-हृषिकेश देशपांडे
अजून महिन्याभराने राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असेल. येत्या १८ जुलैला देशातील या सर्वेाच्च घटनात्मक पदासाठी मतदान होईल. या निमित्ताने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या ऐक्याची कसोटी लागणार आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मीरा कुमार यांना एकूण १० लाख ६७ हजार मतांपैकी ३ लाख ६७ हजार मते मिळाली होती. आतापर्यंत पराभूत उमेदवारांना मिळालेली ही सर्वाधिक मते होती. यंदा हा विक्रम मोडण्याची विरोधकांना संधी आहे. मात्र यात अनेक कंगोरे आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत विरोधी गोटातील तृणमूल काँग्रेस तसेच आम आदमी पक्ष यांची ताकद वाढलेली आहे. ते काँग्रेसबरोबर जाणार काय, हा प्रश्न आहे. आप दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत आहे. पंजाबमध्ये तर काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला काँग्रेस बरोबर कसे घेईल, हा एक मुद्दा आहे. विरोधकांशी संवाद साधण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोपवली आहे. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे एकूण मतांच्या ४८ टक्के इतकी मते आहेत. त्यात भाजपची ४२ टक्के मते आहेत. त्यांना ओडिशातील बिजु जनता दल तसेच आंध्र प्रदेशातील जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसचा पाठिंबा अपेक्षित आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराचा विजय अपेक्षितच आहे. प्रश्न आहे विरोधकांची व्यापक आघाडी निर्माण होणार काय, हाच.

भाजपच्या उमेदवाराकडे लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच माध्यमात वर्तवलेल्या अंदाजापेक्षा वेगळी व्यक्ती निवडतात असा अनुभव आहे. आताही राष्ट्रपतीपदासाठी सत्तारूढ आघाडीच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू आहेत. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे आखाती देशांत पडसाद उमटले. त्यामुळे भाजप मुस्लिम उमेदवार देऊन काही प्रमाणात भरपाई करण्याचा प्रयत्न आहे. ते पाहता केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान तसेच केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची नावे घेतली जात आहेत. तसेही नक्वी यांची राज्यसभेची मुदत संपूनही त्यांना पक्षाने उमेदवारी दिलेली नाही किंवा उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतही भाजपने त्यांचा विचार केला नाही. ही घडामोड पाहता त्यांना अन्य मोठी जबाबदारी मिळू शकते, असा मतप्रवाह आहे. अरिफ मोहम्मद खान यांची भाजपच्या विचारांशी जवळीक असली तरी अनेक वेळा ते भाजपच्या विचारांपेक्षा भिन्न मत मांडतात. त्यामुळे अशा व्यक्तीला संधी दिल्यास भविष्यात एखाद्या मुद्द्यावर संघर्षाची वेळ येऊ शकते असाही एक विचार आहे. जर मुस्लिम व्यक्तीला संधी द्यायची झाल्यास नक्वी हा चांगला पर्याय आहे. उपराष्ट्रपतीपदासाठीही या दोघांचा विचार होऊ शकतो. दोघांनाही संसदीय कामाचा अनुभव आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष असतात. राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी व्यक्ती किंवा महिलेचा विचार केला जाऊ शकतो. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचेही नाव संभाव्य उमेदवारांमध्ये घेतले जाऊ शकते. भाजप यावेळी नाव जाहीर करताना नेहमीप्रमाणे धक्कातंत्र अवलंबते का, याची उत्सुकता आहे.

विरोधकांच्या ऐक्याची कसोटी

राष्ट्रपती निवडणुकीत चार हजार आठशे नऊ मतदार असून, त्यांच्या मतांचे मूल्य १० लाख ८६ हजार ४३१ इतके आहे. यात काँग्रेस पक्षाकडे भाजपनंतर सर्वाधिक १४ टक्के मते असून, त्यांच्या मित्रपक्षांची दहा टक्के मते आहेत. तर तृणमूल काँग्रेसकडे ५.४ टक्के इतकी मते आहेत. त्यामुळे भाजपचे बळ पाहता विरोधी उमेदवाराला यश मिळणे कठीण आहे. मात्र एकास एक उमेदवार विरोधकांनी दिल्यास भाजपला २०२४ मध्ये आव्हान उभे राहील. त्या दृष्टीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिबल यांचे नाव विरोधकांचे उमेदवार म्हणून घेतले जात आहे. काँग्रेसचा राजीनामा देऊन उत्तर प्रदेशातून समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेवर पुन्हा निवडून आले आहेत. सिबल यांचा सर्वपक्षीय नेत्यांशी स्नेह आहे. त्यामुळे सर्वमान्य होईल असा उमेदवार देणे ही एक विरोधकांसाठी कसोटीच आहे. देशाच्या राजकारणाची दिशा त्यातून ठरणार आहे.