प्रबोध देशपांडे

जयपूर ते काचीगुडा हा उत्तर-दक्षिण भारताला जोडणारा मार्ग अद्याप अपूर्ण आहे. अकोला, खंडव्यावरून हा सर्वात जवळचा मार्ग आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर १० राज्यांना त्याचा लाभ होईल. या मार्गाच्या ब्रॉडगेजच्या कामात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा मुख्य अडथळा होता. त्यामुळे गत सहा वर्षांपासून या मार्गाचे काम रखडले होते. त्यावर उपाय म्हणून बुलढाणा जिल्ह्यातून पर्यायी मार्गाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची अडचण दूर झाली असून पर्यायी मार्गाच्या निर्मिती कार्याला वेग आला आहे.

जयपूर ते काचीगुडा रेल्वे मार्ग केव्हा अस्तित्वात आला?

उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा सर्वात जवळचा १४५० कि.मी.चा लांबीचा काचीगुडा-जयपूर हा रेल्वेमार्ग १९५६-५७ पासून अस्तित्वात होता. या मार्गावरून देशातील दोन प्रमुख भागांना जोडणारी मीनाक्षी एक्स्प्रेस धावत होती. मार्गावर प्रवासीसह मालवाहू गाड्यांची वाहतुकही सुरू होती. अत्यंत महत्त्वाच्या या मार्गाचे ब्रॉडगेज करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात काचीगुडा ते पूर्णा व जयपूर ते रतलाम या मार्गाचे ब्रॉडगेज करण्यात आले. २०१० मध्ये अकोला ते पूर्णा हा रेल्वे मार्गही ब्रॉडगेजमध्ये रुपांतरीत झाला. दरम्यान, २००८ मध्ये अकोला-खंडवा-रतलाम या मार्गाच्या ब्रॉडगेजलाही हिरवी झेंडी मिळाली.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा अडथळा काय होता?

काचीगुडा-जयपूर रेल्वे मार्गामधील प्रमुख टप्पा अकोट-आमला खुर्ददरम्यान ७८ कि.मी. मीटरगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील संरक्षित क्षेत्राचा मुख्य अडथळा आला. वाघांच्या अधिवासाला धोका निर्माण होण्याचे कारण पुढे करून वन्यजीव प्रेमींनी ब्रॉडगेज रेल्वे मार्गाला विरोध केला. मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्राच्या संरक्षित क्षेत्रातून ३८.२० कि.मी.चा मार्ग जातो. त्यात अतिसंरक्षित क्षेत्र १७ कि.मी.च्या आसपास आहे. रेल्वेने ब्रॉडगेजचा प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर केला होता. या मार्गाला परवानगी मिळाली नाही. विरोधामुळे या प्रकरणी न्यायालयामध्ये देखील धाव घेण्यात आली. हा प्रश्न न्यायप्रविष्ठ झाला. त्यामुळे हा रेल्वे मार्ग रखडला होता.

विश्लेषण : ‘डब्बा ट्रेडिंग’ म्हणजे काय आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो?

रेल्वे मार्गासाठी पर्याय काय काढण्यात आला?

जुन्या मार्गाने ब्रॉडगेज करण्यास वाढता विरोध व चिघळलेला प्रश्न लक्षात घेता केंद्र सरकारने रेल्वे मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरुन बुलढाणा जिल्ह्यातून पर्यायी मार्गाने करण्यास मंजुरी दिली. पूर्वी तुकईथडवरून दबका, धूलघाट, वानरोड, हिवरखेड येथून अडगाव असा रेल्वे मार्ग होता. आता मेळघाट प्रकल्पाच्या बाहेरून तुकईथडवरून खिकरी, खकनार, उसरनी, जामोद, सोनाला, हिवरखेड मार्गे अडगावला पोहोचणार आहे. पर्यायी मार्गामुळे ३० कि.मी.ने अंतर वाढेल. रेल्वे मंडळाने या प्रकल्पाची अतिआवश्यक कामात नोंदणी केली आहे.

रेल्वे मार्ग निर्मितीची सद्यःस्थिती काय?

अकोला ते खंडवादरम्यान अकोला-अकोट रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले. त्यावरून रेल्वेच्या फेऱ्या देखील सुरू झाल्या आहेत. आमला खुर्द ते खंडवादरम्यान काम प्रगतीपथावर आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा अडथळा दूर झाल्याने अकोट-आमला खुर्द मार्गाच्या निर्मिती कार्याला देखील प्रारंभ झाला. या मार्गासाठी लागणाऱ्या खासगी जमिनी अधिग्रहण करण्यासाठी भारत सरकारने राजपत्र जाहीर केले. या मार्गावरील कामांसाठी निविदा देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. या मार्गावरील तुकईथड येथे तापती नदीवरील पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून रेल्वेच्या ताब्यातील जागेवर बांधकाम सुरू करण्यात आले आहे. आता या मार्गाच्या निर्मिती कार्याला गती आली.

न्यूयॉर्कमध्ये चीनच्या गुप्त पोलीस चौकीचा भांडाफोड; जगभरात चीनने १०० गुप्त पोलीस चौक्या का उभारल्या?

जयपूर ते काचीगुडा रेल्वे मार्ग महत्त्वाचा का?

उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा जयपूर ते काचीगुडा हा १४५० कि.मी.चा सर्वात जवळचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. हा मार्ग पूर्णत्वास गेल्यावर सुमारे ३०० कि.मी.चे अंतर कमी होईल. या मार्गावरून कमी वेळेत दिल्ली देखील गाठता येईल. या मार्गाचे महत्त्व ओळखून तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या प्रकल्पाला २००८ मध्ये मंजुरी दिली. रेल्वे प्रशासनाने या मार्गाचा ‘आरओआर’ २५ टक्के काढला असून, त्यानुसार या मार्गासाठी लागणारा खर्च चार वर्षात वसूल होईल. हा अत्यंत व्यस्त व जवळचा मार्ग ठरेल. या मार्गामुळे देशातील अनेक राज्यांना फायदा होणार आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, काश्मीर आदी राज्यातील प्रवाशांना हा मार्ग सोयीस्कर ठरण्यासोबतच वेळ, अंतर व पैसा वाचेल. बहुतांश गाड्या या मार्गावरून वळणार असल्याने मध्य रेल्वेच्या नागपूर व भुसावळ रेल्वेस्थानकावरील अतिरिक्त भार सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे.

prabodh.deshpande@expressindia.com

Live Updates
Story img Loader