रविवारी (३० एप्रिल) पंजाबमधील लुधियाना येथील ग्यासपुरा येथे वायुगळतीची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत एकूण ११ जणांचा मृत्यू झाला असून चार जणांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वायुगळतीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या घटनेचा तपास सुरू असून ही दुर्घटना नेमकी का घडली असावी? त्याची संभाव्य कारणे काय आहेत? आतापर्यंत पोलिसांच्या हाती काय लागले आहे? हे जाणून घेऊ या.
लुधियानामधील ग्यासपुरा येथे नेमके काय घडले?
लुधियानातील ग्यासपुरा परिसरात रविवारी वायुगळतीची घटना घडली. या घटनेनंतर येथे अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते. या दुर्घटनेमुळे अनेक नागरिक बेशुद्ध पडले होते. तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला. मात्र या दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जणांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा >> ‘देजा वू’ : आपल्या सोबत हे आधी घडलंय, असं तुम्हालाही कधीतरी वाटलं का? यामागचा तर्क आणि विज्ञान काय?
लुधियाना प्रशासनाने नेमके काय सांगितले?
लुधियानाच्या उपायुक्त सुरभी मलिक यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘एअर क्वालिटी सेन्सर्स’चा उपयोग केला जातो. या सेन्सर्सनुसार या भागातील हवेत हायड्रोजन सल्फाइड हा वायू आढळला आहे. हा वायू न्यूरोटॉक्झिन म्हणून काम करतो. हा वायू येथील वातावरणात नेमका कसा आला? याचा शोध घेतला जात आहे. वातावरणातील न्यूरोटॉक्झिन्समुळे येथे लोकांचा मृत्यू झाला आहे, असे वाटते. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहोत,” असे सुरभी मलिक म्हणाल्या.
लुधियानामध्ये नेमके काय घडले?
लुधियानामधील ग्यासपुरा या परिसरात मोठ्या प्रमाणात कारखाने असून येथे दाट लोकवस्ती आहे. या भागात गॅसगळती नेमकी का झाली याचा तपास केला जात आहे. मात्र मॅनहोल उघडे राहिल्यामुळे नाल्यातील गॅस दुकांनात आणि येथील घरांमध्ये गेल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात तशी नोंद केली आहे. विषारू वायूमुळे नागरिकांचा मृत्यू झाला आहे, असे शवविच्छेदनाच्या अहवालात सांगण्यात आले आहे.
हेही वाचा >> विश्लेषण: डिंग लिरेन पहिला चिनी बुद्धिबळ जगज्जेता! रशियन वर्चस्व संपुष्टात आले का? चिनी वर्चस्वाला भारत टक्कर देईल?
नाल्यात रासायनिक अभिक्रिया झाल्याने विषारी वायूची निर्मिती?
लुधियाना येथील शासकीय रुग्णालयातील फॉरेन्सिकतज्ज्ञ डॉ. चरण कमाल यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे. “या दुर्घटनेतील लोकांचा विषारी वायू शरीरात गेल्यामुळे मृत्यू झाला आहे. मात्र हा विषारी वायू नेमका कोणता आहे, हे व्हिसेरा तपासणीनंतरच समजेल. हायड्रोजन सल्फाइड हा वायू अतिशय विषारी असतो. हा वायू थोडा जरी शरीरात गेल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. कदाचित ॲसिडिक टाकाऊ पदार्थ नाल्यात फेकून देण्यात आले असावेत. या पदार्थातील घटकांची नाल्यातील मिथेन, कार्बन मोनॉक्साइड तसेच इतर विषारी वायूंसोबत रासायनिक अभिक्रिया झाली असावी. या रासायनिक अभिक्रियेच्या माध्यमातून हायड्रोजन सल्फाइड यासारखे विषारी वायू बाहेर पडले असावेत,” असे चरण कमल यांनी सांगितले.
विषारी वायू बाहेर जाण्यासाठी कोणतीही नीट व्यवस्था नव्हती?
पंजाब प्रदूषणविरोधी मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेदेखील यावर भाष्य केले आहे. “वायुगळती झालेल्या भागात हायड्रोजन सल्फाइड या वायूचे प्रमाण वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. या भागातील नाल्याची नीट स्वच्छता झाली नव्हती, हेच या दुर्घटनेतून स्पष्ट होते. त्या भागातील नाल्यांमध्ये वायू बाहेर जाण्यासाठी कोणतीही नीट व्यवस्था नव्हती,” असे या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >> विश्लेषण: मेळघाटातील बालमृत्यूंचा प्रश्न जटिल का बनला? या समस्येवर तोडगा का निघत नाही?
न्यूरोटॉक्झिन्स म्हणजे काय?
न्यूरोटॉक्झिन्स हे मानवी शरीरासाठी अतिशय घातक पदार्थ असतात. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित विषारी घटकांच्या संपर्कात आल्यास न्यूरोटॉक्झिन्स थेट मज्जासंस्थेवर परिणाम करतात. परिणामी मज्जासंस्थेच्या कामात अडथळा निर्माण होतो. यामुळे मज्जासंस्था, मज्जासंस्थेतील पेशी, न्यूरॉन्स यावर थेट परिणाम होऊ शकतो.
मानवी शरीरावर विषारी वायूचा कसा परिणाम होतो, याविषयी लुधियानामधील दयानंद वैद्यकीय महाविद्यालयातील अधीक्षक डॉ. संदीप गोयल यांनी सांगितले आहे. “विषारी वायू थेट मानवाच्या श्वसनसंस्थेवर परिणाम करतात. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्याचा मज्जासंस्थेवरही वाईट परिणाम होतो,” असे गोयल म्हणाले.
न्यूरोटॉक्झिन गॅस म्हणजे काय?
मिथेन, हायड्रोजन सल्फाइड, कार्बन मोनोऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड हे न्यूरोटॉक्झिन गॅस (वायू) आहेत. मिथेन आणि कार्बन मोनोऑक्साइड अशा गॅसेसना कोणताही गंध नसतो. हायड्रोजन सल्फाइड या गॅसला उग्र गंध असतो. हा वायू शरीरात अधिक प्रमाणात गेल्यास व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
हेही वाचा >> पती-पत्नीची सहमती असेल तर आता लगेच घटस्फोट मिळेल; सर्वोच्च न्यायालयाने दिलेला महत्त्वपूर्ण निकाल काय सांगतो?
दरम्यान, लुधियाना येथील ग्यासपुरा येथे नाल्यातील घटकांचे विघटन होत असताना त्याची मिथेन वायूशी रासायनिक अभिक्रिया झाली असावी, असा अंदाज येथील उपायुक्तांनी व्यक्त केला आहे. तर नाल्यातील सांडपाण्यातून कोणत्याही विषारी वायूची निर्मिती होऊ नये म्हणून तसेच हायड्रोजन सल्फाइडसारख्या विषारी वायूंना बाहेर काढण्यासाठी ‘ऑक्सिडेशन’सारखी प्रक्रिया राबवली जाते. यासाठी सांडपाण्यात हायड्रोजन पॅराऑक्साइड टाकले जाते.