पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव हे अहमदनगरला देण्यात यावं असा प्रस्ताव केंद्र सरकारला लवकरच पाठवण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली. अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने करण्यात याविषयीचा प्रश्न भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तारांकित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताता दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली.
दीपक केसरकर याबाबत काय म्हणाले?
गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर दीपक केसरकर म्हणाले की, यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून केंद्र सरकारला पाठवण्यात येईल. त्यानंतर केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली की नामांतराचा निर्णय घेण्यात येईल.
औरंगाबादचं नाव संभाजी नगर करण्याचा प्रस्ताव मंजूर
या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र विधानसभेने औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजी नगर आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्यासंबंधीचे दोन वेगळे प्रस्ताव एकमताने मंजूर केले. हे दोन्ही प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहेत. जूनमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली होती. अहिल्याबाईंचा जन्म अहमदनगरमधल्या चौंडी गावात झाला त्यामुळे हे नामांतर करावं असं पडळकर यांनी पत्रात नमूद केलं होतं.
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांची टीका
राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मात्र या निर्णयावर टीका केली आहे. “नावं बदलण्याची मागणी करण्याऐवजी भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी इंधनाच्या वाढत्या किंमती आणि वाढती महागाई कमी करण्यासारखे उपाय शोधले तर बरं होईल. त्यांनी केंद्र सरकारला शेतकरी आणि गरीबांच्या तक्रारी सोडवण्यासाठी पावलं उचलण्याची विनंती करावी. मात्र असे होत नाही. नाव बदलण्यासारखे आवश्यक नसलेले किंवा नगण्य मुद्दे पुढे केले जात आहेत असंही अमोल मिटकरींनी म्हटलं होतं.
अहमदनगर या शहराला हे नाव नेमकं कसं मिळालं?
अहमदनगर हे शहर पश्चिम महाराष्ट्रात आहे. जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटनुसार या शहराचा उल्लेख २४० इ.स. पूर्व काळात म्हणजेच मौर्य सम्राट अशोकाच्या काळातही आढळतो. मध्ययुगीन इतिहास लक्षात घेतला तर राष्ट्रकुट, चालुक्य आणि त्यानंतर दिल्ली यांनी या प्रदेशावर राज्य केलं. दिल्लीचं वर्चस्व जेव्हा आलं तेव्हा अफगाण सैनिक अल्लाउद्दीन हसन गंगूने बंड पुकारलं. या बंडामुळे दख्खन प्रांतात बहामनी राज्याची स्थापना झाली. काही काळानंतर अहमदनगर (जे तेव्हा निजामशाही म्हणून ओळखले जायचे) त्या साम्राज्यातून उदयास आलेल्या पाच राज्यांपैकी एक झालं.
१४८६ मध्ये काय घडलं?
इ.स. १४८६ मध्ये मलिक अहमद हा निजामशाह बहामनी सल्तनतीच्या पंतप्रधान या पदावर बसला. राजाने त्याला सत्तेवरून दूर करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने तो आपल्या कौशल्याने हाणून पाडला. मे १४९० या वर्षात त्याने अहमदनगरजवळ बहामनी राज्याच्या सैन्याचा पराभव केला. १४९४ मध्ये त्याने एक शहर वसवलं जे सीना नदीच्या किनाऱ्यावर होतं. त्यानंतर या शहराला मलिक अहमदने स्वतःचं नाव दिलं जे होतं अहमदनगर.
यानंतर मलिक अहमद निजामशहाने दौलताबादचा किल्ला ताब्यात घेतला आणि आपलं सैन्य त्या ठिकाणी तैनात केलं. त्यानंतर आपल्या वर्तनाने त्याने परदेशातून आलेले मुस्लिम, स्थानिक मुस्लिम यांची मनं जिंकली. एवढंच नाही तर मराठा शेतकरी आणि ब्राह्मण समाजाचा विश्वासही त्याच्यावर बसला. निजामशहाने ब्राह्मण समाजाचा विश्वास जिंकल्याने हिंदूंची मनं वळवण्यातही त्याला यश आलं असं एक वेबसाईट सांगते.
भारताचे दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात पंडितजी लिहितात, “१४९० मध्ये अहमदनगरचा संस्थापक असलेला अहमद निजामशाह हा बहामनी राजाचा मंत्री असलेल्या निजाम उल-मुल्क भैरी यांचा मुलगा होता.”
आता जाणून घेऊ कोण होत्या अहिल्याबाई होळकर?
३१ मे १७२५ ला अहमदनगरच्या चौंडी या गावात माणकोजी शिंदे यांच्या पत्नीला कन्यारत्न झालं. त्यांचं नाव होतं अहिल्याबाई. अहिल्याबाई होळकर या पुढे जाऊन मध्ययुगीन भारतातील शासक स्त्रियांपैकी एक ठरल्या. विशेष बाब ही होती की माणकोजी यांनी त्या काळात मुलींचं शिक्षण दुरापस्त होतं तरीही अहिल्याबाई होळकरांना शिक्षण देण्याचा आग्रह धरला.
अहिल्याबाईंचं लग्न खंडेराव होळकरांशी
अहिल्याबाईंचं वयाच्या आठव्या वर्षी पेशवा बाजीरावांचे सेनापती असलेल्या मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव होळकरांशी लग्न झालं.अहिल्याबाईंच्या शिवभक्तीमुळे मल्हारराव चांगलेच प्रभावित झाले होते. म्हणून त्यांनी आपल्या मुलाचा विवाह अहिल्याशी ठरवला. १७५४ मध्ये भरतपूरच्या राजाविरोधात लढाई लढत असताना खंडेराव होळकरांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंनी मावळ प्रांतावर ताबा मिळवला. एवढंच नाही तर अहिल्याबाईंनी त्यानंतर आपल्या सासरच्या मंडळींच्या संमतीने लष्करी शिक्षण घेतलं आणि त्यात प्राबल्य मिळवलं. एवढंच नाही तर पतीच्या मृत्यूनंतर सती जाण्याच्या कुप्रथेसही त्यावेळी अहिल्याबाईंनी विरोध केला आणि त्या सती गेल्या नाहीत. काही वर्षांनंतर सासरे मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई होळकरांनी पेशव्यांकडे शासक पद
आपल्याला मिळावं म्हणून अर्ज केला होता.
पंडित नेहरू यांनी आपल्या पुस्तकात उल्लेख केला आहे की होळकरांची राजवट ३० वर्षे होती. त्या काळात या प्रांतात परिपूर्ण व्यवस्था आणि चांगलं सरकार होतं. लोकांची त्या काळात मोठ्या प्रमाणावर भरभराट झाली. अहिल्याबाई होळकर या महान शिवभक्त म्हणून जशा ओळखल्या गेल्या तशाच एक उत्तम शासक आणि संघटक म्हणूनही ओळखल्या गेल्या. त्यांच्याविषयी सगळ्याच जनतेला आदर वाटत होता.
हिंदू मंदिरांच्या जीर्णोद्धारावर भर
अहिल्याबाई होळकर या शासक असताना त्यांनी हिंदू मंदिरांचा जिर्णोद्धार करण्याच्या भूमिकेवर भर दिला. १७८० मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी वाराणसीतल्या काशी विश्वनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली. बद्रीनाथ, द्वारका, गया आणि रामेश्वरम या पवित्र स्थळांसह अनेक ठिकाणी त्यानी प्रवाशांसाठी विश्रामगृहंही बांधली तसंच सार्वजनिक घाटांच्या बांधकामांनाही प्रोत्साहनच दिलं.