काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा १९ जून रोजी वाढदिवस झाला. आता ते ५३ वर्षांचे झाले आहेत. मार्च २००४ साली त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ते सतत प्रकाशझोतात राहिले. काँग्रेस पक्षाने २०१४ सालच्या लोकसभा निवडणुका राहुल गांधींच्या देखरेखेखाली लढविल्या मात्र त्यात त्यांना मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला. तेव्हापासून राहुल गांधींच्या नेतृत्वाची चिकित्सा अनेकदा झाली. तथापि, २००४ पूर्वी राहुल गांधी यांच्या जीवनाविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. तसेच त्यांच्या नागरिकत्वाबद्दल, त्यांच्या शैक्षणिक पदव्यांबाबत आणि इतर बाबींबाबत अनेकदा अफवा आणि विविध तर्क लढविले गेले. इंटरनेटवर याच्या सुरस कथा व्हायरल होत राहिल्या. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राहुल गांधी आणि त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांना लोकांच्या गर्दीपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते, असे काँग्रेसच्या सूत्रांनी अनेकदा सांगितले आहे. राहुल गांधी राजकारणात येण्यापूर्वी वयाच्या ३४ व्या वर्षांपर्यंत काय करत होते? याचा लेखाजोखा द इंडियन एक्सप्रेसने मांडला आहे.
राहुल गांधी यांचे शिक्षण
राहुल गांधी देहरादूनमधील डुन स्कूल येथे १९८१ रोजी शिक्षण घेण्यासाठी गेले, त्याआधी ते दिल्लीतील प्रतिष्ठित अशा सेंट कोलुंबा शाळेत शिक्षण घेत होते. १९८४ मध्ये माजी पंतप्रधान आणि राहुल यांच्या आजी इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव राहुल आणि प्रियंका यांना अनेक वर्ष घरीच शिक्षण देण्यात आले.
महाविद्यालयीन पदवीचे शिक्षण घेण्यासाठी राहुल गांधी यांनी नवी दिल्लीच्या सेंट स्टिफन महाविद्यालयात प्रवेश घेतला. जुलै १९८९ रोजी द न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलेल्या बातमीनुसार, राहुल यांनी जेव्हा महाविद्यालयात प्रवेश घेतला, त्यावेळी विरोधकांकडून आंदोलन करण्यात आले. “हे आंदोलन राहुल गांधी यांच्या विरोधात नव्हते. राहुल गांधी त्यावेळी १८ वर्षांचे होते. राहुल गांधी यांना क्लेय अँड ट्रॅप या खेळातील प्राविण्यामुळे महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. अशाप्रकारे भारतात फक्त खेळाडूंनाच प्रवेश दिला जातो. त्यामुळे हे आंदोलन झाले होते”, अशी माहिती बातमीत देण्यात आली.
न्यूयॉर्क टाइम्स या बातमीत एका प्राध्यापकाची प्रतिक्रिया दिली होती, ज्याचे नाव उघड करण्यात आले नव्हते. “आपण त्यांच्याबद्दल (राहुल गांधी) कृतज्ञ असायला हवे. ते नेहमीच हिंसेच्या छायेखाली वावरत आले. त्यांना सामान्य आयुष्य जगण्यास मिळाले नाही. त्यानांही महाविद्यालयात जाण्याचा, मोकळा श्वास घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी नेहमीच कडक सुरक्षेच्या कवचाखाली वावरावे, अशी अपेक्षा कुणी ठेवू नये”, अशी प्रतिक्रिया सदर प्राध्यापकांनी दिली होती.
काही दिवसांनंतर राहुल गांधी पुढील शिक्षणासाठी युनायटेड स्टेट्समधील हारवर्ड विद्यापीठात गेले. १९९१ साली त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यामुळे भारतात त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. भारतात पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाल्याने राहुल गांधी फ्लोरीडामधील रोलिन्स महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी गेले. तिथून त्यांनी १९९४ साली पदवी संपादन केली. रोलिन्स महाविद्यालयाच्या वेबसाईटवरील सेंटर फॉर इंडिया अँड साऊथ एशिया केंद्रमध्ये माजी विद्यार्थी म्हणून राहुल गांधी यांचे नाव नमूद असलेले दिसते.
एम.फिल करण्यासाठी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश
२००९ साली राहुल गांधी यांच्या पदवीवरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी केंब्रिज विद्यापीठाने जाहीर केले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्रिनिटी महाविद्यालयातून १९९५ साली डेव्हलपमेंट स्टडीज या विषयातून एम.फिल पूर्ण केले आहे. कुलगुरू आणि प्राध्यापक ॲलीसन रिचर्ड यांनी त्यावेळी सांगितले होते की, राहुल गांधी यांनी विद्यापीठातून त्यांचा अभ्यासक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केला.
महाविद्यालयानंतरचा काळ
राहुल गांधी यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात लंडनमधील मॉनिटर ग्रुप या कंपनीपासून केली. राजकारणात येण्यापूर्वी राहुल गांधी व्यावसायिक कारकीर्द घडवण्यावर ठाम होते. भारतात परतल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वतःची टेक्नॉलॉजी कन्सल्टन्सी सुरू केली, ज्याचे कार्यालय मुंबईत होते. या कन्सल्टन्सीमध्ये ते संचालक म्हणून काम करत होते.
हे वाचा >> Rahul Gandhi Birthday : शरद पवार ते एम. के. स्टॅलिन, राहुल गांधींवर शुभेच्छांचा वर्षाव!
बॅकअप्स सर्विसेस प्राइवेट लिमिटेड या नावाने २००२ साली या कंपनीची स्थापना केली होती. तसेच बॅकअप्स युके या नावाने त्यांनी दुसरीही एक कंपनी स्थापना केली होती. मात्र या कंपनीभोवती कालांतराने वाद निर्माण झाला. राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याची अफवा उठली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते. राहुल गांधींना २०१९ ची लोकसभा निवडणूक लढविण्यापासून प्रतिबंधित करण्यात यावे, अशी मागणी करणाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नागरिकत्वाचा मुद्दा निकाली काढून याचिका फेटाळून लावली.
काही कंपन्यांनी राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असल्याचा उल्लेख केल्यामुळे ते ब्रिटिश नागरिक बनतात का? असे विधान तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी याचिकेच्या सुनावणीदरम्यान केले. याचिकाकर्त्यांनी जी कागदपत्रे न्यायालयासमोर सादर केली, ती पाहिली असता या याचिकेवर सुनावणी घेण्यास आमचा विरोध असून ही जनहीत याचिका फेटाळण्यात येत असल्याचे सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने नमूद केले.
२००४ साली राहुल गांधी यांनी राजकारणात सक्रिय होण्याची घोषणा केली. अमेठीमधून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली आणि त्यात विजयही मिळवला.