जनतेसाठी केंद्र किंवा राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. योजनांच्या माध्यमातून जनजीवन रुळावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. यासाठी अब्जावधी रुपयांच्या योजना आखल्या जातात. मात्र भ्रष्टाचाराचं मूळ इतकं खोलवर रुतलेलं असतं की, सामान्य जनतेपर्यंत या योजना पोहोचत नसल्याची ओरड होते. यासाठी भारताचे दिवंगत पंतप्रधान आणि काँग्रेस नेते राजीव गांधी यांनी खंत व्यक्त केली होती. सरकार लोकांसाठी १ रुपया देते आणि लोकांपर्यंत फक्त १५ पैसे पोहोचतात. राजीव गांधी यांनी त्या काळातलं वास्तव सांगितलं होतं. मात्र इतक्या वर्षांनंतरही राजीव गांधी यांच्या त्या वक्तव्याची चर्चा होत आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वक्तव्याचा पुनरुच्चार करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
राजीव गांधींनी काय सांगितलं होतं?
इंदीरा गांधींच्या निधनानंतर पंतप्रधानपदी राजीव गांधी यांची निवड करण्यात आली होती. भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांच्या नावाची ओळख होती. १९८५ साली राजीव गांधी दुष्काळग्रस्त ओडिशातील कालाहंडी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी “सरकार तुमच्यासाठी १ रुपया पाठवते पण तुमच्यापर्यंत फक्त १५ पैसे पोहोचतात”. राजीव गांधी यांनी भ्रष्टाचारावर थेट बोट ठेवत नाराजी व्यक्त केली होती. “देशात भ्रष्टाचार होत आहे. भ्रष्टाचार तळागाळात पोहोचला आहे. दिल्लीत बसून काढता येणार नाही”, असं त्यांनी सांगितलं होतं.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
जर्मनीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी काँग्रेसवर ताशेरे ओढले. भाजपा सरकार देशाच्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त फायदे पोहोचेल याची खात्री करत आहे. “कोणता पंजा होता जो ८५ पैसे काढून घेत असे,” पंतप्रधानांनी भारतीय समुदायाच्या १६०० हून अधिक लोकांना संबोधित करताना सांगितले. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना महामारीबाबत गाव प्रमुख आणि सरपंचांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारच्या योजनांबाबत विचारणा केली. तेव्हा मोदी यांनी सांगितले की, “पूर्वी लोक म्हणायचे की केंद्रातून १ रुपया पाठवला तर १५ पैसेच पोहोचतात. आज जर १ रुपया पाठवला तर तो १ रुपया लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतो.” यापूर्वी मोदींनी २०१७ मध्ये कर्नाटक आणि २०१९ मध्ये ओडिशामध्ये राजीव यांच्या या विधानाचा उल्लेख केला होता.
विश्लेषण : जीएसटी संकलन कशामुळे वाढले? महागाई आणि जीएसटी संकलनाचा काय संबंध आहे?
यापूर्वी या वक्तव्याचा कुठे उल्लेख झाला?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या भाजपा नेत्यांनीही या वक्तव्यावरून काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत. एवढेच नाही तर सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यानही याचा उल्लेख करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०१७ या वर्षी आधार वैधतेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एके सिकरी आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठाने सांगितले की, माजी पंतप्रधान म्हणाले होते की, १ रुपया खर्च केल्यानंतर केवळ १५ पैसे पोहोचतात. भ्रष्टाचाराचा हा आजार आधारमुळे बरा होऊ शकतो, यात शंका नाही. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील २०२० चा अर्थसंकल्प सादर करताना याचा उल्लेख केला होता आणि दावा केला होता की मोदी सरकार आल्यानंतर ही परिस्थिती बदलली आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींच्या न्याय योजनेवर हल्ला करण्यासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीही याचा उल्लेख केला होता.