Brief history of Rae Bareli: काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड मतदारसंघाबरोबरच रायबरेली मतदारसंघातूनही निवडणूक लढविणार असल्याची घोषणा शुक्रवारी (३ एप्रिल) करण्यात आली. अगदी पहिल्या निवडणुकीपासूनच रायबरेली हा मतदारसंघ गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या दोन दशकांपासून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या मतदारसंघाचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत.
१९५२ व १९५७ च्या निवडणुकीत फिरोज गांधी विजयी
देशाच्या पहिल्या निवडणुकीपासूनच गांधी-नेहरू घराण्याचा रायबरेली मतदारसंघाशी संबंध राहिला आहे. जवाहरलाल नेहरू यांचे जावई आणि इंदिरा गांधींचे पती फिरोज गांधी यांनी १९५२ च्या पहिल्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी प्रतापगढ असे नाव असलेला हा मतदारसंघ द्विसदस्यीय मतदारसंघ होता. फिरोज गांधी हे सामान्य प्रवर्गातून निवडून आले; तर बैजनाथ कुरील यांची अनुसुचित जाती प्रवर्गातून (SC) निवड झाली. दोघांनाही काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळाला होता. १९५७ च्या निवडणुकीपूर्वी या मतदारसंघाचे नाव ‘रायबरेली’, असे करण्यात आले. १९५७ च्या निवडणुकीतही या दोन्ही उमेदवारांना पुन्हा विजय मिळाला होता.
मात्र, फिरोज गांधी यांना लोकसभेचा आपला दुसरा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. वयाच्या ४७ व्या वर्षी १९६० मध्ये त्यांचे निधन झाले. १९६२ च्या निवडणुकीमध्ये द्विसदस्यीय असलेला हा मतदारसंघ एकसदस्यीय करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रायबरेली हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ झाला. या निवडणुकीतही काँग्रेसचे उमेदवार बैजनाथ कुरील यांचाच विजय झाला.
हेही वाचा : १९८१ मध्ये राजीव गांधींनी अमेठीत मिळविला होता विक्रमी विजय; जाणून घ्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचा इतिहास
१९६७ व १९७१ मध्ये इंदिरा गांधी विजयी
१९६७ च्या निवडणुकीमध्ये रायबरेली हा मतदारसंघ राखीव नव्हता. त्याआधीच इंदिरा गांधी राज्यसभेतून खासदार होऊन भारताच्या पंतप्रधान झाल्या होत्या. त्यांनी १९६७ साली लोकसभेची पहिली निवडणूक आपल्या पतीच्याच रायबरेली या मतदारसंघातून लढवली. त्यांना जवळपास ५५ टक्के मते मिळाली होती.
१९६९ मध्ये काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली होती. मात्र, तरीही १९७१ च्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींनी ६६ टक्क्यांहून अधिक मते मिळवली होती. या निवडणुकीमध्ये त्यांनी संयुक्त समाजवादी पक्षाच्या राज नारायण यांचा १.१ लाख मतांनी पराभव केला होता. मात्र, त्यांचा हा विजय वादग्रस्त ठरला. पराभवानंतर राज नारायण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली होती. इंदिरा गांधींनी निवडणुकीमध्ये आपला फायदा व्हावा म्हणून सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला होता.
या खटल्याचा निकाल १२ जून १९७५ साली लागला. न्यायाधीश जगमोहनलाल सिन्हा यांनी इंदिरा गांधींना दोषी ठरवले आणि रायबरेलीमधून राज नारायण यांना विजयी घोषित केले. त्यानंतर २४ जून रोजी सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन केले. मात्र, इंदिरा गांधींच्या अपिलाचा निकाल लागेपर्यंत त्यांना पंतप्रधानपदी राहण्याची परवानगी देण्यात आली. या साऱ्या पार्श्वभूमीवर २५ जूनच्या मध्यरात्रीपासून इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली.
१९७७ मध्ये इंदिरा गांधींचा पराभव; १९८० मध्ये पुन्हा मिळवला मतदारसंघ
तब्बल २१ महिन्यांच्या आणीबाणीनंतर १९७७ मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत राज नारायण यांनी रायबरेली मतदारसंघातून भारतीय लोक दलाकडून निवडणूक लढवली आणि ५५,२०२ मतांनी इंदिरा गांधींचा पराभव केला. बिगर-काँग्रेसी नेत्याने हा मतदारसंघ जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती.
मात्र, काही महिन्यांमध्येच जनता पार्टीचे सरकार कोसळले. १९८० सालच्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींनी आंध्र प्रदेशमधील मेडक व रायबरेली अशा दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली. त्यांना दोन्ही मतदारसंघांमध्ये विजय मिळाला. जनता पार्टीच्या विजया राजे सिंधिया यांचा त्यांनी १.७ लाख मतांनी पराभव केला. मात्र, इंदिरा गांधींनी मेडक मतदारसंघ आपल्यासाठी राखला; तर रायबरेलीची जागा सोडून दिली.
त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने रायबरेली मतदारसंघातून अरुण नेहरू यांना उमेदवारी दिली. अरुण नेहरू हे इंदिरा गांधींचे चुलतभाऊ होते. १९८० च्या या पोटनिवडणुकीत त्यांचा विजय झाला. १९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर १९८५ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसबाबत सहानुभूतीची लाट होती. अरुण नेहरू पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडून आले.
काँग्रेस आणि भाजपामध्ये रायबरेलीवरून रस्सीखेच
१९८९ आणि १९९१ च्या निवडणुकीमध्ये शैला कौल यांनी दोन्ही वेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून जनता दलाच्या उमेदवाराचा पराभव केला. त्या कमला नेहरूंचे भाऊ कैलाश नाथ कौल यांच्या पत्नी होत्या. आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक मंत्रिपदे सांभाळली. १९९५-९६ मध्ये त्या हिमाचल प्रदेशच्या राज्यपालही राहिल्या.
१९९६ च्या निवडणुकीमध्ये रायबरेली मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या अशोक सिंह यांचा विजय झाला. ते १.६ लाख मतांनी निवडून आले. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने शैला कौल यांचे सुपुत्र विक्रम कौल यांना उमेदवारी दिली; मात्र फक्त २६ हजार मते मिळवून ते या निवडणुकीत चौथ्या स्थानावर राहिले. दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या जनता दलाच्या उमेदवाराचे नावही अशोक सिंह असेच होते. बसपाचे बाबुलाल लोधी तिसऱ्या स्थानावर राहिले.
१९९८ मध्ये रायबरेलीमधून शैला कौल यांची मुलगी दीपा कौल यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र, या निवडणुकीतही भाजपाच्या अशोक सिंह यांचा जवळपास २.४ लाख मतांनी पुन्हा एकदा विजय झाला. यावेळी समाजवादी पार्टी व बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी राहिले; तर दीपा कौल या चौथ्या स्थानी राहिल्या.
हेही वाचा : रायबरेलीतूनही लढणे ही वायनाडची फसवणूक; डाव्या पक्षांकडून राहुल गांधींवर टीका
रायबरेलीत सोनिया गांधींचा प्रवेश
सोनिया गांधी यांनी १९९८ मध्ये काँग्रेस पक्षाची सूत्रे आपल्या हाती घेतली. १९९९ मध्ये सोनिया गांधी यांनी सतीश शर्मा यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली. सतीश शर्मा हे राजीव गांधींचे विश्वासू सहकारी होते. या निवडणुकीमध्ये सतीश शर्मा यांचा विजय झाला आणि रायबरेली मतदारसंघ पुन्हा एकदा काँग्रेसच्या ताब्यात आला.
२००४ साली सोनिया गांधींनी स्वत:च रायबरेलीमधून निवडणूक लढवली. त्यांनी समाजवादी पार्टीच्या अशोक सिंह यांचा १.५ लाख मतांनी पराभव केला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) सत्तेत आली. त्यानंतर सोनिया यांची राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ‘ऑफिस-फॉर-प्रॉफिट’ खटल्यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आणि मार्च २००६ मध्ये त्यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर रायबरेलीत झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये, त्यांनी भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय सचिव विनय कटियार यांचा तब्बल ४.१७ लाख विक्रमी मतांनी पराभव केला. २००९ मध्येही त्यांनी रायबरेलीवर आपले वर्चस्व कायम राखले. या निवडणुकीत त्यांनी बसपाचे उमेदवार आर. एस. कुशवाह यांचा ३.७ लाख मतांनी पराभव केला.
उत्तर भारतात भाजपाच्या वर्चस्वातही राखला मतदारसंघ
२०१४ च्या निवडणुकीमध्ये उत्तर भारतामध्ये भाजपाची लाट दिसून आली. असे असले तरीही रायबरेली मतदारसंघ राखण्यात सोनिया गांधींना यश आले. जवळपास ५.२६ लाख मते मिळवीत त्यांनी भाजपाचे उमेदवार अजय अग्रवाल यांचा ३.५ लाख मतांनी पराभव केला. २०१९ मध्ये ज्याप्रमाणे अमेठीमध्ये राहुल गांधींविरोधात भाजपाकडून स्मृती इराणींना उमेदवारी दिली होती; त्याचप्रमाणे रायबरेलीमधून सोनिया गांधींविरोधात उमा भारती यांना उमेदवारी दिली जाणार होती. मात्र, उमा भारती यांनी या मतदारसंघातून लढण्यास नकार दिला. त्यानंतर या ठिकाणी स्थानिक नेते दिनेश सिंह यांना भाजपाकडून उमेदवारी दिली गेली. ते आधी काँग्रेसमध्येच होते. २०१९ मध्येही भाजपाची लाट असताना सोनिया गांधी यांनाच विजय मिळाला. त्यांना ५.३३ लाख मते मिळाली; तर दिनेश सिंह यांना ३.६५ लाख मते मिळाली.
हेही वाचा : अमेठीतले काँग्रेस उमेदवार केएल शर्मा कोण आहेत? राजीव गांधींशी काय आहे कनेक्शन?
२०२४ च्या या निवडणुकीमध्ये आता रायबरेलीमध्ये राहुल गांधी आणि भाजपाचे दिनेश सिंह यांच्यात लढत होणार आहे. दिनेश सिंह हे उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेवर आमदार असून, ते राज्याचे फलोत्पादन मंत्री आहेत.