Punjab Thakurdwara Temple Blast : पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील खंडवाला परिसरात शुक्रवारी (तारीख १४ मार्च) रात्री अनोळखी व्यक्तींनी ग्रेनेड हल्ला केला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ठाकूरद्वारा मंदिरावर स्फोटकं फेकली. सुदैवानं या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, ग्रेनेड हल्ल्यामुळं मंदिराच्या पहिल्या मजल्याची भिंत, दरवाजे आणि काचेचं मोठं नुकसान झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असू शकतो, असा संशय पोलिस आयुक्त गुरप्रीत सिंह भुल्लर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी हा पोलिस चकमकीत ठार झाल्याची माहितीही पंजाब पोलिसांनी दिली आहे.
हल्लेखोरांनी ग्रेनेड हल्ला कसा केला?
पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतसर जिल्ह्यातील खंडवाला परिसरात ठाकूरद्वारा हे मंदिर आहे. शुक्रवारी मध्यरात्री या परिसरात दुचाकीवरून दोन अनोळखी आरोपी आले. त्यातील एकाने हँडग्रेनेड मंदिरावर फेकलं. ज्यावेळी हा हल्ला झाला, त्यावेळी मंदिराच्या वरच्या मजल्यावर पुजारी झोपले होते. त्यांनी वेळीच बाहेर धाव घेतल्यानं त्यांचा जीव वाचला. ग्रेनेडचा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूंच्या इमारतींच्या काचा फुटल्या. तसेच काही घरांना तडेही गेली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, या हल्ल्यामागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असू शकतो, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ग्रेनेड हल्ल्यामागे आयएसआयचा हात?
पंजाबचे पोलिस आयुक्त गुरप्रीत सिंह भुल्लर म्हणाले, “मंदिरावर ग्रेनेड हल्ला झाल्याची माहिती आम्हाला पहाटे २ वाजता मिळाली. आम्ही तत्काळ घटनास्थळी हजर झालो. फॉरेन्सिक टीमचे अधिकारीही आमच्याबरोबर होते. जेव्हा आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि जवळच्या लोकांशी बोललो. आम्हाला संशय आहे की, या हल्ल्यामागे आयएसआयचा हात असू शकतो. पंजाबमधील तरुणांची माथी भडकवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं असावं.” अमृतसरमधील तरुणांनी शांत राहावं, आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल, असं आश्वासनही पंजाब पोलिसांनी दिलं.
पंजाबचे मुख्यमंत्री काय म्हणाले?
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. “पंजाबमध्ये वेळोवेळी अस्वस्थता आणण्यासाठी काही घटकांकडून प्रयत्न केले जात आहेत. ड्रग्ज, गुंड व खंडणीखोर हे त्याचा भाग आहेत. पंजाब अशांत राज्य होत आहे, असं दाखवण्याचा हल्लेखोरांचा प्रयत्न आहे. होळीच्या सणाच्या वेळी, इतर राज्यांमध्ये, मिरवणुकांमध्ये पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला; पण पंजाबमध्ये अशा गोष्टी घडत नाहीत. पंजाब पोलिस सक्रिय आहेत. पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली आहे. हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.” असं मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटलं आहे.
भाजपाची ‘आप’ सरकारवर टीका
अमृतसर मंदिरात झालेल्या स्फोटामुळे पंजाबच्या आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारवर टीका होऊ लागली आहे. भाजपानं या ग्रेनेड हल्ल्याचा तीव्र निषेध करत राज्य सरकारवर टीका केली आहे. “होळीच्या पवित्र सणावर मंदिरावर झालेला ग्रेनेड हल्ला निंदनीय आहे. या दुर्घटनेकडे एक इशारा म्हणून पाहिलं पाहिजे. पंजाबची संपूर्ण सेना केजरीवाल यांच्या सुरक्षेत गुंतलेली आहे. दुसरीकडे, मंदिरावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या घटनेवरून हे स्पष्ट झाले आहे की, पंजाबचं वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी परदेशी हात आणि पंजाबचे झोपलेले सरकार जबाबदार आहे. राज्यातील जनतेला सुरक्षा देण्याऐवजी, आप सरकार अरविंद केजरीवाल यांचे स्वागत करण्यात व्यग्र आहे. आम्ही संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयला करण्याची विनंती करू”, असं भाजपा नेते तरुण चुघ यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसनेही केला घटनेचा निषेध
पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनीदेखील या हल्ल्यावरून आम आदमी पार्टीला लक्ष्य केलं आहे. “ग्रेनेड हल्ल्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातारण निर्माण झालं आहे. पंजाब सरकारनं गाढ झोपेतून जागे होऊन कारवाई करण्याची वेळ आली आहे.”, अशी पोस्ट वारिंग यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केली आहे. शिरोमणी अकाली दलानंही या ग्रेनेड हल्ल्याचा निषेध केला असून ही एक गंभीर आणि संवेदनशील घटना असल्याचं म्हटलं आहे.
“अमृतसरमधील ठाकूरद्वारा मंदिराजवळ झालेल्या स्फोटाच्या घटनेचा अकाली दल तीव्र निषेध करते. या परिसरातील हा १३ वा स्फोट आहे आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडल्याचा हा एक पुरावा आहे. मंदिरावर ग्रेनेड हल्ला झाल्यानं लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. दोषींची ओळख पटविण्यासाठी आणि या घटनेमागील कट उघड करण्यासाठी उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करावी,” असं अकाली दलानं मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
हेही वाचा : Sextortion: सेक्सटॉर्शन म्हणजे काय? ते कसे घडते?
पंजाबमध्ये ग्रेनेड हल्ल्यांची मालिका
गेल्या चार महिन्यांत पंजाबमध्ये १२ ग्रेनेड हल्ले झाले आहेत. गेल्या वर्षी १२ डिसेंबर रोजी हल्लेखोरांनी बटाला येथील घानिया के बांगर पोलीस ठाण्याला लक्ष्य केलं होतं. त्यानंतर २० डिसेंबर रोजी गुरुदासपूरमधील वडाळा बांगर पोलिस चौकीवर ग्रेनेड हल्ला झाला होता. जानेवारीमध्ये अमृतसरमधील गुमताळा पोलिस चौकी, जैंतीपूरमधील एका मद्य व्यापाऱ्याचं दुकान आणि बटाला येथील एका काँग्रेस नेत्याच्या बंगल्याजवळ अज्ञातांनी स्फोट घडवून आणला होता. इंडियन एक्स्प्रेसनुसार, हे हल्ले बहुतेकदा संघटित गुन्हेगारी, दहशतवादी गट आणि सीमापार नेटवर्कशी जोडलेले होते.
ग्रेनेड हल्ला करणारा आरोपी पोलिस चकमकीत ठार
दरम्यान, ठाकूरद्वारा मंदिरावर ग्रेनेड हल्ला करणारा एक आरोपी पोलिस चकमकीत ठार झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. वृत्तानुसार, पोलिसांनी सीटीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटवली होती. तेव्हा ग्रेनेड हल्ला करणारे दोन्ही आरोपी राजसांसी परिसरात दुचाकीवरून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक आरोपी ठार झाला. संशयिताची ओळख पटली असून त्याचं नाव गुरसिदक सिंह, असं आहे. आरोपीचा दुसरा साथीदार विशाल कुमार ऊर्फ चुई हा दुर्घटनास्थळावरून पळून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या दुर्घटनेत एक पोलिस कॉन्स्टेबलही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.