१६ ते १७ नोव्हेंबरच्या मध्यरात्री गुजरातमधील वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहात एका विद्यार्थ्याचा वरिष्ठ विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्यामुळे मृत्यू झाला. गुजरात मेडिकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सोसायटी (GMERS) मेडिकल कॉलेजचा अनिल मेथनिया (वय १८) हा विद्यार्थी एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला होता. गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील पोलिसांनी मेथनियाच्या १५ वरिष्ठ व्यक्तींवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस)अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रॅगिंगविरोधी समितीच्या अहवालानंतर वैद्यकीय महाविद्यालयाने संबंधित सर्व १५ जणांना निलंबितही केले होते. आता त्या विद्यार्थ्याच्या मृत्यूसंबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी महाविद्यालयाकडून अँटी रॅगिंग अहवाल मागवला आहे. नेमके हे प्रकरण काय आहे? भारतात रॅगिंगविरोधात कोणता कायदा आहे? जाणून घेऊ…
डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले
मेथनियाने नीट परीक्षेत कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता, ५५० गुण मिळवले होते. तो सुमारे चार तास एकाच ठिकाणी उभा राहिल्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी तो बेशुद्ध पडला. मृत्यूच्या अवघ्या एक महिन्यापूर्वी १४ ऑक्टोबर रोजी तो कॉलेजमध्ये दाखल झाला होता. गुजरातमधील कच्छच्या छोट्या रणजवळील सुरेंद्रनगरच्या ध्रंगध्रा तालुक्यातील जेसाडा गावातील ही परीक्षा उत्तीर्ण करणारा तो एकमेव विद्यार्थी होता. “तो हुशार विद्यार्थी होता. तो कोणत्याही कोचिंग क्लासला गेला नाही; पण तरीही तो नीट परीक्षा उत्तीर्ण होण्यात यशस्वी ठरला. त्याने नीटच्या परीक्षे मध्ये ५५० आणि गुजरात कॉमन एन्ट्रन्स टेस्टमध्ये ९०.५७ टक्के गुण मिळवले,” असे त्याचा चुलतभाऊ गौतम मेथानिया यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
हेही वाचा : ‘बॉम्ब चक्रीवादळ’ किती विध्वंसक? दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार?
मेथानियाबरोबर काय घडले?
GMERS वसतिगृहातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी रात्री प्रथम वर्षाच्या १० हून अधिक विद्यार्थ्यांचे रॅगिंग केल्याचा आरोप आहे. “आम्ही जिथून आलो, त्या प्रदेशाच्या आधारावर, आम्हाला रात्री ९ च्या सुमारास वसतिगृह ब्लॉकमध्ये जमण्यास सांगण्यात आले. व्हॉट्सॲप स्टुडंट ग्रुपवर याची माहिती देण्यात आली. तीन तासांहून अधिक काळ उभे राहिल्यानंतर आम्हाला आमचा परिचय देण्यास सांगण्यात आले,” असे पहिल्या वर्षाच्या एका विद्यार्थ्याने ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. वरिष्ठांनी ज्युनियर्सना उभे केले. बराच वेळ उभा राहिल्यानंतर एक विद्यार्थी बेशुद्ध पडला, असे विद्यार्थ्याने सांगितले. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १२.३० वाजता बालिसणा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, अधिष्ठाता हार्दिक शाह यांनी ताबडतोब अँटी रॅगिंग समितीला बोलावले; ज्यामध्ये त्यांचे अध्यक्ष आणि इतर प्राध्यापकांचा सदस्य म्हणून समावेश होता.
समितीने संकलित केलेल्या अहवालात २६ साक्षीदारांचे जबाब आहेत, त्यापैकी ११ साक्षीदारांनी समितीसमोर साक्ष दिली. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, अटक केलेल्या १५ जणांनी त्यांना सतत उभे राहण्यास, गायला आणि नाचण्यास सांगून रॅगिंग केल्याचे त्यांनी सांगितले. मेथनिया बेशुद्ध पडला आणि त्याला तत्काळ वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सर्वसाधारणा रुग्णालयामध्ये नेण्यात आले. अधिष्ठाता म्हणाले की, मेथनिया याला काही विद्यार्थ्यांनी बेशुद्धावस्थेत धारपूर रुग्णालयाच्या आपात्कालीन विभागात आणले गेले आणि नंतर त्याला मृत घोषित करण्यात आले, असे ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
भारतात रॅगिंगविरोधी कायदे
२००१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने देशभरात रॅगिंगवर बंदी घातली होती. परंतु २००९ मध्ये धर्मशाळेत अमन कचरू या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा रॅगिंगमुळे मृत्यू झाल्याने न्यायालयाने सर्व शैक्षणिक संस्थांना रॅगिंगविरोधी कायद्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले. रॅगिंग हे रॅगिंग प्रतिबंधक कायदा, १९७७ आणि त्यातील सुधारणांच्या कक्षेत येते. “एखाद्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीने तोंडी किंवा लिखित स्वरूपात त्रास देणे, गैरवर्तन करणे किंवा यासारख्या क्रियाकलापांमध्ये गुंतणे,” अशी कायद्याने रॅगिंगची व्याख्या केली आहे. रॅगिंगमध्ये दोषी आढळणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला कायद्यानुसार तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड भरावा लागतो. कायद्याचे पालन न करणाऱ्या किंवा या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाविद्यालयांवर कायदेशीर कारवाई केली जाते. भारतातील उच्च शिक्षण नियामक विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सर्व प्रकारच्या रॅगिंगवर बंदी घातली आहे. कोणत्याही स्वरूपातील रॅगिंगकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.
हेही वाचा : पाकिस्तान-बांगलादेशदरम्यान सागरी मार्ग सुरू? भारताची चिंता का वाढली?
नियमांनुसार, विद्यार्थ्याचा पेहराव किंवा त्याच्या स्वाभिमानावर कोणतीही टिप्पणी केली, तर ती रॅगिंग मानली जाते. एखाद्या विद्यार्थ्याचा प्रदेश, भाषा, वंश व जात यांच्या आधारे अपमान करणे हेही रॅगिंगमध्ये येते. कोणत्याही विद्यार्थ्याला कोणतेही काम करण्यास भाग पाडले, तर तेही रॅगिंगच्या कक्षेत येते. एआयसीटीई कायदा, १९८७ च्या कलम २३ व कलम १० अन्वये, रॅगिंग रोखण्यासाठी एक ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन विनियम २००९ आहे, जे भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, १९५६ च्या कलम ३३ मधील आहे. ‘यूजीसी’ने एक टोल क्रमांकही जारी केला आहे. रॅगिंगविरोधी मोफत हेल्पलाइन क्रमांक १८००-१८०-५५२२ वर पीडित व्यक्ती १२ भाषांमधून आपली तक्रार नोंदवू शकते.