-संतोष प्रधान
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पदाची मुदत २४ जुलै रोजी संपुष्टात येणार असून, जुलैच्या सुरुवातीला या पदासाठी निवडणूक होईल. सध्या सत्ताधारी भाजप आणि विरोधकांकडून चाचपणी सुरू झाली आहे. राज्यातील २८८ आमदारांना मतदानाचा अधिकार असतो. विधान परिषद आमदारांना मतदानाचा अधिकार नसतो. राज्यातील आमदारांच्या एका मताचे मूल्य हे १७५ असते. राज्यातील आमदारांची एकूण मते ही ५०,४०० एवढी आहेत. राज्यात सध्या महाविकास आघाडीचे बहुमत असल्याने महाविकास आघाडी पाठिंबा देईल त्या उमेदवाराला राज्यातून २८ हजारांच्या आसपास मते मि‌ळण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण मतदार किती?
राष्ट्रपतीपदाकरिता खासदार आणि आमदार मतदान करतात. देशातील ७७६ खासदार (५४३ लोकसभा आणि २३३ राज्यसभा) आणि ४१२० आमदार अशा एकूण ४८९६ जणांना मतदानाचा अधिकार असतो. खासदारांच्या एका मताचे मूल्य हे ७०८ आहे. प्रत्येक राज्यातील १९७१च्या जनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येच्या आधारे आमदारांच्या मतांचे मूल्य हे वेगगेवळे असते. खासदारांची एकूण मते ही ५,४९,४०८ एवढी आहेत. आमदारांची एकूण मते ही ५,४९,४९५ एवढी होतात. या निवडणुकीत एकूण मतांचे मूल्य हे १०,९८,९०३ एवढे आहे. पाच लाखांपेक्षा अधिक मते मिळवणारा निवडून येतो.

अन्य महत्त्वाच्या राज्यांमधील आमदारांच्या एका मताचे मूल्य किती आहे?
उत्तर प्रदेशमधील आमदारांच्या मताचे मूल्य हे सर्वाधिक २०८ आहे. याशिवाय तमिळ‌नाडू १७६, ओडिशा १४९, बिहार १७३, झारखंड १७६, बिहार १७३, आंध्र प्रदेश १५९, कर्नाटक १३१, गुजरात १४७ असे मतमूल्य असते.

खासदारांच्या मतांचे मूल्य कमी होणार?
लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचे मूल्य हे ७०८ आहे. हे मूल्य एकूण विधानसभा आमदारांची मते भागिले एकूण खासदारांची संख्या या आधारे निश्चित केले जाते. आमदारांची एकूण मते ही ५,४९,४९५ आहेत. या संख्येला लोकसभा व राज्यसभेचे एकूण खासदार ७७६ याने भागले जाते. त्यातून खासदारांच्या एका मताचे मूल्य ७०८ निश्चित करण्यात आले. जम्मू आणि कश्मीर हा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. जम्मू आणि कश्मीरमध्ये अद्याप विधानसभेची निवडणूक झालेली नाही. सध्या जम्मू आणि कश्मीरमध्ये आमदार नाहीत. यामुळे एकूण आमदारांच्या मतांची संख्या कमी होईल. त्याचा परिणाम खासदारांच्या मतांच्या मूल्यावर होणार आहे. खासदारांच्या मतांचे मूल्य हे ७०८ वरून घटून ७०० होण्याची शक्यता वर्तविली जाते.

राज्यातील आमदारांच्या मतांचे मूल्य कसे ठरते?
राज्यातील १९७१च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या व त्याला एकूण विधानसभा सदस्यांच्या संख्येने भागले जाते. त्यातून येणारी सख्या ही एका मतांचे मूल्य मानले जाते. १९७१च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ५ कोटी चार लाख १२ हजार २३५ होती. या संख्येला २८८ ने भागले जाते. त्यातून एका मताचे मूल्य हे १७५ होते. एकूण २८८ आमदार गुणिले १७५ अशी पद्धतीने राज्यातील आमदारांची एकूण मते ही ५०,४०० होतात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President election vote calculation print exp scsg