शनिवारी ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथे नव्याने बांधलेल्या महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उद्घाटन केले. या विमानतळाला भारतीय संस्कृतीतील महान ऋषी वाल्मिकी यांचे नाव देण्यात आले. हे नामकरण आणि उद्घाटन आयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहे. त्याच निमित्ताने वाल्मिकी ऋषींविषयी जाणून घेणे संयुक्तिक ठरावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदी कवी वाल्मिकी

वाल्मिकी ऋषींना आदी कवी किंवा पहिले कवी म्हणून संबोधले जाते. संस्कृत साहित्य परंपरेतील पहिले महाकाव्य मानले जाणारे रामायण रचण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. रामायणाचे वर्णन नेहमीच ‘पहिली साहित्यिक रचना’ असे केले जाते. इतर महाकाव्यांना हे लागू होत नाही, असे प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर यांनी आपल्या ‘अर्ली इंडिया’ (२००२) या पुस्तकामध्ये नमूद केले आहे.

परंतु साहित्यिक विश्लेषणानुसार व्यासांनी रचलेले महाभारत हे रामायणाच्या आधी रचले गेले असावे, असे रोमिला थापर नमूद करतात. रामायणाची भाषा अधिक प्रगल्भ तसेच कथा समाजाशी जवळचा संबंध प्रस्थापित करणारी आहे. असे असले तरी रामायण आणि महाभारत या दोघांपैकी पारंपरिकरित्या रामायण हे आधीचे मानले जाते, असे थापर नमूद करतात. रामायण हे इसवी सनपूर्व पहिल्या शतकात रचले गेले असा तर्क त्या मांडतात, तर रॉबर्ट गोल्डमन या सारख्या विद्वानांनी रामायण हे इसवी सनपूर्व आठव्या शतकापूर्वी रचले गेल्याचे नमूद केले आहे.

अधिक वाचा: बिहार खरंच सीतेचे जन्मस्थान आहे का? काय सांगतात पौराणिक संदर्भ?

रामायणातील बाल आणि उत्तरकांडातील वाल्मिकी

‘वाल्मिकी रामायण’ हे सात कांडांमध्ये विभागलेले आहे. प्रत्येक भाग भगवान रामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगावर प्रकाशझोत टाकतो. बालकांड हा प्रारंभिक भाग तर उत्तरकांड हा शेवटचा भाग आहे. बालकांडाची सुरुवात ही वाल्मिकी ऋषी आणि नारद मुनींच्या संवादाने होते. या जगात कोणी नीतिमान मनुष्य शिल्लक आहे का? असा प्रश्न वाल्मिकी ऋषी नारद मुनींना विचारतात. तेव्हा नारद उत्तरादाखल राम हे नाव घेतात. त्यानंतर वाल्मिकी आपले कथन सुरू करतात. तर उत्तरकांडात प्रभू रामांनी सीतेचा त्याग केल्यानंतरच्या प्रसंगाचे वर्णन येते. सीतेला वाल्मिकींच्या आश्रमात आश्रय लाभतो आणि तिथे ती जुळ्या मुलांना जन्म देते. हीच दोन जुळी मुले म्हणजे लव आणि कुश वाल्मिकींचे शिष्य होतात. बालकांडात वाल्मिकी आपल्या शिष्यांना रामाची कथा कथन करतात.

महत्त्वाचे म्हणजे ही बालकांड व उत्तरकांड नंतरच्या काळात समाविष्ट केली गेली असावी. या दोन्ही कांडांची भाषा, रचना पाहता ज्या काळात विष्णू या देवतेचे प्राबल्य वाढले त्यानंतर ही कांडे मूळ रामायणात समाविष्ट केली गेली असावीत, असे उत्तरा: द बुक ऑफ आन्सर्स (२०१७), अ ट्रान्सलेशन अॅण्ड कमेंटरी ऑन द लास्ट कान्टो या अर्शिया सत्तार लिखित पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय असे अनेक संदर्भ ग्रंथ आहेत, ज्यात रामला ईश्वरी अवतार म्हणून नमूद करण्यात आले आहे. भगवान विष्णूंनी रावणाचा वध करण्यासाठी रामावतार घेतल्याच्या कथाही उपलब्ध आहेत. नंतरच्या काळात रामाच्या अवताराची कथा वैष्णव भक्तीची केंद्रबिंदू ठरली. याचीच परिणती रामायणाच्या वेगवेगळया भाषेतील आवृत्यांमध्ये झाली, असे सत्तार यांनी नमूद केले आहे.

तुलसीदासांचे रामचरितमानस अधिक लोकप्रिय

भारत आणि भारतीय उपखंडात रामायणाच्या अनेक आवृत्त्या आहेत. त्यातील प्रत्येक आवृत्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. तरीही रामायणाचा मूळ कर्ता वाल्मिकी ऋषीच असल्याचे सर्वश्रुत आहे. रामायणाच्या आवृत्त्या अनेक असल्या तरी त्यात तुलसीदासांचे रामचरितमानस हे अधिक लोकप्रिय आहे. १६ व्या शतकातील भक्ती कवी, तुलसीदास यांची आवृत्ती शास्त्रोक्त संस्कृत ऐवजी स्थानिक अवधीमध्ये रचली गेली आहे. ही तुलसी रामायणाच्या सध्याच्या लोकप्रियतेची गुरुकिल्ली आहे. तर दुसऱ्या बाजूला वाल्मिकींचे रामायण साहित्यातील एक उत्कृष्ट कलाकृती असली तरी, बहुतेकांसाठी ते अगम्य आहे. ‘रामचरितमानस’ने रामाची कथा सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिली. रामचरितमानस हे रामलीलेच्या परंपरेशी संबंधित आहे.

वाल्मिकींच्या जातीविषयीचा वाद

वाल्मिकी ऋषींच्या जातीविषयी अनेक वाद आहेत. त्यात दोन मुख्य प्रवाह म्हणजे, देशभरातील अनेक अनुसूचित जाती वाल्मिकी ऋषींचा संबंध आपल्याशी जोडतात, तर काही ते ब्राह्मण असल्याचे सांगतात. २०१६ मध्ये, कर्नाटक सरकारने ‘वाल्मिकी यारू?’ नावाच्या पुस्तकानंतर वाल्मिकींची जात निश्चित करण्यासाठी १४ सदस्यीय समितीची स्थापना केली होती. कन्नड लेखक के एस नारायणाचार्य यांनी लिहिलेल्या (वाल्मिकी कोण आहेत?) या पुस्तकात, नारायणाचार्य यांनी वाल्मिकी ब्राह्मण असल्याचा दावा केला. त्यामुळे वाल्मिकी त्यांच्यापैकीच एक होते असे मानणाऱ्या नाविक (नौकावाले) समुदायाकडून यावर जोरदार टीका करण्यात आली होती.

वाल्मिकी ऋषींची जात आणि मूळ सांगणाऱ्या अनेक स्पर्धात्मक आवृत्त्या उपलब्ध आहे. लेखक आणि सामाजिक भाष्यकार प्रियदर्शन यांनी २०१६ मध्ये फॉरवर्ड प्रेस साठी लिहिले: “जेव्हा तुम्ही वाल्मिकींची जात शोधण्यासाठी निघाल, तेव्हा तुम्हाला कोणतेही ऐतिहासिक तथ्य सापडणार नाही. फक्त दंतकथाच सापडतील.”

अधिक वाचा: जगातील आठवे आश्चर्य अशी मान्यता लाभलेले अंगकोर वाट आहे तरी काय? या मंदिराचा हिंदू संस्कृतीशी काय संबंध?

दरोडेखोर ते संत

वाल्मिकींच्या जातीवरील वादामागे एक मुख्य कथा आहे, वाल्मिकी हे ऋषी होण्यापूर्वी रत्नाकर म्हणून प्रसिद्ध होते. एक भयंकर डाकू आणि शिकारी म्हणून ओळखले जात होते. काही कथांच्या संदर्भानुसार वाल्मिकी हे लहान असताना वनात हरवले होते, त्यांचा जन्म हा ब्राह्मण आई- वडिलांच्या पोटी झाला होता. ते वनात हरवल्यानंतर एका शिकारी जोडप्याने त्यांना दत्तक घेतले. तर याच कथेच्या दुसऱ्या आवृत्तीनुसार वाल्मिकी यांचा जन्म भिल्ल राजाच्या पोटी झाला होता. त्या कथेनुसार वाल्मिकी गावकरी आणि प्रवाशांना लुटून उदरनिर्वाह करत असत. एक दिवस वाल्मिकी यांची नारद मुनींशी गाठ पडली आणि त्याचे आयुष्य बदलले. इतरांप्रमाणे, नारद रत्नाकरला घाबरले नाहीत, इतकेच नाही तर त्यांनी त्याच्याशी हळूवारपणे, प्रेमाने संवाद साधला, त्याला जाणीव करून दिली की, आपण जे करत आहोत ते चुकीचे आहे आणि त्याने आपला मार्ग सुधारणे आवश्यक आहे. रत्नाकरने नारद मुनींना त्याला क्षमा करण्याची आणि त्याच्या दुष्कृत्यांचे प्रायश्चित करण्यास मदत करण्याची प्रार्थना केली. नारदांनी रत्नाकरला एक साधा मंत्र दिला तो मंत्र म्हणजे प्रभू रामाचे नाव होते.अशा प्रकारे रत्नाकरचे परिवर्तन सुरू झाले. तो रामाच्या नामात ध्यानमग्न झाला. आणि कालांतराने वाल्याचा वाल्मिकी अर्थात रत्नाकरचा ‘महर्षी वाल्मिकी’ झाले!

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister modi inaugurated the new valmiki airport in ayodhya on the background of ram mandir what is story of valmiki rushi svs