इसवी सनाच्या ९ व्या शतकात होवून गेलेल्या राजा मिहीर भोज यांच्या पुतळ्याचे गेल्यात आठवड्यात हरियाणाच्या कैथलमध्ये भाजपा जिल्हाध्यक्षांनी अनावरण केले. या अनावरणाच्या कार्यक्रमात राजा भोज यांचा उल्लेख ‘गुर्जर- प्रतिहार सम्राट मिहीर भोज’ असा करण्यात आला. त्यामुळे रुष्ट झालेल्या ३५ स्थानिक आमदारांनी राजीनामा देण्याचे ठरविले होते. राजा भोज यांचा उल्लेख गुर्जर- प्रतिहार असा केल्यामुळे राजपूत समाजातील भाजपा नेते नाराज होते, राजा भोज यांना ‘हिंदू सम्राट’ न संबोधता ‘गुर्जर- प्रतिहार’ ही जातीवाचक उपाधी लावल्याने त्यांनी ही नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरियाणातील सध्याचा वाद काय आहे?

हरियाणाच्या कैथलमधील गुर्जर समाजाने सम्राट मिहीर भोजाच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची योजना आखली होती आणि तसेच त्या पुतळ्याला ‘गुर्जर- प्रतिहार सम्राट (राजा)’ संबोधले होते, यावर राजपूत समाजाने आक्षेप घेतला. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने हस्तक्षेप करून दोन्ही समुदायांच्या सदस्यांमध्ये अनेक बैठका घेतल्या, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. १९ जुलै रोजी जेव्हा गुर्जरांच्या त्या कृतीला विरोध करण्यासाठी कैथलमध्ये जमलेल्या राजपूतांवर पोलिसांनी लाठीमार केला त्यावेळेस परिस्थिती आणखीच बिकट झाली. २० जुलै रोजी, राजपूतांचा निषेध सुरू असतानाही, गुर्जर समाजाच्या नेत्यांनी पुतळ्याचे अनावरण केले. त्यामुळे नाराज झालेल्या तब्बल ३५ नेत्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा दिला.

आणखी वाचा: विश्लेषण: मेलुहा ते इंडिया भारताच्या विविध नावांचा प्रवास कसा झाला?

भाजपचे कैथलचे आमदार लीला राम गुजर सांगतात, “मिहीर भोज हे ‘गुर्जर सम्राट’ असल्याचा ठोस पुरावा आज उपलब्ध आहे. इराक, इराण, अफगाणिस्तान आणि ब्रह्मदेश हे या देशाचा भाग असताना त्यांनी राज्य केले होते. त्यामुळेच राजपूत समाजाचे सदस्य त्यांचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी इतिहासाची मोडतोड करू शकत नाहीत.” दुसरीकडे, एका स्थानिक राजपूत नेत्याने सांगितले की, “जर पुतळ्याला राजपूत-गुर्जर सम्राट, हिंदू सम्राट किंवा छत्रपती सम्राट असे नाव दिले असते तर आम्ही त्याचे समर्थन केले असते.”

मिहीर भोज कोण होते ?

मिहीर भोज (इ. स. ८३६-८८५) हे नवव्या शतकातील एक यशस्वी आणि महत्त्वाकांक्षी भारतीय शासक होते. कुरुक्षेत्र विद्यापीठाचे प्राध्यापक एस.के. चहल त्याबद्दल सांगतात, “त्या काळी गुर्जर-प्रतिहारांचे साम्राज्य काश्मीरपासून गुजरातपर्यंतच्या विशाल भागावर होते. मिहीर भोज यांनी दख्खन आणि माळव्यातील प्रदेशही यशस्वीपणे जिंकले होते.” प्रा. चहल हे कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख आणि समाजशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आहेत. ते सांगतात, “नवव्या शतकात कनौजवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठा राजकीय संघर्ष होता. कारण कनौज जिंकेल तो देशाचा सम्राट होईल असे त्या काळी मानले जात होते. म्हणून, देशाने त्या काळातील तीन मोठ्या शक्तींमध्ये त्रिपक्षीय संघर्ष पाहिला – गुर्जर-प्रतिहार, दख्खनचे राष्ट्रकूट आणि बंगालचे पाल. त्या संघर्षात मिहीर भोज हे सर्वार्थाने यशस्वी ठरले. त्यांनी राष्ट्रकूटांकडून गुजरात आणि माळव्याचा प्रदेश जिंकून घेतला. त्याचप्रमाणे, भोज राजाने बंगालच्या दिशेने मोहीम सुरू केली आणि बंगालच्या पालांकडूनही गोरखपूरचा प्रदेश जिंकला.

भोज वंशाविषयी इतिहासकार काय म्हणतात?

चंदीगडच्या पंजाब विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक एम राजीवलोचन सांगतात, “गुर्जर प्रतिहार मिहीर भोज ज्या गटाशी संबंधित होते, ते सहसा राजपूत आणि गुर्जर दोन्ही मानले जातात. त्यामुळे त्यांच्या दोन परिचयांमध्ये खरेतर कोणताही संघर्ष नाही.”
या विषयी पुढे स्पष्टीकरण देताना, चहल सांगतात “गुर्जर ही प्राचीन भारतातील भटकी जमात होती, प्रामुख्याने राजस्थान आणि गुजरातमध्ये त्यांचा आढळ असायचा. आणि सम्राट मिहीर भोज या जमातीतला होता असे मानले जाते. परंतु, असेही मानले जाते की त्यांनी स्वतःसाठी क्षत्रिय दर्जा मिळावा यासाठी खास प्रयत्न केले होते. या राजवंशाची प्रतिहार शाखा राजपूतांशी जोडलेली होती. प्राचीन भारतात केवळ क्षत्रिय (योद्धा) राजा होऊ शकतो, असे मानले जात असे. त्यामुळेच सर्व राजे क्षत्रिय दर्जाचा दावा करत होते.”
चहल सांगतात, “तुम्ही इतिहासात जसजसे खोलवर जाता तसतसे जातीय ओळख अस्पष्ट दिसते. जातीच्या रेषा धुरकट होतात, आज आपण ज्या जाती मान्य करतो त्या प्राचीन भारतातील नसून खूप नंतर निर्माण झाल्या आहेत. प्राचीन राज्यकर्त्यांच्या जातींच्या नावावर अलीकडे वाढत चाललेले वाद हे आधुनिक काळातील राजकारणाचे परिणाम आहेत आणि त्याचा इतिहासाशी काहीही संबंध नाही”

आणखी वाचा: इंग्रज ताजमहाल चोरून नेणार होते? इतिहासातील पुरावे काय सांगतात?

याच जातीच्या मुद्यावरून भूतकाळात झालेले वाद कोणते?

बिहारमध्ये २०२२ मध्ये, क्षत्रिय परिषद नावाच्या (research and advocacy group) गटाने” ‘गुर्जर-प्रतिहार’ राजा मिहीर भोज याला राजपूत गटात सामील करून घेण्याची मोहीम सुरू केली होती. त्यापूर्वी २०२१ मध्ये, मिहीर भोज इंटर कॉलेजमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनावरण केलेल्या राजाच्या पुतळ्याच्या फलकावरून ‘गुर्जर’ हा शब्द काढून टाकल्याच्या निषेधार्थ गुर्जरांनी उत्तर प्रदेशातील दादरी येथे महापंचायत घेतली होती. आता या नव्या वादाच्या निमित्ताने सम्राट मिहीर भोज पुन्हा चर्चेत असून त्याच्या ऐतिहासिक कामगिरीकडे दुर्लक्षच होते आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajput gurjar dispute in bjp haryana what does history say about mihir bhojs caste svs
Show comments