खलिस्तान समर्थक आणि ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याला पंजाब पोलिसांनी अखेर अटक केली आहे. मार्च महिन्यापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील रोडे गावातून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोडे गावातील जनम अस्थान संत खालसा गुरुद्वारा येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. १९८४ साली अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील कारवाईत मारला गेलेला जर्नेलसिंग भिंद्रनवालेदेखील मूळचा रोडे याच गावातील रहिवासी होता. याच पार्श्वभूमीवर अमृतपालसिंगवर काय आरोप आहेत? मागील काही दिवसांपासून तो का चर्चेत आहे? हे जाणून घेऊ या.
अमृतपालसिंगवर अटकेची कारवाई, पोलिसांनी दिली माहिती
अमृतपालसिंग याला रविवारी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची माहिती पोलीस महानिरीक्षक सुखचैनसिंग यांनी दिली आहे. “पोलिसांना अमृतपालच्या ठिकाणाबद्दल निश्चित माहिती मिळाली होती. त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. रोडे गावातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे,” असे सुखचैनसिंग यांनी सांगितले आहे. दरम्यान, अटकेच्या काही तास अगोदर अमृतपालने एक व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओत तो पंजाब सरकार तसेच पंजाब पोलिसांवर टीका करताना दिसत आहे. तो या व्हिडीओत पंजाब पोलिसांपासून दूर पळण्याच्या कृतीचे समर्थन करत आहे. तसेच मागील महिन्यात पंजाबमधील आप सरकारचा खरा चेहरा उघडा पडला आहे, असेही अमृतपालसिंग या व्हिडीओमध्ये म्हणत आहे. अमृतपालसिंग फरार असल्यामुळे १८ मार्चपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएसए) त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यासह खून, अपहरण, खंडणी यांसारख्या अनेक गुन्ह्यांची त्याच्याविरोधात नोंद आहे.
हेही वाचा >> ५ वेळा आमदार अन् ६० पेक्षा अधिक गुन्हे, उत्तर प्रदेशमधील गँगस्टर-राजकारणी मुख्तार अन्सारींची पंजाबमध्ये चर्चा; नेमकं कारण काय?
भिंद्रनवालेसारखे दिसण्यासाठी केली सर्जरी?
अमृतापालसिंग २०२२ साली दुबईतून भारतात आला होता. तेव्हापासून त्याने पंजाबमधील लोकांना भाषणांच्या माध्यमातून भडकविण्यास सुरुवात केली होती. अमृतपालसिंग लोकांना शस्त्र चालविण्याचेही शिक्षण देत होता. अमृतपालसिंग तसेच त्याच्या या कारवायांमुळे पंजाबमध्ये अस्वस्थता पसरली होती. २९ वर्षीय अमृतपालसिंग १९८४ साली अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील कारवाईत मारल्या गेलेल्या जर्नेलसिंग भिंद्रनवालेला आपला आदर्श मानतो. तो भिंद्रनवालेसारखेच कपडे परिधान करतो. तसेच भिंद्रवालेसारखेच बोलण्याचा, राहण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न करतो. मिळालेल्या माहितीनुसार भारतातून परतण्याआधी तो जॉर्जिया येथे गेला होता. तेथे भिंद्रनवालेसारखे दिसण्यासाठी त्याने स्वत:वर कॉस्मेटिक सर्जरी करून घेतली होती.
अमृतपालसिंगचा उदय कसा झाला?
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान अमृतपालसिंग पहिल्यांदा चर्चेत आला. कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाचा भाग असलेल्या दीप सिद्धूचा तो समर्थक होता. दीप सिद्धूने २०२१ साली प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर निशाण साहीब झेंडा फडकवला होता. याच कारणामुळे सिद्धू चर्चेत आला होता. या काळात अमृतपालसिंग दुबईमध्ये राहायचा. येथे तो आपल्या कुटुंबाचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सांभाळायचा. अमृतपालसिंगचे कुटुंबीय अमृतसरमधील जल्लूपूर येथील रहिवासी आहेत.
हेही वाचा >> युरोपमध्ये उष्माघातामुळे २०२२ मध्ये तब्बल १५ हजार नागरिकांचा मृत्यू; जागतिक हवामान संस्थेने दिला इशारा
दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर अमृतपालसिंग वारीस पंजाब दे संघटनेचा प्रमुख
फेब्रुवारी २०२२ मध्ये दीप सिद्धू याचा अपघातात मृत्यू झाला. या घटनेच्या काही महिन्यांनंतर म्हणजेच सप्टेंबर २०२२ मध्ये अमृतपालसिंग दुबईतून भारतात परतला. त्यानंतर दीप सिद्धू याच्या वारीस पंजाब दे या संघटनेचा तो प्रमुख झाला. भिंद्रनवाले याच्या रोडे या गावातच दीप सिद्धू याने या संघटनेचे प्रमुखपद स्वीकारले. या वेळी त्याने आपल्या भाषणादरम्यन खलिस्तान झिंदाबाद, अशा घोषणा दिल्या होत्या.
पंजाबचे लोक अजूनही गुलाम- अमतृपालसिंग
रोडे येथील भाषणात बोलताना, “आपण सर्व पंजाबी लोक अजूनही गुलाम आहोत. जे स्वत:ला स्वंतत्र असल्याचे समजतात त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन स्वत:वर उपचार करून घ्यावेत. आपल्या हक्काचे पाणी पळवले जात आहे. आपल्या गुरूंचा अनादर केला जात आहे. अशा घटनांमध्ये जे लोक सहभागी असतील, त्यांना आम्ही पोलीस किंवा न्यायालयाकडे सुपूर्द करणार नाही. आम्हीच त्यांना शिक्षा देऊ,” असे अमृतपालसिंग म्हणाला होता.
हेही वाचा >> विश्लेषण : चीनची लोकसंख्यावाढ मंदावली… पण जगाला याची चिंता का वाटते?
सोशल मीडियामुळे अमृतपालसिंगला प्रसिद्धी
अमृतपालसिंग फेसबूक तसेच अन्य समाजमाध्यमांवर लाईव्ह येऊन त्याच्या समर्थकांना उपदेश द्यायचा. याच कारणामुळे त्याला कमी काळात जास्त प्रसिद्धी मिळाली. तो आपल्या भाषणात पंजाबमधील प्रादेशिक तसेच राष्ट्रीय पक्षांवर सडकून टीका करायचा. तसेच स्त्रीवादी, सामाजिक कार्यकर्ते यांनादेखील तो लक्ष्य करायचा. विशेष म्हणजे खलिस्तानचे समर्थन करणाऱ्या ‘दल खालसा’ अशा काही संघटनांवरही तो टीका करायचा.
माझ्या भावाचा अमृतपालसिंगकडून गैरवापर- मनदीपसिंग सिद्धू
अमृतपालसिंग वारीस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख झाल्यानंतर दीप सिद्धूच्या कुटुंबीयांनी या संघटनेपासून तसेच अमृतपालसिंगपासून स्वत:ला दूर केले. या निर्णयाबाबत दीप सिद्धू याचे बंधू मनदीपसिंग सिद्धू यांनी सविस्तर सांगितले आहे. “माझ्या भावाने समाजकार्यासाठी ही संघटना उभी केली होती. या संघटनेच्या माध्यमातून पंजाबमधील प्रश्न हाताळता येतील, ज्या लोकांना कायदेशीर मदतीची गरज असेल, अशा लोकांना मदत पुरवता येईल, असा उद्देश समोर ठेवून ही संघटना उभारण्यात आली होती. खलिस्तानचे समर्थन करणे, हा या संघटनेचा उद्देश नव्हता. पंजाबला अस्थिर करण्याची भाषा अमृतपालसिंग बोलतो. तो पंजाबमधील लोकांना मूर्ख बनवत आहे. तो माझ्या भावाच्या नावाचा दुरुपयोग करत आहे,” असे मनदीपसिंग सिद्धू म्हणाले.
हेही वाचा >> विश्लेषण : आतिक अहमद हत्या प्रकरण : एखाद्या गुन्ह्याचा देखावा पोलीस का निर्माण करतात?
अमृतपालसिंगविरोधात कोणते गुन्हे आहेत?
अमृतपालसिंगविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. यातील सर्वांत पहिला गुन्हा याच वर्षी १६ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आला. त्याच्यावर अपहरण आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पुढच्याच आठवड्यात अमृतपालसिंगने त्याच्या समर्थकांसोबत अजनाला पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक पोलीस जखमी झाले होते. अपहरणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आपल्या सहकाऱ्याची सुटका करण्यासाठी अमृतपालसिंगने हा हल्ला केला होता. या प्रकरणी अमृतपालसिंगविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमतृपालसिंगने अनेक वाहनांना धडक दिल्याचा आरोप
१८ मार्च रोजी पोलिसांनी अमृतपालसिंगच्या मुसक्या आवळण्याची मोहीम सुरू केली. त्यानंतर अमृतपालसिंगवर शासकीय कर्मचाऱ्याच्या आदेशाचे पालन न करणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे अशा गुन्ह्यांखाली मेहतापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अमृतपालसिंग ज्या वाहनात बसलेला होता, त्या वाहनाने इतर अनेक वाहनांना धडक दिली होती. यामध्ये पोलिसांच्या वाहनाचाही समावेश होता.
हेही वाचा >> बिल गेट्स, शाहरुख खान ते विराट कोहली, सर्वांच्या ट्विटर खात्यावरील ‘ब्लू टिक’ गायब; जाणून घ्या ग्रे, गोल्डन टिक म्हणजे नेमकं काय?
खुनाची धमकी देणे, खंडणी मागितल्याचा आरोप
अमृतपालविरोधी मोहिमेदरम्यान पोलिसांनी त्याच्या सहकऱ्यांकडून शस्त्रे जप्त केली होती. याच कारणामुळे अमृतसर ग्रामीण पोलीस ठाण्यात अमृतपालसिंगविरोधात शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच वेगाने वाहन चालवणे, धमकी देणे, शासकीय अधिकाऱ्यांच्या कामात अडथळे आणणे अशा आरोपांखाली अमृतपालसिंगविरोधात खिलचियान पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. २१ मार्च रोजी अमृतपालसिंगविरोधात शहानकोट पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला. खुनाची धमकी देणे, दंगल घडवणे, अनधिकृतपणे जमाव जमवणे अशा वेगवेगळ्या आरोपांखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, पंजाब पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यामुळे आगामी काळात अमृतपालसिंगवर काय कारवाई केली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.