कला ही मानवाच्या अभिव्यक्तीचे साधन आहे. उत्क्रांतीच्या प्राथमिक टप्प्यात मानवाला भाषा आणि लिपीचे ज्ञान अवगत नव्हते. त्यावेळी मानवाने चित्रकलेच्या माध्यमातून आपल्या भावनांना, विचारांना वाट करून दिली. त्याने रेखाटलेली हीच चित्र आज आपल्याला त्याच्या भूतकाळाविषयी माहिती पुरवतात. त्यामुळे अशा स्वरूपाच्या प्राचीन चित्रांचा खजिना सापडणे, ही अभ्यासकांसाठी पर्वणीच असते. मानवाच्या अनभिज्ञ भूतकाळाच्या अनन्यछटा या माध्यमातून उलगडत जातात. अशाच स्वरूपाचा खजिना इंडोनेशियातील सुलावेसी बेटावरील लेआंग कारामपुआंग गुहेत आढळून आला. अभ्यासकांनी नव्या पद्धतीच्या कालगणनेचा- डेटिंग मेथडचा वापर करून गुहेत आढळून आलेल्या चित्रांचा काळ निश्चित केला. या गुहेतील चित्र चक्क ५१ हजार २०० वर्षांपूर्वीची आहेत. या चित्रांमध्ये तोंड उघडलेला रानडुक्कर आणि मानवी प्रतिकृती आहेत. शिवाय काही थेरियनथ्रोप (प्राण्याचे तोंड आणि मानवी शरीर असलेल्या प्रतिमा) आहेत.
अधिक वाचा: वडिलांशिवाय जन्माला आलेली ‘डॉली’ कोण होती?
बुधवारी, ३ जुलै रोजी ‘नेटिव्ह केव्ह आर्ट इन इंडोनेशिया बाय 51 थाऊजंड 200 इयर्स अगो’ (Narrative cave art in Indonesia by 51,200 years ago) शीर्षकाचा शोधनिबंध नेचर या शोधापत्रिकेत प्रकाशित झाला. या संशोधनाचे श्रेय २३ संशोधकांना जाते. हे संशोधक ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफिथ युनिव्हर्सिटी आणि सदर्न क्रॉस युनिव्हर्सिटी आणि इंडोनेशियन नॅशनल रिसर्च अँड इनोव्हेशन एजन्सीतील आहेत. मूलतः कालगणनेसाठी या चित्रांचे नमुने २०१७ सालीचा गोळा करण्यात आले होते, परंतु या वर्षाच्या सुरुवातीपर्यन्त काळ ठरवण्यात आलेला नव्हता. आता समोर आलेल्या कालगणनेनुसार या चित्रांचा कालखंड यापूर्वी सर्वात जुन्या गुहा कलेपेक्षा ५००० वर्षांहून अधिक जुना असल्याचे सिद्ध झाले आहे. इंडोनेशियातील आधीची चित्र लेआंग टेडोंग येथे २०२१ मध्ये सापडली होती. त्याच निमित्ताने लेआंग कारामपुआंग येथील चित्रकलेचे महत्त्व आणि नवीन डेटिंग तंत्र यांचा घेतलेला हा आढावा.
चित्रकला काय दर्शवते?
लेआंग कारामपुआंग गुहेतील रानडुकराच्या चित्रात एका मानवी आकृतीने रानडुकराच्या गळ्याजवळ एक वस्तू धरलेली आहे. दुसरी प्रतिमा थेट डुकराच्या डोक्यावर पाय पसरलेल्या अवस्थेत आहे. तिसरी आकृती इतरांपेक्षा मोठी आणि दिसायला भव्य आहे; तिच्या डोक्यावर तिने काहीतरी धारण केले आहे, जे नक्की काय असावं याविषयी संशोधन सुरु आहे. रानडुकराच्या सभोवतालच्या या मानवी प्रतिमा गतिमान आहेत. या चित्रात काहीतरी विशिष्ट घडत असल्याचे दिसते. या चित्राचे वर्णन ‘द कॉन्व्हर्सेशन’ने प्रकाशित केले आहे. संशोधनात सहभागी अभ्यासकांनी या चित्रावर शोधनिबंध लिहिला आहे.
चित्रकला लक्षणीय का आहे?
अभ्यासकांनी त्यांच्या शोधनिबंधात म्हटले आहे की, या चित्रातील मानव सदृश्य आणि प्राण्यांच्या प्रतिमा या महत्त्वाच्या आहेत. आधुनिक मानवाच्या इतिहासातील आजपर्यंत उघड झालेल्या चित्रांच्या तुलनेत ही चित्र अधिक सखोलता दर्शवतात. पुरातत्त्वीय पुरावे असे दर्शवतात की, निअँडरथल्सने (सर्वात जवळचा प्राचीन मानवी नातेवाईक) ७५,००० वर्षांपूर्वी गुहांमध्ये चित्र काढण्यास सुरुवात केली, परंतु या चित्रांमध्ये आकृत्या नव्हत्या. संशोधक पुढे सांगतात: आम्ही आता जो कालखंड निश्चित केला आहे, त्यानुसार मानववंशीय आकृत्यांचे (थेरियनथ्रॉप्ससह) प्राण्यांशी संवाद साधणारे चित्रण सुलावेसीच्या लेट प्लाइस्टोसीन गुहेतील कलेमध्ये दिसते. युरोपमध्ये नंतरच्या दहा हजार वर्षांनंतरही अशा प्रकारचे चित्रण आढळून आलेले नाही. याचा अर्थ होमो सेपियन्सच्या सुरुवातीच्या कालखंडातच अशा प्रकारच्या चित्रणाला सुरुवात झाली होती. या काळातच मानवाने प्राण्यांशी संवाद साधायला सुरुवात केली होती. तेच या चित्रांमधून प्रकट होते. या नवीन संशोधनाविषयी मत व्यक्त करताना अशोका विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक नयनजोत लाहिरी म्हणाल्या, हा एक महत्त्वाचा शोध आहे.
अधिक वाचा: चंद्राबाबू नायडूंनी निवडलेली नवीन राजधानी ‘अमरावती’; बौद्ध स्तूपाचा वारसा असलेले हे शहर का आहे महत्त्वाचे?
नवीन डेटिंग तंत्र काय आहे?
ही चित्र सापडलेली गुहा चुनखडीची आहे. या चित्रांवरील कॅल्साइटच्या विश्लेषणातून या चित्रांचा काळ ठरवण्यात आला. त्यासाठी यू-सिरीज या डेटिंग पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. प्रक्रियेदरम्यान लेझर बीमचा वापर केला गेला. युरेनियम आणि थोरियम यांच्यातील गुणोत्तराची तुलना करून संशोधक चित्रण केव्हा झाले आहे याची गणना करू शकले. याच कालगणनेच्या पद्धतीचा वापर करून, संशोधकांनी लेआंग बुलू सिपॉन्ग ४ येथील गुहा चित्रांमध्ये असलेल्या आणखी एका शिकार दृश्याचा काळ निश्चित केला. पूर्वी या चित्रांचा काळ ४३,९०० वर्ष जुना असल्याचे मानले जात होते. या शोधावरून असे दिसून आले की ही चित्र पहिल्या अंदाजापेक्षा किमान ४,००० वर्षे जुनी आहे. “ही पद्धत डेटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅल्शियम कार्बोनेट आणि रॉक आर्ट पिगमेंट लेयर यांच्यातील अस्पष्ट संबंध अधिक सहजतेने स्पष्ट करते,” असे संशोधकांनी संशोधनात म्हटले आहे.
लाहिरी म्हणाल्या की, निश्चित कालगणना केलेली गुहा चित्रे फारशी अस्तित्त्वात नाहीत. “भारतात, मध्य प्रदेश सारख्या ठिकाणी गुहा चित्रं आहेत, परंतु त्यांची अशा प्रकारची डेटिंग- कालगणना केलेली नाही.” त्या पुढे म्हणाल्या, “हा शोध पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या कामात विज्ञानाचा सहभाग किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित करतो.”