Pune Porsche Accident Case: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याने अपघात घडला असल्याची माहिती प्रथमदर्शनी पुढे आली. १९ मे रोजी बेदरकारपणे चालवलेल्या आलिशान मोटारीला धडकून दोघांचा जागीच मृत्यू झाला. अल्पवयीन आरोपीला निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन मंजूर झाल्यानंतर हे प्रकरण विशेषत: अधिकच चर्चेत आले. त्यावर समाजामधून रोष व्यक्त होऊ लागल्यावर कारवाईची सूत्रे गतीने हलू लागली. त्यानंतर आरोपीच्या वडिलांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही झाली. आता या प्रकरणामध्ये आणखी काही धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत.
या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आता डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांवरून आता या प्रकरणाला फाटे फुटले आहेत. मात्र, अपघात घडल्यानंतर आरोपीच्या रक्ताचे नमुने तातडीने का घेतले पाहिजेत आणि जर ते घेतले नाहीत तर नेमके काय होते, याविषयी तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी याविषयीच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली आहेत.
हेही वाचा : Exit Poll: ‘एक्झिट पोल’ म्हणजे काय? निकालाचा अंदाज कसा लावला जातो?
अशा अपघातानंतर आरोपीच्या रक्ताचे नमुने कधी घ्यायला हवेत?
अपघात घडल्यानंतर दहा तासांच्या आतच आरोपीच्या रक्ताचे नमुने घेणे गरजेचे असते, अन्यथा वेळ जाईल तसतसे शरीरातील मद्यांशाचे प्रमाणही कमीकमी होत जाते; यालाच शास्त्रीय भाषेत ‘वॉशिंग रेट ऑफ अल्कोहोल’ (Washing Rate Of Alcohol) असे म्हणतात. सामान्यत: अल्कोहोलचा वॉशिंग रेट हा १०-१५ मिलीग्रॅम / १०० मिलीलीटर / तास इतका असतो. म्हणजेच १०० मिलीलीटर रक्तामध्ये दर तासाला १०-१५ मिलीग्रॅम दारुचे प्रमाण कमी कमी होत जाते, हे सामान्य प्रमाण आहे. मात्र, व्यक्तीपरत्वे यामध्ये बदलही होऊ शकतो. काहींमध्ये वेळेनुसार अधिक गतीने तर काहींमध्ये मंद गतीने दारुचे प्रमाण कमी होऊ शकते. विशेषत: तरुण मुलांमध्ये दारुचे प्रमाण कमी होत जाण्याचे प्रमाण हे प्रौढ पुरुष आणि स्त्रियांपेक्षा अधिक असते. १०-१५ मिलीग्रॅम / १०० मिलीलीटर / तास हे सरासरी प्रमाण आहे. रक्ताच्या नमुन्यामध्ये असलेल्या दारुच्या प्रमाणावरून अपघातसमयी आरोपीच्या शरीरात दारुचे किती प्रमाण होते, याची पडताळणी करता येते. घटनेच्या दहा तासांनंतरही रक्तातील दारुचे प्रमाण तपासता येऊ शकते. रक्तामध्ये सापडलेल्या तुरळक मद्यांशांच्या प्रमाणाचा आधार घेत ही तपासणी केली जाऊ शकते. मात्र, अशा प्रकारची तपासणी फारशी विश्वासार्ह नसते.
रक्ताचे नमुने घेईपर्यंत शरीरातील अल्कोहोल विरघळून पूर्णपणे नष्ट झाले तर?
रक्तातील दारुची पातळी शून्य असल्याचे आढळले तरीही आरोपीवरील मद्यपान केल्याचा संशय खोटा ठरत नाही. इतरही अनेक पुरावे महत्त्वाचे ठरतात. या पुराव्यांना आधार म्हणून फॉरेन्सिक डॉक्टरांनी सादर केलेला मद्यांशांसंबंधीचा अहवाल न्यायालयात सादर केला जातो. आरोपीने किती प्रमाणात मद्यप्राशन केले आहे हे सिद्ध करण्यासाठी इतर अनेक पुरावे महत्त्वाचे ठरू शकतात. जसे की, बारमधील सीसीटीव्ही फुटेज, कर्मचाऱ्यांनी दिलेली साक्ष, दारु प्यायल्यानंतर केलेला व्यवहार आणि बिले इत्यादी गोष्टी पुरावे म्हणून महत्त्वाची ठरतात. आरोपीने सेवन केलेल्या पेयांची संख्या पाहून अपघातप्रसंगी त्याच्या शरीरात मद्यांशाची पातळी किती होती, याचा शोध सहजपणे घेतला जाऊ शकतो. पुणे पोर्श अपघात प्रकरणात, आरोपीच्या रक्तातील दारुची पातळी निश्चित करण्यासाठी अशा प्रकारच्या पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो. न्यायालयालादेखील ही पद्धती मान्य आहे. अगदी १९९९ च्या बीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरणातही असेच काहीसे घडले होते. या प्रकरणामध्ये दिल्लीतील सहा लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील आरोपींचे नमुने १४ तासांनंतर गोळा केले गेले होते. विशेष म्हणजे या घटनेनंतरही आरोपींनी मद्यप्राशन केले होते. तेव्हा त्या प्रकरणामध्ये एकूण सर्व पुराव्यांच्या आधारावर आरोपींनी किती मद्यप्राशन केले होते, याची गणती करणे शक्य झाले होते.
हेही वाचा : ऑपरेशन ब्लू स्टार अन् पवित्र ग्रंथाची चोरी; पंजाबच्या राजकारणात १ जून तारीख का महत्त्वाची?
रक्ताच्या नमुन्यांमध्ये होणारी छेडछाड कशी टाळता येईल?
छेडछाड रोखण्यासाठी रक्ताचे नमुने सीलबंद करून अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले जातात. तरीही रक्ताच्या नमुन्यांशी छेडछाड करणे शक्य आहे. विशेषतः जेव्हा ते नमुने कोणत्याही कारणास्तव एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सुपूर्द केले जातात, तेव्हा हे प्रकार घडू शकतात. म्हणूनच ‘एम्स’कडे आता रक्तातील दारुची पातळी मोजण्यासाठी एक मशीन उपलब्ध आहे, जेणेकरून रक्ताचे नमुने तपासणीसाठी बाहेर पाठवावे लागणार नाहीत.