राजस्थानच्या प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या महिला अधिकारीचे बुधवारी रात्री निधन झाले. ५ सप्टेंबर रोजी जोधपूरमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर दोन आठवड्यांनी अहमदाबादमधील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आणि दावा केला आहे की त्यांना ॲनेस्थेशियाचा (भूल देणारे औषध) जास्त डोस देण्यात आला होता. त्यांच्या निधनाने बिश्नोई समाजात संतापाची लाट उसळली असून, कुटुंबीयांच्या आरोपांनंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रकरण नक्की काय आहे? कोण होत्या प्रियांका बिश्नोई? जाणून घेऊ.

नेमके प्रकरण काय?

प्रियांका बिश्नोई (वय ३३) या २०१६ च्या बॅचच्या अधिकारी होत्या. त्या जोधपूरमध्ये उपविभागीय दंडाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, जोधपूरच्या खाजगी वसुंधरा रुग्णालयात ५ सप्टेंबर रोजी त्यांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती बिघडत गेली. त्यांच्या कुटुंबीयांकडून शस्त्रक्रियेत चूक केल्याचा आरोप डॉक्टरांवर करण्यात आला. त्यानंतर त्यांना अहमदाबादमधील रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना ॲनेस्थेशियाचा जास्त डोस दिल्यामुळे त्या कोमात गेल्या होत्या. “वसुंधरा रुग्णालयामधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आम्ही तिला गमावले,” असे त्यांचे सासरे सहिराम बिश्नोई यांनी ‘ईटीव्ही भारत’ला सांगितले आणि जबाबदार डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

हेही वाचा : ड्रॅगनची नवी खेळी; अरुणाचल प्रदेशजवळ चीनकडून हेलीपोर्ट उभारणी, भारतासाठी ही चिंतेची बाब का?

रुग्णालयाची प्रतिक्रिया काय?

रुग्णालय प्रशासनाने निष्काळजीपणाचा आरोप फेटाळून लावला आहे. ते म्हणतात की, उपचारात कोणतीही चूक झाली नव्हती. शस्त्रक्रियेनंतर केलेल्या चाचण्यांदरम्यान समस्या आढळून आली होती. त्यांनी हेदेखील सांगितले की, शस्त्रक्रियेपूर्वी बिश्नोई यांना खूप तणाव होता. वसुंधरा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. संजय मकवाना यांनी सांगितले की, बिश्नोई शस्त्रक्रियेतून बऱ्या झाल्या होत्या आणि त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते. मकवाना यांनी दावा केला की, चाचणीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना चिडचिड आणि अस्वस्थता जाणवू लागली.

रक्त तपासणीत इलेक्ट्रोलाइट असंतुलन आढळल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) पाठवण्यात आले. मात्र, तरीही त्या अस्वस्थ होत्या. डॉ. मकवाना यांनी इकोकार्डियोग्राफी आणि पोट स्कॅनसह इतर चाचण्या करण्यात आल्याचीही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कुटुंबाने ७ सप्टेंबर रोजी त्यांना अहमदाबादला स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, एक वैद्यकीय पथक त्यांच्याबरोबर तेथे गेले. मकवाना म्हणाले की, जेव्हा त्या तिथे पोहोचल्या तेव्हा सीटी स्कॅनमध्ये मेंदूत रक्तस्त्राव दिसून आला; ज्याचा संबंध आर्टिरिओव्हेनस मॅफॉर्मेशन (एव्हीएम)शी जोडलेला होता. एव्हीएम एक असामान्य आणि सामान्यतः जन्मजात असते, असे त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. बिश्नोई यांचे बुधवारी अहमदाबादमधील सीआयएमएस रुग्णालयात निधन झाले आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्स जोधपूर येथे नेण्यात आला.

सीबीआय चौकशीची मागणी

जोधपूरचे जिल्हाधिकारी गौरव अग्रवाल यांनी त्यांच्या निधनाच्या दोन दिवस आधी बिश्नोई यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या दाव्याची चौकशी सुरू केली. जोधपूर येथील संपूर्णानंद वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एसएनएमसी) प्राचार्या भारती सारस्वत यांच्या मार्गदर्शनाखाली पाच जणांचे पथक या प्रकरणाचा तपास करणार आहे. बिश्नोई समाजाचे नेते देवेंद्र बुडिया यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली असून प्रियांका बिश्नोई यांच्या मृत्यूमागे कट असल्याचे म्हटले आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी बिश्नोई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. “राजस्थान प्रशासकीय सेवा अधिकारी प्रियांका बिश्नोई जी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. प्रभू श्री राम त्यांच्या दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी मी प्रार्थना करतो,” असे त्यांनी ‘एक्स’वर लिहिले. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि वसुंधरा राजे यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. वसुंधरा राजे म्हणाल्या की, “प्रियांका बिश्नोई महिला सक्षमीकरणाचे उदाहरण होत्या.”

कोण होत्या प्रियांका बिश्नोई?

बिश्नोई यांचा जन्म बिकानेर येथे ८ ऑगस्ट १९८१ रोजी झाला. त्यांचे वडील वकील होते. ‘मनीकंट्रोल’नुसार, त्यांनी उत्पादन शुल्क निरीक्षक विक्रम बिश्नोई यांच्याशी लग्न केले होते. कामावर असताना त्या अनेकदा पारंपरिक राजस्थानी कपडे परिधान करताना दिसायच्या. १५ ऑगस्ट रोजी राज्य सरकारने त्यांना शासकीय सेवेसाठी मान्यता दिली. त्यांच्या निधनाच्या केवळ एक महिना अगोदर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी चालवण्यात येणाऱ्या सम्राथल फाऊंडेशनविषयी सांगितले. बिश्नोई समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ही संस्था काम करते. त्या या संस्थेच्या मदतीने राजस्थान प्रशासकीय सेवा अधिकारी कशा झाल्या, त्याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “मी आठवीत असताना एका स्पर्धेत तिसरी आली होती. त्यावेळी मला जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरस्कार मिळाला. जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन आमच्या शाळेच्या प्रांगणात शिरले, तेव्हा त्यांच्या वाहनावरील दिव्याने मी आकर्षित झाले. इयत्ता १०वीतही मला जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरस्कार घेण्याची संधी मिळाली. त्या क्षणी मी ठरवले की या पदात काहीतरी खास आहे, कारण या पदाचा खूप आदर केला जातो.”

हेही वाचा : कॅनडात शिक्षणासाठी जाणे आता आणखी कठीण, कॅनडाकडून विद्यार्थी व्हिसात कपात; भारतीय विद्यार्थ्यांवर याचा कसा परिणाम होणार?

शालेय शिक्षणानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर आणि बँक भरती परीक्षेची तयारी करत असतानाही, जेव्हा त्या जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या तेव्हा त्यांना फार चांगला अनुभव आला. त्यांनी स्पष्ट केले की, “ऑफिसबाहेर जमलेली गर्दी बघून मला वाटले की मीही या पदासाठी प्रयत्न करू शकते. मी माझ्या वडिलांना विचारले की मला उपविभागीय अधिकारी होण्यासाठी काय करावे लागेल. जेव्हा मी हा प्रश्न विचारला तेव्हा माझ्या वडिलांच्या डोळ्यात चमक दिसली आणि ती चमकच माझी प्रेरणा ठरली.” बिश्नोई २०१६ मध्ये राजस्थान प्रशासकीय सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. पूर्वी जोधपूरमध्ये त्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांना या महिन्याच्या सुरुवातीला जोधपूर उत्तर महानगरपालिकेत उपायुक्त पदावर बढती देण्यात आली होती, मात्र त्यांनी हे नवीन पद स्वीकारले नव्हते.