पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लेप्टोस्पायरोसिस हा आजार झाल्याचे निदान झाले आहे. भगवंत मान यांची काही दिवसांपासून प्रकृती ठीक नव्हती. त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची रक्त तपासणी केल्यानंतर त्यांना लेप्टोस्पायरोसिस हा आजार झाला असल्याचे निदान झाले. हॉस्पिटलने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, मुख्यमंत्र्यांना प्रतिजैविक औषधे दिली जात आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. लेप्टोस्पायरोसिस हा आजार नक्की काय आहे? हा आजार कसा होतो? त्याची लक्षणे आणि उपाय काय? त्याविषयी जाणून घेऊ.

लेप्टोस्पायरोसिस म्हणजे काय?

लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जीवाणूंमुळे होणारा एक जीवाणू संसर्ग आहे. लेप्टोस्पायराचा संसर्ग माणसांसह प्राण्यांमध्येही होऊ शकतो. हा जागतिक स्तरावर प्रचलित असलेल्या झुनोटिक रोगांपैकी एक आहे. अस्वच्छता आणि जनावरांच्या किंवा दूषित पाण्याच्या किंवा दूषित मातीच्या संपर्कात आल्यास याचा संसर्ग होतो. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या मते, जीवाणू दूषित पाण्यात किंवा मातीमध्ये आठवडे ते महिने टिकून राहू शकतात. प्रामुख्याने हे जीवाणू संक्रमित प्राण्यांच्या लघवीद्वारे पसरतात. संक्रमित प्राण्याच्या लघवीच्या संपर्कात आल्याने, अन्न, पेय किंवा माती दूषित असल्यास त्याच्या संपर्कात आल्याने माणसांना लेप्टोस्पायरोसिस होऊ शकतो. लेप्टोस्पायरोसिसचे दोन प्राथमिक प्रकार आहेत. त्यातील पहिला प्रकार आहे इक्टेरिक लेप्टोस्पायरा. त्यात संक्रमित रुग्णाला कावीळ होऊ शकते आणि दुसरा प्रकार आहे ॲनिक्टेरिक लेप्टोस्पायरा. हा एक सौम्य प्रकार आहे. हा रोग त्वचेतून किंवा डोळे, नाक व तोंडातून माणसांच्या शरीरात प्रवेश करतो.

Diagnostic accuracy of capsule endoscopy
‘कॅप्सूल एंडोस्कोपी’द्वारे गंभीर आजाराचे अचूक निदान! ७३ वर्षीय वृद्धाचे वाचले प्राण;  जाणून घ्या अत्याधुनिक प्रक्रिया…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Health Special What exactly is insulin
Health Special : इन्सुलिनच्या जगात
diabetes insipidus in marathi
Health Special: डायबिटीस इन्सिपिडस म्हणजे काय?
Why antimicrobial resistance is a major challenge facing the healthcare sector
प्रतिसूक्ष्मजीव रोधकता हे आरोग्यक्षेत्रासमोरील मोठे आव्हान का आहे?
Sassoon hospital
बालकांच्या आनुवंशिक आजारांचे आता वेळीच निदान! ससूनमध्ये गरीब रुग्णांसाठी स्वस्तात सुविधा सुरू
diabetes, health issue, tips
Health Special: डायबिटीस होण्याची कारणं काय आहेत? – भाग १
doctor from Mumbai who was selling illegal drugs was arrested in Bhandara
पोतडीत औषध भरून उपचारासाठी लॉजवर यायचा मुंबईचा डॉक्टर; पोलिसांनी छापा टाकला अन् …
अस्वच्छता आणि जनावरांच्या किंवा दूषित पाण्याच्या किंवा दूषित मातीच्या संपर्कात आल्यास लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होतो. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : समुद्राची पातळी वेगानं वाढण्याची कारणं काय? जगातील कोणत्या भागांना सर्वाधिक धोका?

लेप्टोस्पायरोसिसचे संक्रमण

उष्ण कटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये लेप्टोस्पायरोसिस सर्वांत सामान्य आहे, विशेषत: अतिवृष्टी किंवा पुरानंतर. कारण- हे जीवाणू उबदार आणि ओलसर वातावरणात वाढतात. संसर्गाच्या सामान्य स्रोतांमध्ये नद्या, तलाव व पूरग्रस्त भागांचा समावेश होतो. दूषित पाण्यात पोहणे, शेतीत काम करणे किंवा अस्वच्छ भागात राहिल्याने या रोगाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. ‘झेन मल्टी स्पेशालिटी रुग्णालया’मधील सल्लागार फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट व संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ. विक्रांत शहा यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला स्पष्ट केले की, संक्रमित उंदराची दूषित लघवी पावसाच्या पाण्यात मिसळते आणि त्याद्वारे हे जीवाणू माणसांच्या शरीरात प्रवेश करू शकतात. तसेच, तोंड, नाक आणि डोळ्यांच्या श्लेष्मल त्वचेद्वारेदेखील हे जीवाणू शरीरात प्रवेश करू शकतात.

दूषित पाण्यात पोहणे, शेतीत काम करणे किंवा अस्वच्छ भागात राहिल्याने लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. (छायाचित्र-पीटीआय)

या आजाराची लक्षणे काय आहेत?

‘मेडस्केप’ या आरोग्य वेबसाइटनुसार, बहुतांश लोकांमध्ये लेप्टोस्पायरोसिसची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत; तर काहींमध्ये किरकोळ लक्षणे दिसतात. लेप्टोस्पायरोसिसच्या जीवाणूची लागण झाल्यानंतर या आजाराच्या त्रासात वाढ होण्यासाठी साधारणतः दोन ते ३० दिवसांचा कालावधी लागतो. रुग्णाला जीवाणूची लागण झाल्यानंतर खूप जास्त ताप येणे, डोळे लाल होणे (कंजेक्टिव्हल सफ्युजन), डोकेदुखी, कोरडा खोकला, मळमळ व अतिसार यांसारखी लक्षणे सुरुवातीला दिसून येतात. काही प्रकरणांमध्ये कावीळ, मूत्रपिंड, यकृत खराब होणे, मेंदूज्वर, श्वसन समस्या यांसारखी गंभीर लक्षणेही दिसून येतात. डॉ. शाह यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सांगितले, “कधी कधी फुप्फुसे आणि श्वसनमार्गातून तीव्र रक्तस्राव होतो. अशा परिस्थितीत रुग्ण खोकताना रक्त बाहेर पडते. श्वसन आणि मूत्रपिंड निकामी होऊ शकते, जे जीवघेणेदेखील असू शकते. काही रुग्णांमध्ये हा आजार काही दिवसांपर्यंत राहतो; तर गंभीर प्रकरणांमध्ये अनेक आठवडे राहू शकतो.

लेप्टोस्पायरोसिसच्या काही प्रकरणांमध्ये कावीळ, मूत्रपिंड, यकृत खराब होणे, मेंदूज्वर, श्वसन समस्या यांसारखी गंभीर लक्षणेही दिसून येतात. (छायाचित्र-रॉयटर्स)

लेप्टोस्पायरोसिसचा उपचार कसा केला जातो?

लेप्टोस्पायरोसिसचा उपचार प्रामुख्याने डॉक्सिसायक्लिन किंवा पेनिसिलिन यांसारख्या प्रतिजैविकांद्वारे (अँटिबायोटिक्स) केला जातो. ही प्रतिजैविके आजारपणाच्या सुरुवातीस दिल्यास सर्वांत प्रभावी ठरतात. बहुतांश रुग्ण यातून काही दिवसांत किंवा काही आठवड्यांत बरे होतात. लवकर उपचार न केल्यास प्रकरणे गंभीर पातळीपर्यंत पोहोचू शकतात. अधिक गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. अशा परिस्थितीत इंट्राव्हेन्स द्रवपदार्थ, ऑक्सिजन थेरपी किंवा मूत्रपिंड प्रभावित झाल्यास डायलिसिसद्वारे रुग्णांना बरे केले जाऊ शकते.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याविषयी फोर्टिस रुग्णालयाचे संचालक व कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आर. के. जसवाल सांगतात, “मान यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याची नोंद आहे. त्यांना अनियमित रक्तदाबाची समस्या निर्माण झाली होती, जी आता नियंत्रणात आहे.” डॉ. जसवाल यांनी मुख्यमंत्री लवकरच पूर्णपणे बरे होतील, अशीही माहिती दिली आहे.

हेही वाचा : इस्रायलने हसन नसरल्लाहच्या ठिकाणाचा शोध कसा घेतला? हिजबुल प्रमुखाला अमेरिकन बॉम्बने कसे ठार केले?

आजारापासून बचावासाठी काय खबरदारी घ्यायची?

लेप्टोस्पायरोसिस संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी अनेक गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. ‘सीडीसी’च्या म्हणण्यानुसार, लोकांनी पावसाळ्यात घाणेरड्या पाण्यातून जाणे टाळावे आणि गमबूट घालावेत. कोणत्याही दुखापती किंवा कीटक चावल्यास योग्य काळजी घ्यावी आणि वारंवार हात धुवावेत; विशेषत: काही खाताना. याव्यतिरिक्त लोकांनी आजारी दिसणार्‍या किंवा लेप्टोस्पायरोसिसचे वाहक असलेल्या प्राण्यांपासून दूर राहावे. तसेच ज्या व्यक्ती वारंवार पाणी किंवा वन्यप्राण्यांच्या संपर्कात येतात, त्यांनी लेप्टोस्पायरोसिसच्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी पाळीव प्राण्यांचे लसीकरण करणेदेखील महत्त्वाचे आहे. तसेच अशा व्यक्तींनी भरपूर पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच, घराभोवती पाणी साठून राहणार नाही याचीही काळजी घ्यावी. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, लोक लेप्टोस्पायरोसिस होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकतात.