अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरमध्ये माजी मुख्यमंत्री पेमा खांडू यांची पुन्हा एकदा भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी आणखी एका टर्मसाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर पेमा खांडू आता राज्यपाल केटी पर्नेलक यांची भेट घेणार असून, सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. दरम्यान, गुरुवारी अरुणाचल प्रदेशात नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी झाली आहे. विशेष म्हणजे अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या ६० जागांपैकी भाजपानं ४६ जागा जिंकत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तसेच ईशान्यकडील राज्य सातत्याने गेली तीन वर्षे भाजपाच्या ताब्यात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर हा शपथविधी सोहळा इटानगर येथील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये होत आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाचे अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बीएल संतोष यांच्या उपस्थितीत नव्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळासह सकाळी ११ वाजता शपथ घेतली आहे.

खांडूंचे जीवन कसे होते?

प्रेमा खांडू हे बौद्ध धर्माचे अनुयायी असून, मोनपा जमातीशी संबंधित आहेत. ते खरं तर तवांग येथे वास्तव्याला असून, त्याच जिल्ह्यात चीनची सीमा ही भारतीय सीमेला लागून आहे. त्या सीमेवरूनही नेहमीच भारत अन् चीनमध्ये संघर्ष होत असतो. ते दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून पदवीधर आहेत. त्यांना फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉल या खेळांची विशेष आवड आहे. राजकारणात आल्यापासून त्यांनी खेळांना प्रोत्साहन देण्याचा जोरदार प्रयत्न चालवला. विशेषतः सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यावर त्यांचा भर असतो. ते एक संगीत प्रेमी असून, किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांची लोकप्रिय गाणी ते गात असताना अनेकदा कॅमेऱ्यातही कैद झाले आहेत. भाजपामधील लोक त्यांचे वर्णन मृदुभाषी आणि स्पष्ट बोलणारे असे करतात.

खांडू यांचा राजकीय प्रवास

वडील माजी मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे २०११ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले, तेव्हापासून खांडूच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि वडिलांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या मुक्तोमधून पोटनिवडणूक जिंकली. खरं तर इथूनच्या त्यांच्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. २०१४ च्या निवडणुकीत खांडू मुक्तो मतदारसंघातून बिनविरोध विजयी झाले. त्यांना जलसंपदा आणि पर्यटन मंत्रिपद मिळाले. त्यांनी अनेक कॅबिनेट मंत्रिपदं भूषवली. नबाम तुकी सरकारमध्येसुद्धा ते नगरविकास मंत्री होते. त्याच वर्षी त्यांनी मंत्रिपद सोडले आणि बंडखोर नेते कालिखो पूल यांच्या पंगतीत जाऊन बसले. २०१६ च्या संकटानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. तेव्हा खांडू हे भाजपाच्या पाठिंब्याने कालिखो पूल यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री झाले. परंतु हे सरकार अल्पकाळ टिकले. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत कालिखो पूल यांचं सरकार बरखास्त केलं आणि सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा नबाम तुकी यांच्या हवाली केल्या. तुकी यांनी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याच्या काही काळ आधी राजीनामा दिला आणि ३७ व्या वर्षी खांडू जुलै २०१६ मध्ये भारतातील सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. दोन महिन्यांनंतर सप्टेंबरमध्ये खांडू यांनी ४३ काँग्रेस आमदारांना घेऊन पक्ष सोडला आणि पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये सामील झाले. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांनी पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला. २०१९मध्ये पेमा खांडू यांनी मुक्तो विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवला आणि ते मुख्यमंत्री झाले. प्रेमा खांडू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे समजले जातात.

हेही वाचाः सरकारचा मोठा निर्णय; विशिष्ट सोन्याच्या दागिन्यांच्या आयातीवर घातली बंदी, कारण काय?

खांडू भाजपामधील उगवता तारा

अरुणाचलमध्ये भाजपाने ६० पैकी ४६ जागा जिंकल्यानंतर खांडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “भाजपाला सर्वाधिक जागा जिंकता आल्याने आमच्यासाठी हा एक ऐतिहासिक जनादेश आहे,” असंही ते म्हणालेत. भाजपा आणि काँग्रेसमधील त्यांच्या कार्यकाळातील फरकाबद्दल विचारले असता त्यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “त्या काळात काँग्रेसचे ईशान्येत वर्चस्व होते. दुर्दैवाने दिल्लीतील त्यांच्या नेत्यांनी संपूर्ण व्यवस्थाच भ्रष्ट आणि उद्ध्वस्त करून टाकली. लाच घेतल्याशिवाय एकही प्रकल्प मंजूर झालेला नाही. मीच काँग्रेसविरोधात बंड केले होते. भाजपामध्ये प्रवेश घेतल्यानंतरच मला काँग्रेस आणि भाजपामधील फरक समजला. खरं तर राज्यात सुरू झालेल्या विकास प्रकल्पांचे श्रेय अनेक जण खांडू यांना देतात. खांडू मुख्यमंत्री असताना जवळपास १७०० किमी महामार्गांचे काम पूर्ण झाले आहे आणि आता राज्यात विमानतळदेखील तयार होत आहे. निवडणुकीतील विजयामुळे राज्यातील भाजपाची स्थिती केवळ मजबूत झाली नाही, तर खांडूंचेही राजकीय वजन वाढले आहे, असे अनेक राजकीय निरीक्षकांनी नमूद केले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prema khandu scored a hat trick a young chief minister who gave bjp a big victory in arunachal pradesh vrd