यंदा वेळेत दाखल झालेल्या मोसमी पावसामुळे पुणे व परिसरातील बहुतांश धरणांत समाधानकारक पाणीसाठा झाला असून, अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र यासाठी पुरेशी खबरदारी न घेतल्यास गंभीर परिस्थिती उद्भवते असेही दिसून आले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पश्चिम घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. त्यामुळे पुणे व परिसरातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. धरणांतील पाणी मोजण्याची एकके, विसर्ग म्हणजे काय, विसर्ग करण्याचा निर्णय कोण घेते, पूरनियमन, विसर्गाची पूर्वतयारी, सर्वसाधारण स्तर, दक्षता स्तर, धोका स्तर आणि आपत्ती स्तर याबाबतची कार्यपद्धती याबाबत…
पाणीसाठा कसा मोजतात?
कमी प्रमाणात साठविलेले पाणी आपण लिटरमध्ये मोजतो. मात्र, वाहते पाणी मोजण्याची क्युसेक आणि क्युमेक अशी दोन एकके आहेत. एक फूट गुणिले एक फूट गुणिले एक फूट म्हणजे एक घनफूट पाणी. एक घनफूट म्हणजे २८.३१ लिटर पाणी. एक हजार दशलक्ष घनफूट म्हणजे एक टीएमसी पाणी. धरणांतून पाणी सोडताना, म्हणजेच विसर्ग करताना ते क्युसेकमध्ये मोजले जाते. क्यु आणि सेकंद या दोन शब्दांनी मिळून क्युसेक हा शब्द तयार झाला आहे. एक घनफूट प्रतिसेकंद याचा अर्थ क्युसेक होतो. क्युमेक एककात पाणी घनमीटरमध्ये मोजले जाते. एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. एक क्युमेक पाण्याचा विसर्ग म्हणजे एका सेकंदात एक हजार लिटर पाणी धरणातून बाहेर पडते.
हेही वाचा : उत्तर प्रदेशात जातीय संतुलनासाठी समाजवादी पक्षाची खेळी? विरोधी पक्षनेतेपदी ब्राह्मणाची नियुक्ती…
पाण्याचा विसर्ग का करावा लागतो?
कोणत्याही धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून सर्व मार्गांनी धरणात जमा होणाऱ्या एकूण पाण्याला ‘येवा’ म्हटले जाते. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार ‘येवा’ निश्चित केला जातो. या आधारे धरण कधी आणि किती दिवसांत किंवा वेळेत भरले जाईल, याचा अंदाज बांधला जातो आणि त्यानुसार धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातो. संबंधित धरणातून पाण्याचा विसर्ग न केल्यास धरणाला धोका पोहोचू शकतो.
विसर्गाचे प्रारूप कसे ठरते?
जलसंपदा विभागाकडून पुराच्या अनुषंगाने नियोजन करण्यात येते. त्यामध्ये गेल्या ३०-४० वर्षांत नदीला आलेल्या पुराचा अभ्यास केला जातो. दर १५ दिवसांत किती पाणी आले, याचे गणितीय प्रारूप तयार केले जाते. गेल्या ४० वर्षांत १ ते १५ जून या कालावधीत किती पाऊस पडला आणि किती पूर आला, याची ४० वर्षांची सरासरी काढली जाते. त्यानंतर १६ ते ३० जून, याप्रमाणे १५ ऑक्टोबरपर्यंत, म्हणजेच जून ते ऑक्टोबरपर्यंतचे दर १५ दिवसांचे गणितीय प्रारूप तयार केले जाते. यावरून या पंधरवड्यामध्ये धरणात किती पाणी येऊ शकते, याचा अंदाज येऊ शकतो. १५ ऑक्टोबरला सर्व धरणे १०० टक्के भरलेली हवीत, असे जलसंपदा विभागाचे नियोजन असते. या नियोजनाचा प्रारंभबिंदू १ जून, तर शेवटचा बिंदू १५ ऑक्टोबर आहे. या काळात नियोजनात धरणदेखील १०० टक्के भरले पाहिजे आणि पूर नियमन (पुरामुळे कमीत कमी हानी) झाले पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थापन करावे लागते.
हेही वाचा : भारताकडे येणारी मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे रोखली जाणार? काय आहे ‘फेज-टू मिसाइल डिफेन्स’ प्रणाली?
विसर्गाचे प्रमाण कसे ठरते? निर्णय कुणाचा?
राज्यातील प्रत्येक धरणात प्रत्येक दिवशी किती पाणी ठेवायचे, त्यापेक्षा जास्त पाणी आल्यास ते सोडून द्यायचे, असे नियोजन केलेले असते. प्रत्येक धरणाची स्थिती वेगळी असते. गेल्या ४० वर्षांत संबंधित धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस, धरणात आलेले पाणी यावरून धरणातील विसर्गाचे प्रमाण ठरविण्यात येते. धरण सुरक्षा संघटनेने धरणे सुरक्षा नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये संबंधित धरणाच्या गेल्या ४० वर्षांतील ठोकताळ्यांनुसार पाणी सोडण्याचे वेळापत्रक तयार करण्याचे अधिकार मुख्य अभियंत्यांना देण्यात आले आहेत. हे वेळापत्रक एकदा मंजूर केल्यानंतर संबंधित धरणाचा कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहायक अभियंता हे वेळापत्रकाची अंमलबजावणी करतात. एकूण खोऱ्याची जबाबदारी मात्र मुख्य अभियंत्याकडे असते.
पूरस्थिती हाताळण्याची कार्यपद्धती कशी असते?
पूरस्थिती हाताळण्याचे सर्वसाधारण, दक्षता, धोका आणि आपत्ती असे चार स्तर आहेत. पूर्वतयारी स्तरात शाखा अभियंता/उपअभियंत्यांनी जलसंपदा विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाला माहिती द्यायची असते. सर्वसाधारण स्तरात कार्यकारी अभियंत्याने अधीक्षक अभियंत्याला, दक्षता स्तरात कार्यकारी-अधीक्षक-मुख्य अभियंता यांना माहिती द्यायची आणि अधीक्षक अभियंत्याने प्रसारमाध्यमांना माहिती देणे अपेक्षित आहे. धोका स्तरात कार्यकारी-अधीक्षक-मुख्य अभियंता-विभागीय आयुक्त-प्रधान सचिव-मुख्यमंत्री अशी माहिती दिली जाते, तर आपत्ती स्तरात राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी केंद्र, लष्कर, नौदल, हवाई दलाला माहिती द्यायची असते.
हेही वाचा : विश्लेषण: संत्र्याच्या निर्यातीचा प्रश्न अनुत्तरित का?
२४, २५ जुलै रोजी पुण्यात काय घडले?
गेल्या आठवड्यात २४ आणि २५ जुलै या दोन दिवशी शहरासह जिल्ह्यात आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २४ जुलैच्या रात्रीपासून २५ जुलैच्या सायंकाळपर्यंत चारही धरणांत तब्बल साडेतीन टीएमसी पाणीसाठा जमा झाला. पुणे शहराला दरमहा एक ते सव्वा टीएमसी पाण्याची गरज भासते. त्यामुळे सुमारे तीन महिन्यांचा पाणीसाठा एका दिवसात जमा झाला. चारही धरणांच्या परिसरात हंगामातील विक्रमी पावसाची नोंद झाली. परिणामी, खडकवासला धरणातून ४० हजार क्युसेक वेगाने मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. खडकवासला धरणातून मुठा नदीत २४ जुलैच्या सायंकाळी ९,४१६ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. मात्र, मुसळधार पाऊस सुरूच असल्याने रात्री ११.३० वाजता ११ हजार ५५६ क्युसेक, रात्री एक वाजता १६ हजार २४७ क्युसेक, रात्री दोन वाजता २० हजार ६९१ क्युसेक, पहाटे तीन वाजता २२ हजार ८८० क्युसेक, पहाटे चार वाजता २७ हजार २०३ क्युसेक आणि सकाळी सहा वाजता ३५ हजार ५७४ क्युसेक आणि २५ जुलैच्या सायंकाळपर्यंत विसर्ग ४० हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला.
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात गेल्या पाच वर्षांतील हा सर्वाधिक विसर्ग ठरला. परिणामी, मुठा नदीकाठच्या दोन्ही किनाऱ्यांवरील नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले.
prathamesh.godbole@expressindia.com