सध्या मुंबईत पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. साधारण एप्रिल, मे महिन्यात असा पाऊस दरवर्षी पडतो. यंदाही हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. तो खरा ठरवत मंगळवारी, बुधवारी मुंबईत काही ठिकाणी पाऊस रिमझिमला. उन्हाळ्याच्या दिवसांत पाऊस का पडतो, याला अवकाळी पाऊस का म्हणतात, मोसमी पाऊस आणि या पावसातील फरक काय या प्रश्नांचा वेध.
मुंबईत एप्रिलमध्ये पाऊस का पडतो?
भारतीय द्वीपकल्पाच्या दोन बाजूंना अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर आहे. महाराष्ट्रात या दोन्ही दिशांकडून येणारे वारे वाहत असतात. या वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा वेगवेगळी असते. समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये बाष्प असते. हे वारे उष्ण असतात. हे वारे महाराष्ट्रात वाहात असतानाच उत्तरेकडून थंड आणि कोरडी हवा वाहू लागते. हे दोन्ही परस्परविरोधी वारे एकमेकांशी भिडतात. हे दोन्ही वारे एकमेकांशी भिडण्यासाठी महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती अनुकूल असते. अनेकदा वाऱ्यांची द्रोणीय स्थिती निर्माण होते. त्यामुळे मुंबईबरोबरच राज्यातील इतर भागातही या कालावधीत पाऊस पडतो.
अवकाळी पाऊस म्हणजे काय?
हिवाळा संपताना आणि उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताना जो पाऊस पडतो तो अवकाळी पाऊस म्हणून गणला जातो. दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. अवकाळी पाऊस वातावरणीय बदलामुळे तर कधी स्थानिक पातळीवरील हवामानाच्या स्थितीमुळेही पडू शकतो. पश्चिम आणि पूर्वेकडील वाऱ्यांच्या स्थितीमुळे या हंगामात मुंबईत पूर्व मोसमी सरींची हजेरी ही अगदीच सामान्य आहे. उन्हाळ्याच्या महिन्यांत मुंबईत अवकाळी पाऊस पडणे अपरिचित नाही. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात साधारण ८० ते ८५ टक्के पाऊस हा मोसमी पावसामुळे पडतो. तर, १५ ते २० टक्के पाऊस हा साधारण नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत पडतो.
पश्चिमी प्रकोपामुळे हिवाळ्यातही पाऊस
पश्चिमी प्रकोपामुळेही राज्यात हिवाळ्यात पाऊस पडू शकतो. पश्चिमी प्रकोप म्हणजे उत्तर भारतात पश्चिमेकडून येणारी वादळे किंवा झंझावात. हिवाळ्याच्या काळात येणाऱ्या या वादळांमुळे काश्मिर आणि हिमाचल प्रदेशात हिमवर्षाव होतो तर उत्तर भारत, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात पाऊस पडतो. समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि उत्तरेकडून येणारी थंड हवा एकमेकांनी भिडल्याने फेब्रुवारी मार्चमध्ये काही वेळा महाराष्ट्रात पाऊस पडतो.
मुंबईत यापूर्वी झालेल्या पावसाच्या नोंदी
मुंबईत मार्च आणि एप्रिलमध्ये झालेल्या हवामान विभागाकडील पावसाच्या नोंदींवरून, सांताक्रूझ केंद्रात मार्च २०२३ मध्ये अधिक पाऊस झाला होता. २१ मार्च रोजी १७.१ मिमी पावसाची नोंद झाली होती, त्यानंतर मार्च २०१६ मध्ये १० मिमी आणि २०१५ मध्ये १३ मिमी पाऊस पडला होता. दरम्यान, एप्रिलच्या नोंदीनुसार की मुंबईत २०२३ मध्ये एप्रिल महिन्यात सर्वात जास्त पाऊस पडला होता, यावेळी १४.८ मिमी पावसाची नोंद झाली होती.
तापमानावर पावसाचा परिणाम
पावसामुळे किनारपट्टीवरील शहरातील तापमानात घट होण्याची शक्यता असते. हा फरक ढगाळ वातावरणामुळे जाणवतो. त्यानंतर ढगाळ वातावरण ओसरल्यावर पुन्हा तापमनात वाढ होते. त्याचबरोबर हवामान प्रणालीतील इतर अनेक घटकांवर तापमान अवलंबून असते.
उन्हाळी पाऊस आणि मोसमी पाऊस फरक
मोसमी पावसाची चाहूल हा वळवाचा पाऊस देतो. मात्र या दोन्ही पावसांत खूप फरक आहे. मोसमी पाऊस मोठ्या आणि विस्तृत प्रक्रियेचा परिणाम असतो तर पूर्व मोसमी किंवा वळवाच्या पावसाला स्थानिक, तात्कालिक परिस्थिती कारणीभूत असते. आर्द्रता आणि वाढती उष्णता हे वळवाच्या पावसाचे संकेत मानले जातात. सोसाट्याचा, वादळी वारा, धुळीचे लोट, विजांचा कडकडाट यांसह वळीव हजेरी लावतो. साधारणपणे दुपारनंतर, रात्री वळवाचा पाऊस हजेरी लावतो. मोसमी पावसात संततधार असते मात्र वारे तुलनेने संथ, स्थिर होतात. दिवसभरात कोणत्याही वेळी, एकाच वेळी मोठ्या क्षेत्रावर मोसमी पाऊस पडतो. दोन्ही पावसाच्या ढगांमध्येही फरक असतो. वळवाचा पाऊस देणाऱ्या ढगांचा आकार सतत बदलतो. मोसमी पावसाचे ढग दाट असतात आणि त्याचे एकसारखे थर असतात.
मोसमी पावसाचे वेळापत्रक काय?
भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्षानुवर्षांची निरीक्षणे, संकेत यानुसार मोसमी पाऊस दाखल होण्याच्या तारखा निश्चित केलेल्या आहेत. त्यानुसार मोसमी पाऊस सर्वप्रथम २० मेच्या सुमारास अंदमान निकोबार बेटांवर दाखल होतो. नैर्ऋत्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरातून प्रवास करत १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो ५ जूनपर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो. १० जूनला महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यात पोहोचतो. मात्र दरवर्षी तो या ठरावीक तारखेलाच येतो, असे नाही. काही वेळा केरळात तो दोन-चार दिवस आधी किंवा पाच ते सहा दिवस विलंबाने देखील दाखल होतो. पावसाचे वेळापत्रक प्रमाण मानून पावसाचे आगमन हे आधी किंवा विलंबाने आहे हे ठरवले जाते.