रायगड पोलीस दलाच्या हद्दीत गेल्या आठ महिन्यांत तब्बल ९७ बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. या बेवारस मृतदेहांची ओळख पटवून तपास करणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. जिल्ह्यात बेवारस मृतदेह आढळून येण्यामागच्या कारणांचा थोडक्यात आढावा….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेवारस मृतदेह कुठे सापडले?

रायगड पोलीस दलाच्या हद्दीत २८ पोलीस ठाणी आहेत. गेल्या आठ महिन्यांत ९७ बेवारस मृतदेह आढळून आले, यात अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३, मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १, कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २, नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत २, पाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २, माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७, गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत २, श्रीवर्धनमध्ये ३, महाड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत १, महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३, महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २, पोलादपूरमध्ये ३, वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७, पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४, दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १, रसायनीमध्ये ३, खालापूरमध्ये १२, खोपोलीमध्ये ८, कर्जत मध्ये १०, नेरळमध्ये ६ बेवारस मृतदेहांचा समावेश आहे.

हेही वाचा – Indus Valley Civilization: उलगडली हडप्पाकालीन खाद्यसंस्कृती; भांड्यांच्या अवशेषांमध्ये नेमके सापडले काय?

मृतदेह सापडण्यामागची कारणे?

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या महानगरांना लागून असल्याने बरेचदा या महानगरांत हत्या झालेल्यांचे मृतदेह रायगड जिल्ह्यात निर्जनस्थळी आणून टाकले जातात. याशिवाय काही कारणांनी जिल्ह्यात स्थलांतरित झालेल्या मजुरांचा मृत्यू झाल्यास बरेचदा त्यांच्या वारसांचा शोध लागत नाहीत. त्यामुळे अशा मृतदेहांना बेवारस म्हणून घोषित केले जाते.

बेवारस मृतदेहांचे काय होते?

बेवारस मृतदेहांचा शोध घेणे आणि त्यांचे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पोलिसांवर येते, पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले जातात. आकस्मात मृत्यूची नोंद करून, या मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाते. व्हिसेरा जतन करून उर्वरित मृतदेहावर अंत्यविधी केले जातात. कित्येकदा पोलिसांना तपास करण्यास काही महिने लागतात. एवढा कालावधी मृतदेह जतन करणे शक्य नसते. त्यामुळे साधारणपणे तीन ते सात दिवसात बेवारस मृतदेहांवर अंत्यविधी केले जातात. अंत्यविधीचा खर्चही पोलिसांना करावा लागतो. तर काही वेळेस बेवारस मृतदेहावर अत्यंसंस्कार करण्यासाठी पोलीस स्थानिक स्वराज्य संस्थांची मदत घेतात. काही मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयांत दिले जातात.

मृतदेहांचा शोध घेणे आव्हानात्मक का?

बरेचदा बेवारस मृतदेह अंशतः विघटन झालेल्या स्थितीत सापडतात. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणे अतिशय अवघड होऊन बसते. मृतदेहाची ओळख पटली नाही तर पुढील तपासाला दिशा मिळू शकत नाही. त्यामुळे तपासातील गुंतागुत वाढते. मृतदेहाचे फोटे काढून त्यांचे वर्णन ‘सीसीटीएनएस’ प्रणालीद्वारे देशभरातील पोलीस ठाण्यांना पाठवले जातात, जेणेकरून बेवारस मृतदेहाची ओळख पटू शकेल. स्थानिक वृतपत्रांमध्ये बरेचदा अशा मृतदेहांची माहिती प्रसिद्धीसाठी दिली जाते. आसपासच्या जिल्ह्यांतील बेपत्ता झालेल्या लोकांची माहिती संकलित करून त्या पोलीस ठाण्यांना बेवारस मृतदेहांची माहिती दिली जाते. मात्र यातून बरेचदा काहीच निष्पन्न होत नाही. त्यामुळे पोलीस बेवारस मृतदेहांवर अंत्यविधी करून त्यांची विल्हेवाट लावतात.

हेही वाचा – ‘तो येईल आणि मला वाचवेल’ हे सांगणारा ‘Cinderella Complex’ म्हणजे नक्की काय?

गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ का झाली?

रायगड जिल्हा हा राज्याचा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. जेएनपीटी, दिघी, धरमतरसारखी व्यापारी बंदरे जिल्ह्यात विकसित झाली आहेत. पाताळगंगा, तळोजा, रोहा, महाड, विळे भागाड, नागोठणे, वडखळ आणि उसर येथे परिसरात मोठ्या औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहे. त्यामुळे देशभरातून जिल्ह्यात स्थलांतरित होणाऱ्या मजुरांचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे महामुंबईचा विस्तार रायगड जिल्ह्याच्या दिशेने सुरू झाल्याने जिल्ह्यात नागरीकरण आणि शहरीकरणाला गती मिळाली आहे. या निमित्ताने स्थलांतर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वाढते औद्योगिकरण आणि शहरीकरणाचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. गुन्हेगारीचे प्रमाणही वाढायला सुरुवात झाली आहे.

गुन्हेगारी कारवायांसाठी रायगडचा वापर कसा?

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. शिना बोरा हिची हत्या करून तिचा मृतदेह पेण-खोपोली रस्त्यावरील गागोदे येथील जंगलात आणून जाळण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील नेरूळ येथील सुमित जैन आणि अमिर खान जादा यांची हत्या करून त्यांचे मृतदेह पेणजवळील गागोदे आणि पनवेलजवळील कर्नाळा परिसरात टाकण्यात आले होते. कर्जत आणि अलिबाग तालुक्यातील नागाव येथेही अशा घटना समोर आल्या आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad district has become a dumping ground of abandoned dead bodies what are the reasons what are the challenges face by police print exp ssb