भारतीय राजकारणाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर गांधी-नेहरू कुटुंबाच्या राजकारणाचाही अभ्यास हमखास करावा लागतो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी या काँग्रेसच्या नेत्यांनी भारताच्या जडणघडणीत मोठे योगदान दिलेले आहे. सध्या गांधी घराण्यातील सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी ही त्रयी राजकारणात सक्रिय आहे. वरील नेत्यांनी वेगवेगळ्या लोकसभा निवडणुकांत वेगवेगळ्या मतदारसंघांतून निवडणूक लढवून लोकप्रतिनिधीत्व केलेले आहे. असे असले तरी उत्तर प्रदेशमधील अमेठी या मतदारसंघाशी गांधी कुटुंबाचे खास नाते आहे. गांधी कुटुंबातील अनेकांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवून विजयही मिळवलेला आहे. त्यामुळे अमेठी मतदारसंघ आणि गांधी कुटुंबाचा संबंध काय ? या जागेवर आतापर्यंत कोणकोणत्या नेत्यांनी निवडणूक लढवलेली आहे? हे जाणून घेऊ या…
अजय राय यांच्या विधानामुळे अमेठी मतदारसंघ चर्चेत
उत्तर प्रदेश काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी १८ ऑगस्ट रोजी नुकतेच एक विधान केले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे २०२४ सालची लोकसभा निवडणूक अमेठी या मतदारसंघातून लढू शकतात, असे राय म्हणाले आहेत. त्यानंतर आता अमेठी या मतदारसंघाची चर्चा होत आहे. २०१९ सालच्या निवडणुकीत राहुल गांधी यांच्याविरोधात स्मृती इराणी यांनी निवडणूक लढवली होती. इराणी यांनी ही निवडणूक ३५ हजार मतांच्या फरकाने जिंकली होती.
अमेठी आणि गांधी कुटुंबाचे खास नाते
१९६७ साली अमेठी या मतदारसंघाची निर्मिती झाली. तेव्हापासूनच ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. गांधी कुटुंबातील बहुतांश सर्वच नेत्यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवलेली आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातील मतदारांनीही गांधी कुटुंब किंवा काँग्रेसची साथ दिलेली आहे.
संजय गांधी (१९८०-८१)
संजय गांधी हे गांधी कुटुंबातील पहिले सदस्य आहेत, ज्यांनी अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आणीबाणी संपल्यानंतर १९७७ साली त्यांनी या जागेवरून निवडणूक लढवली होती. मात्र आणीबाणीच्या काळात त्यांनी राबवलेल्या नसबंदीच्या मोहिमेमुळे मतदारांमध्ये त्यांच्याबाबत रोष होता. परिणामी ते या निवडणुकीत पराभूत झाले होते. अमेठीतील मतदारांनी १९७७ साली पहिल्यांदाच काँग्रेस व्यतिरिक्त अन्य पक्षाच्या उमेदवाराला विजय मिळवून दिला होता. त्या निवडणुकीत जनता पार्टीच्या रविंद्र प्रताप सिंह यांनी संजय गांधी यांना पराभूत केले होते.
मात्र १९८० साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत संजय गांधी यांना याच जागेवर विजय मिळाला होता. संजय गांधी यांचा १९८१ साली विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्या जागेवर पोटनिवडणूक आयोजित करण्यात आली.
राजीव गांधी (१९८१-१९९१)
संजय गांधी यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू राजीव गांधी हे राजकारणात सक्रिय झाले. ४ मे १९८१ रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राजीव गांधी हे अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवतील असे जाहीर केले. काँग्रेसच्या बैठकीतही त्यांच्या नावावर सहमती दर्शवण्यात आली. या पोटनिवडणुकीत राजीव गांधी यांचा तब्बल २ लाख मतांच्या फरकाने विजय झाला. त्यांनी लोक दल पक्षाचे नेते शरद यादव यांना पराभूत केले होते. त्यांनी १७ ऑगस्ट १९८१ रोजी अमेठी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून खासदारकीची शपथ घेतली. पुढे साधारण एक दशक राजीव गांधी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी १९८१, १९८९, १९९१ सालच्या निवडणुकांत याच मतदारसंघातून विजय मिळवला.
राजीव गांधी यांच्या निधनानंतर या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. यावेळी काँग्रेसने सतिश शर्मा यांना उमेदवारी दिली होती. १९९६ सालीदेखील ते याच मतदारसंघातून पुन्हा निवडून आले. दोन वर्षांनंतर हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात गेला. भाजपाच्या संजय सिंह यांनी सतिश शर्मा यांना पराभूत केले होते.
सोनिया गांधी (१९९९-२००४)
१९९ साली पुन्हा एकदा अमेठीच्या मतदारांनी गांधी कुटुंबातील सोनिया गांधी यांना मते दिली. १९९९ सालची निवडणूक जिंकली असली तरी २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मात्र सोनिया गांधी यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली नाही. सोनिया गांधी यांच्या ऐवजी राहुल गांधी यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. तर सोनिया गांधी रायबरेलीय या मतदारसंघातून उभ्या राहिल्या होत्या.
राहुल गांधी (२००४-२०१९)
२००४ साली राहुल गांधी यांनी अमेठी मतदारसंघातून पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवली. विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी याच जागेवरून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी ते तब्बल ३.०७ लाख मतांच्या फरकाने विजयी झाले होते. २०१४ सालीदेखील त्यांनी या जागेवरून विजय मिळवला होता. या निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या स्मृती इराणी यांना पराभूत केले होते. मात्र २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा अमेठी याच मतदारसंघातून पराभव केला. राहुल गांधी यांना पराभूत करून स्मृती इराणी या मतदारसंघाच्या भाजपाच्या दुसऱ्या लोकप्रतिनिधी ठरल्या. या जागेवर विजय मिळवण्यासाठी स्मृती इराणी तेथील लोकांना सतत भेटत होत्या. त्या जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्याचाच परिणाम म्हणून राहुल गांधी यांना अमेठी येथून पराभव पत्करावा लागला.
राहुल गांधी २०२४ साली याच मतदारसंघातून लढणार?
दरम्यान, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांचा चाहतावर्ग वाढला आहे. ते राष्ट्रीय राजकारणात आणखी सक्रिय झाले आहेत. त्यामुळे २०२४ साली ते याच मतदारसंघातून लढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.