देशभरात पावसाचा जोर वाढला आहे. भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज घेऊन महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुणे आणि मुंबई यांसारख्या अनेक शहरांना भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी आपत्तीव्यवस्थापन पथकाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. बहुतांश भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी (२५ जुलै) पावसाशी संबंधित घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याने गुरुवारी मुंबई आणि उपनगर ठाणेसाठीही सतर्कतेचा इशारा दिला असून, मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पावसाने पुणे आणि मुंबईतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे

मुसळधार पावसामुळे पुणे आणि कोल्हापुरातील अनेक भाग जलमय झाले असून दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे शहराव्यतिरिक्त पिंपरी चिंचवड, भोर, वेहळे, मावळ मुळशी आणि खडकवासला या भागांत शाळा बंद करण्याचा आदेश लागू करण्यात आला आहे. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात गुरुवारी पावसाशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला.

पुण्यातील खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने वाहत आहे. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : Cocaine Sharks: शार्कमध्ये आढळले चक्क कोकेन, याचा सागरी जीवनावर कसा परिणाम होणार? यासाठी कारणीभूत कोण?

पुराचे पाणी असलेल्या रस्त्यावरून हातगाडी काढण्याच्या प्रयत्नात डेक्कन जिमखाना परिसरात आज पहाटे तीन जणांचा वीज पडून मृत्यू झाला. रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते अभिषेक घाणेकर, आकाश माने आणि शिवा परिहार अशी मृतांची नावे आहेत. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, पावसामुळे मावळ तहसीलच्या आदरवाडी गावात भूस्खलनात एकाचा मृत्यू झाला.

एनडीआरएफने पुण्यातील वारजे, सिंहगड रोड आणि एकता नगर भागात बचाव कार्यात मदत करण्यासाठी तीन पथके पाठवली आहेत. पावसानंतर पाण्याची पातळी वाढली, मुठा नदीवरील भिडे पूल पाण्याखाली गेल्याने रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे किंवा इतर भागात पूर आल्यास भारतीय हवाई दल आणि लष्कराला सूचना देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार आता मंत्रालयात असून अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहेत, असे वृत्त ‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिले आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे ४८ तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत. शिवाय, पूर येऊ शकतील अशा पुलांवर वाहनांना परवानगी दिली जाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घरात राहण्याचे आणि गरज असेल तेव्हाच बाहेर जाण्याचे आवाहन केले आहे. ‘आयएमडी’च्या अंदाजानुसार, पुण्यात शुक्रवारपर्यंत घाट भागात जोरदार पाऊस आणि मैदानी भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १ जून ते २४ जुलै २०२४ या कालावधीत पुणे जिल्ह्यात ५६७.२ मिलिमीटर पाऊस झाल्याचे हवामान खात्याचे सांगणे आहे.

मुंबई

मुसळधार पावसाचा मुंबईलाही मोठा फटका बसला आहे. गुरुवारी मुंबईतील काही भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने गुरुवारी सकाळी ७ वाजता जारी केलेल्या चेतावणीमध्ये मुंबईत ५० ते ६० किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वाऱ्यांसह पावसाच्या मध्यम ते तीव्रतेचा अंदाज वर्तवला आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. ‘आयएमडी’ने आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला असून शुक्रवारपर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

‘आयएमडी’ने आज मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला असून शुक्रवारपर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (छायाचित्र-पीटीआय)

मुसळधार पावसामुळे अनेक उड्डाणे उशिरा, तर काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ‘इंडिगो’ने म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे फ्लाइटच्या वेळापत्रकात सारखा बदल होत आहे. यात प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी फ्लाइटची स्थिती तपासण्यासही सांगण्यात आले आहे. एअर इंडिया आणि स्पाइसजेटनेही असेच आवाहन केले आहे. सायन, चेंबूर आणि अंधेरी यांसारख्या अनेक भागांत पूर आला आहे आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी दोन तलाव ओसंडून वाहत आहेत, अशी माहिती ‘एनडीटीव्ही’ वृत्त वाहिनीने दिली आहे. पुरामुळे अंधेरी भुयारी मार्गातून जाणारी वाहने बंद झाली आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने सांगितले की, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तानसा तलाव, तुळशी तलाव, मोडक-सागर तलाव आणि विहार तलाव आज ओसंडून वाहू लागले. मुंबईतील वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) च्या बिझनेस हबजवळील मिठी नदीत एक मगर दिसली आहे. हे वृत्त पसरताच वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकांनी घाबरून जाऊ नये. मुंबई वन विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वाइल्डलाइफ ॲनिमल प्रोटेक्शन अँड रेस्क्यू असोसिएशन (RAWW) चे अतुल कांबळे यांनी मंगळवारी या भागाला भेट दिली आणि वन नियंत्रण केंद्राला सूचित केले.

बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या टिम रवाना

प्राप्त अहवालानुसार, मुंबईसाठी एनडीआरएफच्या पाच टीम, नागपूरमध्ये एनडीआरएफची एक टीम आणि चार एसडीआरएफ टीम आणि धुळ्यासाठी तीन एसडीआरएफ टीम रवाना करण्यात आल्या आहेत. लवासा शहरातही एनडीआरएफची एक टीम रवाना झाली आहे. ‘आयएमडी’च्या अंदाजानुसार, मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३० अंश सेल्सिअस आणि २५ अंश सेल्सिअस राहील. मुंबई शहर आणि उपनगरांचा समावेश असलेल्या उत्तर कोकण हवामान उपविभागात ३० जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

ठाणे, पालघर

गुरुवारी ‘आयएमडी’ने पालघर, रायगड आणि ठाणेसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बुधवारी पालघर, ठाणे आणि कल्याणमध्ये मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. मुलुंड, ठाणे तसेच कल्याणमधील इतर भाग जलमय झाले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (केडीएमसी) रहिवाशांना शक्य असल्यास घरातच राहण्यास सांगितले. ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये आज बंद आहेत.

लोणावळा, कोल्हापूर

लोणावळ्यातील ढगफुटीसदृश परिस्थितीची छायाचित्रे सोशल मीडियावर दिसू लागली. मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे पुणे-बेंगळुरू महामार्ग तसेच कोल्हापूर-रत्नागिरी आणि कोल्हापूर-गगनबावडा भागांसह राज्य महामार्ग बंद करण्यात आले. पंचगंगा नदीची पाणीपातळी ४१ फुटांवर पोहोचल्याचे, वृत्त ‘न्यूज १८’ने दिले. ‘आयएमडी’च्या अंदाजानुसार रायगड आणि रत्नागिरीमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.

हेही वाचा : INS ब्रह्मपुत्रा पुन्हा वापरात येणार की मोडीत निघणार?

विविध शहरांमध्ये अलर्ट

रेड अलर्ट : पालघर, पुणे, रायगड, सातारा

ऑरेंज अलर्ट: नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग

यलो अलर्ट: जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune mumbai heavy rainfall alert rac
Show comments