२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ‘देशातील सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते?’ असे विधान केले होते. या विधानानंतर अब्रुनुकसानीच्या दाव्याखाली त्यांना दोषी ठरवण्यात आले. राहुल गांधी यांनी न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र, त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेणाऱ्या द्विसदस्यीय खंडपीठाचे अध्यक्ष असलेल्या न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी मी या याचिकेवरील सुनावणी द्यावी का? हे पक्षकारांनी ठरवावे, असे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर गवई यांनी अशी भूमिका का घेतली? हे जाणून घेऊया…
राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांनी या शिक्षेविरोधात गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, गुजरात उच्च न्यायालयानेदेखील राहुल गांधी यांची मागणी फेटाळली. त्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राहुल गांधी यांच्या याचिकेवर द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी घेतली जात आहे. या खंडपीठाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती बी. आर. गवई असून अन्य न्यायाधीश पी. के. मिश्रा हे आहेत. मात्र, त्यांनी या प्रकरणाच्या सुनावणीतून माघार घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माझ्या कुटुंबीयांचे या आधी काँग्रेसशी संबंध असल्यामुळे मी या याचिकेवर सुनावणी घ्यावी की नाही हे पक्षकारांनीच ठरवावे, असे गवई म्हणाले आहेत. न्यायाधीश एखाद्या प्रकरणाशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा अन्य कोणत्याही पद्धतीने संबंधित असतील, तर ते संबंधित प्रकरणाच्या सुनावणीमध्ये सहभागी नसतात.
न्यायमूर्ती गवई कोण आहेत?
गवई यांची २४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. ज्येष्ठतेच्या निकषानुसार त्यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती होऊ शकते. असे झाल्यास ते देशाचे दुसरे दलित सरन्यायाधीश ठरू शकतात. के. जी. बालकृष्णन हे देशाचे पहिले दलित सरन्यायाधीश आहेत. गवई हे २०२५ सालातील मे महिन्यात सरन्यायाधीशपदाची शपथ घेऊ शकतात. असे झाल्यास ते पाच महिने देशाचे सरन्यायाधीश असतील.
गवई यांचा काँग्रेससशी कसा संबंध आहे?
राहुल गांधी यांनी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी गवई अध्यक्ष असलेल्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे. राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते आहेत. याच कारणामुळे गवई यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे काँग्रेस पक्षाशी असलेल्या संबंधांबद्दल माहिती दिली. त्यानंतर दोन्ही पक्षकारांनी मी या प्रकरणावर सुनावणी घ्यावी की नाही ते ठरवावे, असे सांगितले.
न्यायमूर्ती गवई काय म्हणाले?
“माझ्याकडून काही अडचणी आहेत. माझे वडील काँग्रेस पक्षाचे सदस्य नव्हते. मात्र, ते काँग्रेस आणि त्यांचा अप्रत्यक्षपणे संबंध आलेला आहे. त्यांचे काँग्रेस पक्षाशी ४० वर्षे घनिष्ठ संबंध होते. काँग्रेसच्या पाठिंब्याने ते संसदेचे, विधानसभेचे सदस्य होते. माझे बंधू अजूनही राजकारणात आहेत. ते देखील काँग्रेसशी संबंधित आहेत”, अशी माहिती गवई यांनी दिली. त्यानंतर माझ्या कुटुंबीयांची अशी परिस्थिती असल्यामुळे पक्षकारांनी मी या याचिकेवर सुनावणी घ्यावी की नाही याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी पक्षकारांना केले.
न्यायमूर्ती गवई यांचे वडील कोण होते?
न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या वडिलांचे नाव रामकृष्ण सूर्यभान गवई (१९२९-२०१५) (रा. सू. गवई ) असे आहे. त्यांना लोक आदराने दादासाहेब म्हणायचे. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आंबेडकरवादी पक्षाशी संबंधित आहेत. ते २००६ ते २०११ या कालावधीत बिहार, सिक्कीम, केरळ या तीन राज्यांचे माजी राज्यपाल होते. रा. सू. गवई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते. तसे ते नागपूरमधील दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्षही होते. १९६४ ते १९९८ या काळात ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होते. ते १९९८ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत अमरावती येथून निवडून आले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती.
२००९ मध्ये केरळचे राज्यपाल असताना राज्य सरकारशी वाद
२००९ मध्ये केरळ राज्याचे राज्यपाल असताना रा. सू. गवई आणि राज्य सरकार असा वाद रंगला होता. तेव्हा व्ही. एस. अच्युतानंदन हे केरळचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीच्या विरोधात त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाला खटला चालवण्याची परवानगी दिली होती. भ्रष्टाचाराशी संबंधित हे प्रकरण होते. रा. सू. गवई यांच्या या निर्णयाला काँग्रेसप्रणित तत्कालीन केंद्र सरकारने पाठिंबा दिला होता. तेव्हा केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफ (यूनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट) विरोधी बाकावर होते.
न्यायमूर्ती गवई यांचे बंधू कोण आहेत?
न्यायमूर्ती गवई यांच्या बंधूंचे नाव डॉ. राजेंद्र गवई आहे. २००९ मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वेगवेगळ्या गटांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याच प्रयत्नांतर्गत राजेंद्र गवई यांनी सध्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी हातमिळवणी केली होती. मात्र, आगामी काळात या दोन्ही नेत्यांमध्ये फूट पडली. त्यानंतर गवई यांच्या गटाने काँग्रेसशी, तर रामदास आठवले गटाने भाजपाशी युती केली.