरवली. मात्र, कुंभमेळ्याच्या पावित्र्यामुळे ब्रिटिश प्रशासनासाठी हा मुद्दा गोंधळाचा ठरला. मॅक्लीन यांच्या मते, ब्रिटिश वर्तमानपत्रे आणि मिशनरींनी नग्न मिरवणुकींवर बंदी आणण्याची मागणी वेळोवेळी केली होती. परंतु, प्रशासनाने ती दुर्लक्षित केली. त्यांनी धार्मिक परंपरांवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा गर्दी व्यवस्थापन आणि स्वच्छता राखण्यास प्राधान्य दिले.

आखाड्यांच्या धार्मिक विधींचे महत्त्व

कुंभमेळा अधिकृतपणे सुरू होण्यापूर्वी आखाड्यांचे शहरात आगमन ‘पेशवाई’ नावाच्या भव्य मिरवणुकीने होत असते. मिश्रा आपल्या पुस्तकात लिहितात की, पेशवाई हे शहरातील रहिवाशांना आणि यात्रेकरूंना साधूंचे कुंभमेळ्यात स्वागत करण्यासाठीचे एक विशेष निमित्त असते. परंपरेनुसार साधू सहसा दिवसातून फक्त एकदाच जेवण करतात. ते पेशवाई मिरवणुकीपूर्वी खिचडी ग्रहण करतात. या मिरवणुकीत साधू घोडे आणि हत्तींबरोबर मिरवणुकीत सहभागी होतात. तर, वाद्यवृंद उत्साहपूर्ण संगीत वाजवतात. आखाड्यांचे श्री महंत भव्य सजवलेल्या रथांमध्ये बसलेले असतात. नागा साधू काठी, तलवारी आणि भाल्यांच्या सहाय्याने कुशल कसरती आणि युद्धकलेचे प्रदर्शन करतात, जेणेकरून उपस्थित जनसमूह मंत्रमुग्ध होतो. स्थानिक रहिवासी आणि यात्रेकरू साधूंवर फुलांची उधळण करतात आणि त्यांना हार अर्पण करतात.

कुंभमेळ्याचा अधिकृत शुभारंभ

पेशवाईनंतर आखाड्यांद्वारे ‘धर्मध्वज’ (धर्माचा ध्वज) उभारला जातो, त्यानंतर कुंभमेळ्याचा अधिकृत प्रारंभ होतो. हा ध्वज संपूर्ण महोत्सवभर फडकत राहतो आणि शेवटी खाली उतरवला जातो, जी मेळ्याची समाप्ती असते.

कुंभमेळा हा केवळ धार्मिक यात्रेपुरता मर्यादित नसून, तो भारताच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि ऐतिहासिक जडणघडणीचा महत्त्वाचा भाग आहे. साधू-संप्रदायांच्या आखाड्यांपासून ते नागा साधूंच्या अनोख्या परंपरांपर्यंत या महोत्सवाने अनेक शतकांपासून भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंना एकत्र गुंफले आहे. शतकानुशतके हे आखाडे केवळ अध्यात्मिक केंद्रे राहिली नाहीत, तर त्यांनी लष्करी, व्यापारिक आणि सांस्कृतिक महत्त्वही टिकवले. ब्रिटिश राजवटीदरम्यान या आखाड्यांनी प्रशासनासमोर मोठ्या आव्हानांची निर्मिती केली, ज्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनावर नव्याने विचार केला गेला. आज, कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यांपैकी एक असून, त्याची ओळख आध्यात्मिक शक्ती, धार्मिक विधी, ऐतिहासिक परंपरा आणि सामाजिक एकता यांचे जिवंत प्रतीक म्हणून आहे. या यात्रेतील पेशवाई, स्नान विधी आणि आखाड्यांच्या प्रभावशाली उपस्थिती यामुळे भारतीय संस्कृतीचा हा वैभवशाली वारसा अधिकच गडद आणि आकर्षक ठरतो. कुंभमेळा म्हणजे अध्यात्म, इतिहास आणि परंपरांचे एकत्रित रूप; तो केवळ धार्मिक यात्रेचा उत्सव नाही, तर एक संस्कृतीचा महोत्सव आहे.