Pulwama Attack 14th Feb black day : १४ फेब्रुवारी २०१९ हा दिवस भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस मानला जातो. आजच्याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जहालवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या कारने केंद्रीय राखीव दलाच्या (CRPF) बसला लक्ष्य केलं होतं. या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या घटनेला सहा वर्ष पूर्ण झाली असली, तरी भ्याड हल्ल्याच्या जखमा आजही कोट्यवधी भारतीयांच्या मनात खोलवर रुजल्या आहेत. दरम्यान, पुलवामाचा हल्ला कसा झाला, तो कुणी केला होता, हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने बालाकोट एअर स्ट्राइकने कसा केला, याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुलवामा हल्ला कसा झाला होता?

पुलवामा हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली होती. यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आणखीच वाढत गेला. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी केंद्रीय राखीव पोलिस दलाचा ताफा जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून जात होता. या ताफ्यात २५०० हून अधिक निमलष्करी दलाचे जवान आणि ७८ वाहनांचा समावेश होता. त्याचवेळी अचानक २२ वर्षीय आदिल अहमद दार या दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यात घुसवली. एका बसला ही कार धडकताच मोठा स्फोट झाला.

पुलवामा हल्ल्यामागे कोणत्या संघटनेचा हात?

भारतीय सुरक्षा दलावर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता, ज्यामध्ये सीआरपीएफच्या ४० जवानांना दुर्दैवाने आपले प्राण गमवावे लागले. अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, सौदी अरेबिया, श्रीलंका आणि बांगलादेशसह जगभरातील अनेक देशांनी या भ्याड हल्ल्याचा जाहीरपणे निषेध केला. संयुक्त राष्ट्रातील सदस्यांनी दहशतवादाविरुद्धच्या युद्धात भारताला मदत करण्याचे आश्वासन दिले. या हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा हात होता. पुलवामाचा बॉम्बस्फोट घडवून आणणारा आदिल अहमद दार हा दक्षिण काश्मीर प्रदेशातील काकापोरा येथील मूळ काश्मिरी जिहादी होता.

आणखी वाचा : Anti Sikh Riots 1984 : कोण आहेत सज्जन कुमार? १९८४ च्या शीखविरोधी दंगलीत न्यायालयाने त्यांना दोषी का ठरवलं?

पुलवामा हल्ल्याचा कट कुणी रचला होता?

पुलवामाचा हल्ला घडवून आणण्यापूर्वी मुख्य सूत्रधार मोहम्मद उमर फारूख स्फोटकांचे प्रशिक्षण घेण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये गेला होता. दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्याला लक्ष्य करण्यासाठी एका कारचा उपयोग केला होता. त्यामध्ये जिलेटिन स्टिक्स, अॅल्युमिनियम पावडर, कॅल्शियम अमोनियम नायट्रेट आणि आरडीएक्ससह सुमारे २०० किलोग्रॅम प्रीमियम स्फोटके भरण्यात आली होती. मसूद अझहर, रौफ असगर आणि अम्मार अल्वी या जैश-ए-मोहम्मदच्या सदस्यांनी पुलवामा हल्ल्याचा कट रचला होता.

भारताने राबवलं ऑपरेशन बालाकोट

पुलवामामधील भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक करण्याची रणनीती आखली. घटनेच्या १२ दिवसांनंतर, २६ फेब्रुवारी २०१९ रोजी पहाटेच्या सुमारास भारतीय हवाई दलातील मिराज-२०० या लढाऊ विमानांनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली. पाकिस्तानच्या लष्कराला कुठलीही कुणकुण न लागू देता भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण तळावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त झाले, जे मसूद अझहरचा मेहुणा मौलाना युसूफ अझहर चालवत होता.

भारताचा दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राइक

सरकारी सूत्रांनुसार, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर एक हजार किलोपेक्षा जास्त बॉम्ब टाकले आणि जवळपास ३०० दहशतवाद्यांना ठार केले. १९७१ च्या युद्धानंतर पहिल्यांदाच भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी हद्दीत घुसून हल्ला केला. या मिशनचे नाव ऑपरेशन बंदर असं ठेवण्यात आलं होतं. ही कारवाई अत्यंत यशस्वी झाली, कुठल्याही भारतीय जवानाला यामध्ये दुखापत झाली नाही.

भारत-पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले

गुप्तचर अहवालांनुसार, जैश-ए-मोहम्मदने आणखी काही नियोजित हल्ले केले होते, परंतु भारताच्या प्रतिहल्ल्याला घाबरून त्यांनी शांत राहणेच पसंत केले. दरम्यान, या काळात भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत गेला. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हवाई दल आणि पाकिस्तान हवाई दलाच्या विमानांमध्ये झटापट झाली. यावेळी भारतीय हवाई दलातील मिग-२१ या लढाऊ विमानाने पाकिस्तानचे एफ-१६ हे विमान यशस्वीरित्या पाडले, परंतु या झटापटीत मिग-२१ देखील सीमेपलीकडे कोसळले.

भारतमातेचे सुपुत्र विंग कमांडर अभिनंदन वर्धमान

त्यावेळी भारतमातेचे सुपुत्र विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले. बिकट परिस्थिती असूनही अभिनंदन यांनी शांतता राखली. पाकिस्तानी लष्करातील अधिकारी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करीत होते. त्यांनी भारताचे मिशनही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, १ मार्च २०१९ रोजी भारताने दबाव टाकल्यानंतर पाकिस्तानने अभिनंद वर्धमान यांची सुखरुप सुटका केली. भारतात परतल्यानंतर अभिनंदन यांना त्यांच्या शौर्यासाठी वीरचक्र दिले गेले.

हेही वाचा : Who is Tulsi Gabbard : कोण आहेत तुलसी गॅबार्ड? अमेरिकेत दाखल होताच मोदींनी त्यांची भेट का घेतली?

पुलवामा येथील शहीदांना आदरांजली

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात देशासाठी बलिदान देणाऱ्या केंद्रीय राखीव दलाच्या ४० शूरवीर जवानांचे स्मरण आदराने केले जाते. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहिली. “२०१९ मध्ये पुलवामामध्ये आपण गमावलेल्या धाडसी वीरांना श्रद्धांजली. येणारी पिढी त्यांचे बलिदान आणि राष्ट्राप्रती त्यांचे अढळ समर्पण कधीही विसरणार नाही,” अशी पोस्ट पंतप्रधानांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही हल्ल्यात शहीद झालेल्या ४० सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, “२०१९ मध्ये याच दिवशी पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. दहशतवाद हा संपूर्ण मानवतेचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि संपूर्ण जग त्याच्याविरोधात एकजूट झाले आहे. मोदी सरकारने दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा दृढनिश्चय केला आहे.”

गेल्या पाच वर्षांत सीआरपीएफमध्ये मोठे बदल

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रायझिंग काश्मीरला सांगितले की, “गेल्या पाच वर्षांत आमच्याकडे असलेल्या उपकरणांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. आमची तयारी दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याची खात्री देते. आता ड्रोनद्वारे पाळत ठेवून लष्कराच्या ताफ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते. सुरक्षितता वाढवण्यासाठी जवानांना बुलेटप्रूफ बंकरमध्ये नेले जात आहे. आधुनिक सुरक्षा पद्धतींनुसार जवानांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. संभाव्य हल्ले टाळण्यासाठी नवीन मानक कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.