भारतीय खेळणी उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात आर्थिक तरतुदीची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाचा सावंतवाडी येथील लाकडी खेळण्यांच्या व्यवसायावर काय परिणाम होईल?
केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा कोणती?
‘मेड इन इंडिया’ खेळण्यांना बाजारपेठ आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय योजना आणण्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन नुकतीच केंद्रीय अर्थसंकल्पात केली. क्लस्टर रूम आणि पॉश लूमच्या माध्यमातून व्यापारसुलभ वातावरण तयार केले जाणार आहे. यासाठी दहा हजार कोटींचा फंड उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. चीनमधून आयात होणाऱ्या खेळण्यांना स्वस्त पर्याय देण्याच्या दृष्टीने या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. या योजनेचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांवतवाडी येथील लाकडी खेळणी उद्याोगाला होऊ शकणार आहे. या निर्णयामुळे लाकडी खेळण्यांना चांगले दिवस येतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सावंतवाडीतील लाकडी खेळण्यांचे व्यापारी, कलावंत तसेच मोठ्या उद्याोजकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहेत.
लाकडी खेळणी बनवण्याच्या व्यवसायाची सुरुवात इथे कशी झाली?
सावंतवाडी येथे लाकडी खेळणी बनवविण्याच्या व्यवसायाची सुरुवात साधारणपणे १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली होती. तेलंगणातील कलाकारांनी ही कला सावंतवाडी येथे आणली. दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून गोवा राज्यात पेडणेपर्यंत सावंतवाडी संस्थानचा विस्तार होता. राजघराण्याने कलाकारांना या ठिकाणी आश्रय दिला. त्यामुळे लाकडी खेळणी बनविणाऱ्या कलाकारांचे माहेरघर म्हणून सावंतवाडी ओळखली जाऊ लागली. खेळणी तयार करण्यासाठी प्रामुख्याने लाखकाम आणि लाकडाचा वापर केला जात होता. आकर्षक रंगसंगती आणि सुबकता यामुळे ही खेळणी ग्राहकांच्या पसंतीस उतरू लागली.
या व्यवसायाची सद्या:स्थिती काय आहे?
आजही ही कला पारंपरिक स्वरूपात राजवाड्यात जोपासली जात आहे. सावंतवाडीतील गंजिफा कलेच्या कामासाठी सध्या राजवाडा परिसरात २५ कारागीर काम करीत आहेत. याशिवाय शहरातील चितारआळीत या वस्तूंच्या कार्यशाळा आहेत. ज्यामध्ये फळांचा राजा आंबा, तसेच काजूपासून सर्व प्रकारची फळे, देवपूजा करताना लागणारा पाट, लाकडी मंदिर, लहान मुलांना खेळायला लागणारी विविधांगी खेळणी या ठिकाणी बनवली जातात. ही खेळणी देशविदेशात पाठवली जातात. ज्यातून दरवर्षी लाखोंची उलाढाल होत असते. शिंगावरील नक्षीकाम, वाळ्याचे कशिदाकाम, भुंग्यांच्या पंखापासून केलेले मीनाकाम, धातूच्या वस्तूवरील कोरीवकाम ही सावंतवाडीची वैशिष्ट्ये होती. पण काळाच्या ओघात त्यातली काही लोप पावली.
राजघराण्याचे योगदान काय आणि कसे?
या लाकडी खेळण्यांसाठी सावंतवाडीच्या राजघराण्याचे मोठे आहे. खेम सावंत तिसरे यांच्या कारकीर्द या कलेला राजाश्रय प्राप्त झाला. श्रीमंत बापूसाहेब महाराज आणि त्यांच्यानंतर श्रीमंत शिवरामराजे भोसले यांनी या कलेचा वारसा जोपासला. दोघांनी स्वत: ही कला आत्मसात केली होती. काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या लाखकामाचे त्यांनी पुनरुज्जीवन केलं. या कामासाठी त्यांना पारितोषिकेही मिळाली होती. त्यांच्या पश्चात राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांनी हा वारसा सांभाळला. सावंतवाडी लॅकर वेअर्स या संस्थेची स्थापना करून त्यांनी या कलेला चालना दिली आणि कलाकारांना अर्थार्जनाचे साधन प्राप्त करून दिले. आता शुभदादेवी भोसले व श्रद्धाराजे भोसले हा वारसा पुढे नेत आहेत.
आगामी काळातील वाटचाल कशी असेल?
गंजिफा आर्ट असोसिएशन ऑफ सावंतवाडी या संस्थेच्या गंजिफा कलेला भारत सरकारकडून भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच सुतार समाज हस्तकला प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या संस्थेच्या माध्यमातून सावंतवाडीच्या जगप्रसिद्ध लाकडी खेळण्यांनाही जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या या कलेला संरक्षण मिळाले असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही या कलेला अधिक महत्त्व प्राप्त होऊ शकते. सद्या:स्थितीत काही निवडक कलाकारांच्या माध्यमातून सुरू असलेले हे काम भविष्यात लघुउद्याोगात परिवर्तित करण्याचा मानस आहे. ज्यातून १०० ते १५० कारागिरांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल.
काय होणे गरजेचे?
सावंतवाडीत बनणारी लाकडी खेळणी, गंजिफा, तसेच लाखकाम कला जिवंत ठेवण्यासाठी राजघराण्याने राजाश्रय दिला. आता केंद्र व राज्य सरकारने शासनाच्या माध्यमातून या कलांसाठीचे दालन निर्माण होईल असे पाहायला हवे. या कलानिर्मितीला सध्याच्या काळात फारशी मोठी बाजारपेठ उपलब्ध नाही. पण केंद्र व राज्य सरकारने शासनाच्या माध्यमातून बाजारपेठ मिळवून दिली गेली तर अनेक हात पुढे यायला तयार आहेत. त्यामुळे रोजगार निर्माण होईल आणि हे कारागीर आपल्या कलेचा वारसा पुढे चालवत राहतील.
abhimanyu.londhe@gmail.com