Queen Elizabeth II’s wedding cake slice sold in auction: स्कॉटलंडमध्ये ७७ वर्षे जुन्या केकचा एक तुकडा २.३६ लाख रुपयाला ($२,८००) विकला गेला. कदाचित इथे असा प्रश्न पडू शकतो की, जवळपास ८० वर्षे जुना आणि आता खाता न येण्याजोगा केक एवढ्या जास्त किमतीला का विकला गेला असेल; तर त्याचे उत्तर अगदीच सोपे आहे, ते म्हणजे हा केक साधासुधा केक नाही. हा केक युनायटेड किंगडमची राणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांच्या २० नोव्हेंबर १९४७ रोजी झालेल्या लग्नात हा केक देण्यात आला होता. जवळपास आठ दशकांनंतर व्यवस्थित गुंडाळलेल्या या केकने काळाची कसोटी पार केली आहे. या केकच्या तुकड्याच्या छोट्या डब्यावर तत्कालीन राजकन्या एलिझाबेथ हिचे राजचिन्ह आहे.
केक कोणाला देण्यात आला होता?
या केकच्या तुकड्याचा डबा बकिंगहम पॅलेसवरून एडिनबरोच्या होलीरूड हाऊसच्या हाऊसकीपर मॅरियन पॉल्सन यांना शाही जोडीने आपल्या भव्य लग्नानंतर भेट म्हणून पाठवला होता. या केकबरोबर तत्कालीन राणी पॉल्सन हिने एक पत्रही लिहिले होते, ज्यात लग्नाच्या सुंदर भेटवस्तूसाठी आभार मानले होते. ‘आम्हाला तुमची भेटवस्तू पाहून खूपच आनंद झाला; त्यातील विविध फुलं आणि सुंदर रंगसंगती पाहून कोणालाही ती भेटवस्तू आवडेलच, याची मला खात्री आहे,’ असे पत्रात लिहिले आहे. ही भेट काय होती हे स्पष्ट नाही, परंतु राणीने सांगितले की, ‘आम्ही ती नेहमीच वापरू आणि त्या भेटवस्तूच्या माध्यमातून आमच्या आनंदासाठी व्यक्त केलेल्या तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमाची आठवण आम्हाला नेहमीच येत राहील.’
केक तब्बल नऊ फूट उंच!
हा तुकडा एलिझाबेथ आणि फिलिप यांच्या भव्य लग्नातील केकचा आहे. लग्नाचा केक तब्बल नऊ फूट उंच आणि २०० किलोहून अधिक वजनाचा होता. लग्नातील पाहुण्यांसाठी या केकचे २,००० पेक्षा अधिक तुकडे कापले गेले आणि उर्वरित केक काही धर्मादाय संस्था व अन्य संघटनांना पाठविण्यात आला. विशेष म्हणजे, या केकचा एक थर प्रिन्स चार्ल्सच्या बाप्तिस्मासाठी जतन केला गेला होता. या शाही केकचे तुकडे यापूर्वीही विकले गेले आहेत. २०१३ साली एका तुकड्याला २,३०० डॉलर्स मिळाले होते. तसेच, राजा चार्ल्स आणि राजकुमारी डायना यांच्या लग्नाच्या केकचा काही भाग २०२१ मधील एका लिलावात २,५६५ डॉलर्सला विकला गेला होता.
राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप यांच्या लग्नाच्या केकचा तुकडा जवळपास ८० वर्षे टिकून कसा राहिला?
या केकचा तुकडा शुष्क, हवा बंद आणि घट्ट डब्यात ठेवण्यात आला होता. यामध्ये राजकन्या एलिझाबेथचे राजचिन्ह असलेला छोटा डबा होता, ज्यामुळे आर्द्रता आत जाऊ शकली नाही आणि बुरशी तसेच जिवाणूंची वाढ होण्यास प्रतिबंध झाला. अशा वस्तू टिकवण्यासाठी कमी आर्द्रता आणि थंड, स्थिर तापमान आवश्यक असते. हा केक अंधाऱ्या आणि नियंत्रित तापमान असलेल्या ठिकाणी ठेवण्यात आला, जिथे थेट सूर्यप्रकाश किंवा तापमानात बदल होत नाही. त्या काळातील लग्नाच्या केकमध्ये विशेषत: राजघराण्यातील लग्नात, साखर आणि चरबीचे प्रमाण खूप जास्त होते. साखर एक नैसर्गिक संरक्षक आहे, ज्यामुळे सूक्ष्मजीवांची वाढ होण्याची शक्यता कमी होते. केकचा तुकडा सुरक्षित पॅकिंगमध्ये म्हणजे खाद्यपदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या मेणाच्या कागदात गुंडाळला गेला होता, ज्यामुळे बाहेरची हवा आत पोहोचली नाही. काही वेळा केकवर मेणाचा थर दिला जातो, ज्यामुळे बाहेरच्या वातावरणापासून केक सुरक्षित राहतो. राजघराण्यातील वस्तू जतन करण्यासाठी नेहमीच विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे या केकला ऐतिहासिक वस्तूसारखे जपले गेले. केक जरी शिल्लक असला तरी तो आता खाद्यपदार्थ म्हणून वापरण्यास योग्य नाही. तो केवळ ऐतिहासिक वस्तू म्हणूनच जपला गेला आहे, खाद्यपदार्थ म्हणून नाही!
केकचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व
राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप यांच्या लग्नातील केकच्या तुकड्याला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहे, कारण तो ब्रिटनच्या इतिहासातील काही प्रमुख क्षणांशी आणि व्यक्तींशी संबंधित आहे. हा केक राणी एलिझाबेथ दुसरी आणि प्रिन्स फिलिप यांच्या लग्नाचे प्रतीक आहे. हा विवाह युद्धोत्तर ब्रिटनमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात मानला जातो. त्यांचे लग्न ७० वर्षांपेक्षा अधिक काळ टिकले, जे आधुनिक युरोपातीच्या इतिहासातील राजघराण्यातील सर्वाधिक टिकलेल्या विवाहांपैकी एक आहे. शिवाय हा केक ब्रिटनच्या राजघराण्याच्या परंपरा आणि राजशिष्टाचाराचे प्रतिनिधित्व करतो. १९४७ साली दुसऱ्या महायुद्धानंतर राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप यांच्या लग्नाचा सोहळा झाला, या कालखंडात ब्रिटन आणि जग युद्धाच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत होते. हा शाही विवाह जनतेसाठी आशेचा किरण ठरला, जो स्थैर्य आणि धैर्याचे प्रतीक ठरला. राणी एलिझाबेथ द्वितीय ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात दीर्घकाळ राज्य करणारी राणी आहे आणि तिच्या जीवनाशी संबंधित वस्तूंना (जसे की हा लग्नाच्या केकचा तुकडा) ऐतिहासिक आणि संग्रहणीय महत्त्व प्राप्त झाले. हा केक तुकडा शाही परंपरेचा भाग आहे, या परंपरेत शाही विवाह व सोहळ्यांशी संबंधित वस्तू जपल्या जातात आणि कधी कधी लिलावात विकल्या जातात.
अधिक वाचा: Lady of the House: मृत्यूनंतर ४,००० वर्षांनी लागला तिचा शोध; कोण होती इजिप्तची ‘lady of the house’?
म्हणूनच, केकच्या या तुकड्याला एक संरक्षित वस्तू असण्यापेक्षा ब्रिटनच्या इतिहासात अधिक महत्त्व आहे; तो एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आहे, जो ब्रिटनमधील युद्धोत्तर काळातील आशावादाचे दर्शन घडवतो!