सध्या जगभरात विविध जीवाणू आणि विषाणूंचा प्रसार होत आहे. नुकत्याच चीनमध्ये वेगाने प्रसारित होत असलेल्या ह्युमन मेटान्यूमो व्हायरसने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. भारतातही याचे रुग्ण आढळल्यामुळेही चिंता व्यक्त केली जात आहे. आता एका नवीन आजाराची चर्चा सुरू आहे, ज्याचे नाव आहे ‘रॅबिट फिव्हर’. ट्यूलरेमिया या आजाराला ‘रॅबिट फिव्हर’ म्हणूनही ओळखले जाते. हा एक दुर्मीळ आणि कधी कधी घातक ठरणारा संसर्गजन्य आजार आहे. अलीकडच्या वर्षांत अमेरिकेमध्ये याची प्रकरणे वाढताना दिसत आहेत. एका अहवालानुसार, अमेरिकेत रॅबिट फिवरचे प्रमाण ५० टक्क्यांहून जास्त झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२००१ ते २०१० च्या तुलनेत २०११ ते २०२२ दरम्यान ट्यूलरेमिया संसर्गाच्या वार्षिक सरासरी प्रकरणांमध्ये ५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती रोगनियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राने दिली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, मॉर्बिडिटी अॅण्ड मॉर्टॅलिटी वीकली रिपोर्टमध्ये सोमवारी प्रकाशित झालेल्या अहवालात अलीकडील कालावधीत २,४०० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. काय आहे रॅबिट फिव्हर? या आजाराची लक्षणे आणि उपाय काय? त्याविषयी जाणून घेऊ.

हेही वाचा : हजारो मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणावरुन एलॉन मस्कने ब्रिटनच्या पंतप्रधानांना का केलं लक्ष्य?

‘रॅबिट फिव्हर’ म्हणजे काय?

रॅबिट फिव्हर हा आजार फ्रॅन्सिसेला टुलरेन्सिस या जीवाणूमुळे होतो. ससे, उंदीर, ससा व कुत्रे यांसारख्या संक्रमित प्राण्यांद्वारे, तसेच गोचीड किंवा माशीच्या चाव्याद्वारे ट्यूलरेमियाचा प्रसार होऊ शकतो. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शननुसार, दूषित पाणी प्याल्यास, शेती किंवा सपाट प्रदेशातील धुळीच्या अथवा प्रयोगशाळेतून संसर्ग पसरल्यास हा आजार उद्भवू शकतो. हा दुर्मीळ आणि प्राणघातक ठरणारा हा आजार पाच ते नऊ वर्षे वयोगटातील मुले, वृद्ध पुरुष आणि अमेरिकन भारतीय किंवा अलास्का स्थानिकांमध्ये दिसून येतो.

रॅबिट फिवर हा आजार फ्रॅन्सिसेला टुलरेन्सिस या जीवाणूमुळे होतो. (छायाचित्र-फ्रीपीक)

अमेरिकेतील कोणकोणत्या राज्यांमध्ये रॅबिट फिवरचे प्रमाण जास्त?

पाच ते नऊ वर्षे वयोगटातील मुले, वृद्ध पुरुष आणि अमेरिकन भारतीय किंवा अलास्का येथील नागरिकांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. त्याशिवाय ४७ राज्यांनी नोंदविलेली बहुतांश प्रकरणे केवळ चार राज्यांतील आहेत; ज्यात अर्कान्सास, कॅन्सस, मिसूरी व ओक्लाहोम या राज्यांचा समावेश आहे. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन (सीडीसी) नुसार, २००१ ते २०१० या वर्षांच्या तुलनेत २०११ ते २०२२ मध्ये ट्यूलरेमिया संसर्गाच्या वार्षिक सरासरी घटनांमध्ये ५६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी वीकली रिपोर्टमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे की, अलीकडील कालावधीत २,४०० हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अर्कान्सास, कॅन्सस, मिसूरी व ओक्लाहोमामध्ये अर्ध्याहून अधिक प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. “हे निष्कर्ष या कालावधीत व्यावसायिकरीत्या उपलब्ध प्रयोगशाळेतील चाचण्यांमधील बदलांमध्ये मानवी संसर्गामध्ये वाढ किंवा सुधारित केस डिटेक्शन दर्शवू शकतात,” असे अहवालाच्या लेखकांनी सांगितले.

रॅबिट फिवरची लक्षणे काय?

हा आजार सौम्य किंवा गंभीर असू शकतो. तीव्र ताप हे सर्व प्रकारच्या आजारांमध्ये एक सामान्य लक्षण आहे. ट्यूलरेमियाची चिन्हे आणि लक्षणे जीवाणू शरीरात कसे प्रवेश करतात यावर अवलंबून असू शकतात. सीडीसीने नमूद केलेल्या काही बाबी खालीलप्रमाणे :

त्वचेवर व्रण : टिक किंवा मृग माशी चावल्यानंतर किंवा संक्रमित प्राण्याला हात लावल्यानंतर दिसणारे सर्वांत सामान्य लक्षण म्हणजे जीवाणू ज्या ठिकाणी शरीरात प्रवेश करतात, त्या ठिकाणी त्वचेवर व्रण दिसून येतो.

डोळ्यांची जळजळ : या प्रकाराला ऑक्युलॉगलँड्युलर म्हणतात आणि जेव्हा जीवाणू डोळ्यातून आत जातात तेव्हा हे लक्षण दिसून येते. एखाद्या संक्रमित प्राण्याला मारताना किंवा त्यांच्या डोळ्यांशी संपर्क साधताना एखाद्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होऊ शकतो. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, डोळ्यांची जळजळ होणे आणि कानासमोरील लिम्फ ग्रंथीवर सूज येणे ही याची लक्षणे आहेत.

घसा खवखवणे, तोंडात व्रण : विषाणू पसरण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे दूषित अन्न किंवा पाणी पिणे अथवा खाणे. ऑरोफिंजियल ट्यूलरेमिया असलेल्या रुग्णांना घसा खवखवणे, तोंडात व्रण येणे, टॉन्सिलिटिस व मानेतील लसिका ग्रंथीवर सूज येणे, अशा त्रासदायक तक्रारी जाणवू शकतात.

श्वास घेण्यात अडचण : संसर्गाचा सर्वांत गंभीर धोका म्हणजे श्वास घेण्यात अडचण येणे. त्यांच्या लक्षणांमध्ये खोकला, छातीत दुखणे व श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. काही व्यक्तींमध्ये धुळीद्वारे याचा संसर्ग होऊ शकतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर ट्यूलेरेमियावर योग्य उपचार होऊ शकला नाही, तर जीवाणू रक्तप्रवाहाद्वारे फुप्फुसात पसरतात.

संसर्ग थांबविण्यासाठी कोणती पावले उचलावीत?

  • गोचीड आणि कीटक चावणे टाळण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करा.
  • लांब बाह्यांचा शर्ट आणि लांब पँट घाला; जेणेकरून गोचीड आणि माश्या दूर राहतील.
  • प्रक्रिया न केलेले पाणी पिणे टाळा.
  • जीवाणू शरीरात शिरण्याचा धोका कमी करण्यासाठी गवत काढण्यासारख्या क्रियाकलापांदरम्यान मास्क वापरा.
  • ससे, कुत्रे व उंदीर यांसारख्या प्राण्यांना हाताळताना हातमोजे वापरा.

हेही वाचा : नारायण मूर्ती यांच्या ‘Infosys’ने पुढे ढकलला पगारवाढीचा निर्णय; कारण काय? आयटी कंपन्यांची स्थिती काय?

  • मांस खाण्यापूर्वी ते चांगले शिजवलेले आहे ना याची खात्री करून घ्या.

या आजाराचा मृत्यू दर साधारणतः दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. परंतु, काही प्रकारांमध्ये जीवाणूंच्या तीव्रतेनुसार हा दर वाढूही शकतो. वेळेवर उपचार न झाल्यास हा आजार प्राणघातक ठरतो, असे सीडीसीच्या अहवालात दिले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rabbit fever a rare disease sees over 50 percent rise in us rac