पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यातील लष्करी छावणीमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. बुधवारी सकाळी ४.३० वाजता घडलेल्या या घटनेत एकूण चार जवान शहीद झाले. लष्करी छावणीतील या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली असून, हल्ला नेमका कोणी केला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तपास यंत्रणा या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान भटिंडा येथील ही लष्करी छावणी देशातील सर्वांत मोठी छावणी असल्याचे म्हटले जाते. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भटिंडा छावणीचा विकास कसा होत गेला? या छावणीचा इतिहास काय आहे? हे जाणून घेऊ या.
५० एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर या छावणीचा विस्तार
लष्कराची देशातील सर्वांत मोठी लष्करी छावणी भटिंडा येथे आहे. ५० एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर ही छावणी विस्तारलेली आहे. भटिंडाला संपूर्ण देशाशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला लागूनच ही छावणी आहे. टेन कॉर्प्स या लष्करी तुकडीचे येथे मुख्यालय आहे. टेन कॉर्प्सला चेतक कॉर्प्सही म्हटले जाते. टेन कॉर्प्सवर दक्षिण पंजाब आणि राजस्थानच्या काही भागाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. त्यामुळे टेन कॉर्प्स आणि भटिंडा येथील लष्करी तळाला खूप महत्त्व आहे.
हेही वाचा >> अग्निपथ योजनेनंतर रखडलेली सैन्य भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार का दिला?
दक्षिण पंजाब आणि राजस्थानच्या काही भागाच्या संरक्षणाची जबाबदारी अगोदर ११ कॉर्प्सवर होती. त्यामुळे ही छावणी ११ कॉर्प्सच्या ताब्यात होती. ११ कॉर्प्सचे मुख्यालय जालंधर येथे आहे. १९७१ साली लष्करामध्ये काही बदल करण्यात आला. त्यानंतर भटिंडा येथे टेन कॉर्प्सच्या मुख्यालयाची निर्मिती करण्यात आली. लेफ्टनंट जनरल एमएल तुली हे टेन कॉर्प्सचे पहिले जनरल कमांडिंग ऑफिसर होते. त्यांनी १९७९ साली टेन कॉर्प्सच्या भटिंडा येथील मुख्यालयाची निर्मिती केली.
छावणी सध्या नागरी वस्तीने वेढली आहे
भटिंडा येथील लष्करी छावणीचा काळानुसार विकास होत गेला. येथे फक्त १० कॉर्प्सचे मुख्यालयच नाही तर इन्फन्ट्री, आर्म्ड, आर्टिलरी, आर्मी एव्हिएशन, इंजिनीअर्स, सिग्नल तसेच लष्करातील अन्य तुकड्याही आहेत. काही प्रमाणात लष्कराचा दारुगाळादेखील याच छावणीमध्ये ठेवला जातो. या शहराच्या विकासामुळे सध्या या छावणीला नागरी वस्तीने वेढलेले आहे.
पहिल्या महायुद्धादरम्यान ब्रिटिशांनी भटिंडा येथे लष्कर भरती केंद्र उभारले होते
भटिंडा या भागाला समृद्ध लष्करी इतिहास लाभलेला आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या आक्रमणकर्त्यांसाठी हा भाग नेहमीच मुख्य लक्ष्य राहिलेला आहे. या शहराच्या मध्यभागी ‘किल्ला मुबारक’ नावाचा एक किल्ला आहे. हा किल्ला या भागाचे लष्करी महत्त्व अधोरेखित करतो. सहाव्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला असावा, असे सांगितले जाते. काळानुसार या भागावर वेगवेगळ्या राजांनी राज्य केले. या सत्ताधाऱ्यांनी येथे आपल्या सोईनुसार बदल आणि विकास केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भटिंडा या भागावर ब्रिटिशांचे राज्य होते. महाराजा रणजितसिंग यांच्या आधिपत्याखाली हा भाग नव्हता. १९०० च्या दशकात ब्रिटिशांनी या भागाचे लष्करी महत्त्व ओळखले. पहिल्या महायुद्धादरम्यान ब्रिटिशांनी भटिंडा येथे लष्कर भरती केंद्र उभे केले होते. या भरती केंद्राच्या माध्यमातून अनेक युवकांनी पहिल्या महायुद्धामध्ये भाग घेतला होता. भारताचे विभाजन होण्याआधी उत्तर-पश्चिम सीमेचे संरक्षण करण्यासाठी भंटिडा हे महत्त्वाचे लष्करी केंद्र बनले होते.
हेही वाचा >> विश्लेषण: चिट फंड गुंतवणूक कितपत सुरक्षित? कायदेशीर तरतुदी कोणत्या?
विवाहित लष्करी अधिकाऱ्यांसाठी येथे निवासाची सुविधा
अलीकडच्या काळात भटिंडा या लष्करी छावणीमध्ये अनेक बदल झालेले आहेत. विवाहित लष्करी अधिकाऱ्यांसाठी येथे निवासस्थाने उभारण्यात आलेली आहेत. मागील काही वर्षांपासून या लष्करी छावणीमध्ये अनेक ठिकाणी बांधकाम झालेले आहे. मात्र तरीदेखील येथील बरीच जमीन उपयोगात आलेली नाही. ही जमीन ओस पडलेली आहे.
हेही वाचा >>विश्लेषण: ‘म्हाडा’च्या अर्थसंकल्पात काय? मागणीच्या तुलनेत प्रस्तावित घरे कमी का?
लष्करी छावणीत चोख बंदोबस्त
भटिंडा येथील छावणीच्या सुशोभीकरणासाठी लष्कराने बरीच मेहनत घेतलेली आहे. येथे अनेक सार्वजनिक सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत. भटिंडा येथील लष्करी छावणीमध्ये शॉपिंग एरिया, भोजनालये, कॅफे, पार्क्स उभारण्यात आलेली आहेत. याच कारणामुळे हा लष्करी भाग उर्वरित शहरापेक्षा वेगळा दिसतो. लष्करी छावणीमधून राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. त्यामुळे छावणीचे एक प्रकारे विभाजनच झालेले आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथे योग्य ती सर्व खबरदारी घेतली जाते. या लष्करी छावणीत अनेक चेकपॉइंट्स आहेत. ठिकठिकाणी येथे जवान तैनात केलेले आहेत. तसेच महामार्गावरही सैनिक उभे असतात.