कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आल्यानं भारताला मोठा विजय झाला आहे. या सर्व माजी नौदल अधिकाऱ्यांवर हेरगिरीचे आरोप होते. यापूर्वी भारताच्या विनंतीवरूनच या माजी नौदल अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली होती. तसेच सुटका झालेल्या नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार व्यक्त केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपाशिवाय आमची सुटका शक्य झाली नसती, असंही त्यांनी सांगितलंय. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या. सर्व माजी नौदल अधिकाऱ्यांनी पीएम मोदी आणि कतारचे आभार मानले. ‘कतारमध्ये अटकेत असलेल्या दहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणाऱ्या आठ भारतीय नागरिकांच्या सुटकेचे भारत सरकार स्वागत करते. या आठपैकी सात जण भारतात परतले आहेत. या नागरिकांची सुटका करून त्यांना परत घरी पाठवण्याच्या कतारच्या निर्णयाचे आम्ही कौतुक करतो,’ असंही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.
नेमकं हे प्रकरण काय?
कतारच्या न्यायालयाने गेल्या वर्षी २७ ऑक्टोबर रोजी भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयामुळे भारताला प्रचंड धक्का बसला होता. त्यावेळी केंद्रातील मोदी सरकारने हा निर्णय धक्कादायक असल्याचे म्हटले होते. मात्र, भारत सरकारने या प्रकरणी सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करत असल्याचे स्पष्ट केले होते. आश्चर्यकारक बाब म्हणजे कतारशी भारताचे संबंध चांगले आहेत. यानंतरही कतारने आठ भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावल्यानं भारतातही त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते. ते आठ भारतीय कोण आहेत आणि ते कतारमध्ये काय करत होते आणि किती काळ तुरुंगात होते? हे आता आपण जाणून घेणार आहोत. खरं तर कतार न्यायालयाने ज्या आठ जणांना शिक्षा सुनावली ते भारतीय नौदलाचे माजी अधिकारी आहेत. कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगुणाकर पाकला, कमांडर अमित नागपाल, कमांडर संजीव गुप्ता, कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, खलाशी रागेश गोपकुमार या माजी नौदल अधिकाऱ्यांचा त्यात समावेश होता. सर्व माजी अधिकाऱ्यांनी भारतीय नौदलात २० वर्षांची विशिष्ट सेवा दिली होती. या अधिकाऱ्यांना प्रशिक्षकांसह महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. २०१९ मध्ये कमांडर पूर्णेंदू तिवारी यांना प्रवासी भारतीय सन्मान प्रदान करण्यात आला, जो परदेशी भारतीयांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.
ते कतारमध्ये काय करत होते?
हे आठही माजी नौदल अधिकारी खासगी कंपनी Dahara Global Technologies and Consultancy Services मध्ये काम करीत होते. गेल्या काही वर्षांपासून हे माजी नौदल अधिकारी कतारच्या नौसैनिकांना प्रशिक्षण देत होते. ही कंपनी सागरी सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी कतारी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने काम करीत होती. रॉयल ओमान एअर फोर्सचे निवृत्त स्क्वाड्रन लीडर खामिस अल-अजमी यांच्या मालकीची ही कंपनी आहे. गेल्या वर्षी भारतीयांबरोबर अजमीलाही अटक करण्यात आली होती, परंतु नोव्हेंबर २०२२ मध्ये त्याची सुटका करण्यात आली होती. मेमध्ये दहराने दोहामधील आपले कामकाज बंद केले आणि तेथे काम करणारे सर्व लोक (मुख्यतः भारतीय) घरी परतले.
कतारमध्ये किती काळ तुरुंगात होते?
खरं तर ज्या आठ भारतीयांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली ते सर्व भारतीय नौदलाचे माजी अधिकारी होते. हे अधिकारी गेल्या वर्षी ऑगस्टपासून कतारच्या तुरुंगात होते. भारत किंवा कतारी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरील आरोप कधीही सार्वजनिक केले नाहीत. २५ मार्च रोजी आठ माजी नौदल अधिकाऱ्यांवर आरोप दाखल करण्यात आले होते आणि त्यांच्यावर कतारी कायद्यानुसार खटला चालवला जात होता. त्यांचा जामीन अर्ज अनेक वेळा फेटाळण्यात आला होता आणि कतारमधील फर्स्ट इन्स्टन्स कोर्टाने गेल्या वर्षी त्यांच्याविरुद्ध निर्णय दिला होता.
अन् नंतर फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली
कतारच्या न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती, परंतु भारताने त्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांची फाशी रद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि मोदी सरकारच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले. कतार सरकार त्यांची फाशी रद्द करत असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. दुबईत COP-२८ परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्यात झालेल्या बैठकीच्या चार आठवड्यांच्या आत ही घोषणा करण्यात आली होती. १ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, मी कतारमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाबद्दल अमिरांशी बोललो आहे. या काळात नौदल कर्मचाऱ्यांचा प्रश्नही उपस्थित झाल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर अखेर त्यांची सुटका करण्यात आली आहे.
भारत सरकार काय म्हणाले?
कतारमधून भारतीयांची सुटका झाल्याबद्दल भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आनंद व्यक्त केला. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकार दहरा ग्लोबल कंपनीत काम करणाऱ्या भारतीयांच्या सुटकेचे स्वागत करते. त्यांना कतारमध्ये ताब्यात घेण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या आठ जणांपैकी सात जण भारतात परतले आहेत. या भारतीयांच्या सुटकेसाठी आम्ही कतारच्या अमिरांचे आभार मानतो.
हेही वाचाः विश्लेषण : पाकिस्तानमधील निवडणूक निकालाचा भारताशी संबंधांवर काय परिणाम?
नौदलाचे माजी अधिकारी काय म्हणतात?
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, आठ जणांना त्यांच्या सुटकेबद्दल कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती आणि दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी अचानकपणे त्यांना तिथल्या तुरुंगातून मुक्त केले. रविवारी ते इंडिगोच्या विमानात बसले आणि पहाटे २ वाजल्यानंतर ते भारतात परतले. देशात परत आल्यानंतर त्या माजी नौदल अधिकाऱ्यांना सुटका करून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचे आभार मानले. “आम्ही सुरक्षितपणे भारतात परतलो, याचा आम्हाला खूप आनंद आहे. निश्चितपणे आम्ही पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो, कारण हे केवळ त्यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपामुळेच शक्य झाले आहे, ” असेही सुटका झालेला एक माजी नौदल अधिकारी म्हणाला. “आम्ही भारतात परत येण्यासाठी जवळजवळ १८ महिने वाट पाहिली. आम्ही पंतप्रधानांचे अत्यंत आभारी आहोत. त्यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपाशिवाय आणि कतारशी वाटाघाटी केल्याशिवाय हे शक्य झाले नसते. आम्हाला सोडवण्यासाठी भारत सरकारने केलेल्या प्रत्येक प्रयत्नासाठी आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत आणि त्या प्रयत्नांमुळेच आजचा दिवस शक्य झाला आहे,” असंही दुसऱ्या सुटका झालेल्या माजी नौदल अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचाः विश्लेषण : …म्हणून चरणसिंह शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आणि आदर्श नेते होते
भारताचा राजनैतिक विजय?
नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांची सुटका हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय असल्याचं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तसेच नवी दिल्लीत असलेल्या मोदी सरकारच्या मुत्सद्दी पराक्रमाचेही दर्शन घडवते. आठ सेवानिवृत्त नौदलाच्या अधिकाऱ्यांना सोडवण्यासाठी MEA त्यांच्या कतारी समकक्षांशी सातत्याने चर्चा करीत होते. परदेशात भारतीयांची सुरक्षा किती महत्त्वाची आहे हे दाखवून देण्यासाठीच पंतप्रधान मोदींनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले होते. यातून भारताने जगाला दाखवून दिले की, तो झुकणारा किंवा मागे हटणारा देश आता राहिला नाही आणि तो आपल्या नागरिकांसाठी सातत्याने लढा उभारत राहील आणि नेहमीच देशाला प्रथम स्थान देईल.