Rani Karnavati Rakhi Humayun राज्यसभेच्या खासदार, प्रसिद्ध लेखिका, समाजसेविका तथा इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधनानिमित्त एक कथा सांगितली. ही कथा राणी कर्णावती आणि हुमायून यांची होती. परंतु, त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओनंतर त्यांना ट्रोल करण्यात आलं. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी या घटनेनंतर देशभर रक्षाबंधन साजरा करण्याची परंपरा सुरुवात झाली असं कॅप्शनमध्ये लिहिलंं आहे. त्यामुळे त्यांना ट्रोल केलं गेलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. हा दिवस केव्हापासून साजरा केला जातोय याविषयी अनेक कथा-दंतकथा सांगितल्या जातात. पौराणिक संदर्भानुसार रक्षाबंधन मूळचे राजासाठी होते. तर उत्तर भारतात चाकरांनी मालकांना राखी बांधण्याची परंपरा होती. परंतु ऐतिहासिक कालखंडापासून राखी बांधण्याची एक नवी परंपरा सुरू झाली. ती म्हणजे बहीण आपल्या भावाला राखी बंधू लागली. भावाचा उत्कर्ष व्हावा आणि भावाने बहिणीला संरक्षण द्यावे, ही त्यामागची भूमिका होती. मुघल काळात अनेक राजपूत स्त्रिया राखी तयार करून आजूबाजूच्या राजांना पाठवत. यामागील मूळ हेतू हा स्वसंरक्षणाचा होता. इतिहासातले एक उदाहरण या बाबतीत प्रसिद्ध आहे. उदयपुरची राणी कर्णावती हिने गुजरातच्या बहादूर शहापासून रक्षण व्हावे म्हणून हुमायूनला भाऊ मानून राखी पाठवली होती. पौराणिक-देवीदेवतांच्या कथा वगळल्यास हा एकमेव संदर्भ हा मुघलांशी या परंपरेचा संबंध असल्याचे सांगतो. राणी कर्णावतीने हुमायूनला राखी पाठवून बहादूर शहाच्या आक्रमणाविरुद्ध मदत मागितली होती अशी कथा प्रचलित आहे. तेव्हापासून रक्षाबंधन मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येऊ लागल्याचे मानले जाते. त्याच अनुषंगाने या वदंतेत किती तथ्य आहे, याचा घेतलेला हा आढावा.

अधिक वाचा: ‘या’ क्रूरकर्मा मुघल सम्राटाने दिल्लीत केली होती मद्यबंदी! नेमके काय घडले होते?

कर्णावती राणी कोण होती?

राणी कर्णावती ही गुहिला (सिसोदिया) शासक महाराणा संग्राम सिंह प्रथम यांची पत्नी होती. महाराणा संग्राम हे राणा संगा म्हणूनही ओळखले जातात. राणा संगाने मेवाडवर राज्य केले. दिल्लीच्या इस्लामिक शक्तींचा कठोर प्रतिकार केला. खानवाच्या लढाईनंतर, ३० जानेवारी, १५२८ रोजी महाराणा यांचे निधन झाले. राणा संगानंतर, त्यांचे पुत्र रतन सिंह आणि विक्रमादित्य (विक्रमजीत) हे मेवाडचे शासक झाले. परंतु राजपूत सरदारांना हा निर्णय पसंतीस पडला नव्हता. त्यामुळे ते विक्रमादित्याला साथ देत नव्हते; परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राणी कर्णावतीने राज्याची सूत्रे हाती घेतली. मेवाडवर गुजरातचा शासक कुतुबुद्दीन बहादूर शाहच्या हल्ल्याचा धोका असल्याने तिने राजपूत सरदारांना एकत्र येण्याचे आवाहन केले. तिच्या आवाहनाचा अपेक्षित परिणाम झाला आणि राजपूत एकत्र आले. तिने राणा संगाच्या दोन्ही मुलांना विक्रमजीत आणि उदय सिंह यांना कर्णावतीच्या बुंदी येथील आपल्या माहेरी पाठवले. राजपूतांनी राणी कर्णावतीच्या आज्ञेत बहादूर शहाला तोंड देण्याची तयारी केली.

काय आहे कर्णावती- हुमायून यांच्यातील राखीची कहाणी?

चित्तौड़ येथील राजपूत- बहादूर शहा लढाईच्या संदर्भात कर्णावती- हुमायून यांच्यातील राखी कथा प्रसिद्ध आहे. या कथेनुसार, राजपूतांनी बहादूर शाहविरुद्ध लढायचे ठरवल्यानंतर राणीने हुमायूनला मदतीसाठी आवाहन केले होते. तिने हुमायूनला लिहिलेल्या पत्राबरोबर राखी पाठवली असे कथेत म्हटले आहे. बंगालच्या मोहिमेवर निघालेल्या हुमायूनला पत्र मिळताच, राखीचा मान ठेवण्यासाठी तो चित्तौड़च्या दिशेने निघाला परंतु तो उशिरा पोहचला. तोपर्यंत कर्णावतीने इतर राजपूत महिलांसह जोहार केला होता. हुमायूनने नंतर विक्रमादित्यला मेवाडच्या गादीवर बसवले असे कथेत सांगितले जाते.

मिथकाच्या उत्पत्तीचे मूळ

ईस्ट इंडिया कंपनीचा (EIC) कर्नल जेम्स टॉड हा एकोणिसाव्या शतकात मेवाडच्या दरबारात होता. त्याने आपल्या Annals and Antiquities of Rajasthan या पुस्तकात या कथेचा उल्लेख केला आहे. टॉड रक्षाबंधनाचा उल्लेख ब्रेसलेटचा सण म्हणून करतो. हे ब्रेसलेट धोक्याच्या प्रसंगी कुमारिकांकडून पाठवले जाते, असे त्याने नमूद केले आहे. टॉडने हुमायूनला एक ‘खरा योद्धा’ म्हणून संबोधले ज्याने बहादूर शाहचा हल्ला परतवून लावत विक्रमादित्यला पुन्हा राज्यावर बसवून आपल्या वचनाचे पालन केले. या कथेप्रमाणे टॉडने जोधा-अकबरच्या मिथकाचा प्रसार केला; नंतर हीच कथा बॉलीवूड चित्रपट आणि हिंदी टीव्ही मालिकांनी लोकप्रिय केली.

इतिहास काय सांगतो?

विशेष म्हणजे समकालीन इतिहासकारांपैकी कोणीही राखी पाठवल्याच्या घटनेचा उल्लेख करत नाही. नंतरच्या इतिहासकारांनीही या कथेला ‘दंतकथा’ मानले. इतिहासकार सतीश चंद्र त्यांच्या ‘हिस्ट्री ऑफ मिडीव्हल इंडिया’ या पुस्तकात लिहितात, “कोणत्याही समकालीन लेखकाने या कथेचा उल्लेख केलेला नाही आणि कदाचित ती खरीही नसेल”. अर्चना गरोडिया गुप्ता आणि श्रुती गरोडिया यांनी मुलांसाठी लिहिलेल्या ‘History of India for Children (Vol 2): From the Mughals to the Present’ या पुस्तकात, ‘बहादूर शाहने चित्तौड़ ताब्यात घेतल्यानंतर काही महिन्यांनी हुमायून तिथे पोहोचला, असे म्हटले आहे.

ऐतिहासिक कागदपत्रे काय सांगतात?

“हुमायूनने त्याचा सहधर्मवादी बहादूर शाहची बाजू घेतली. राणी कर्णावती हिने हुमायूनला मदतीसाठी आवाहन केले होते, परंतु हुमायूनने ग्वाल्हेरला जाणे आणि दोन महिने तेथे राहणे याशिवाय कोणताही प्रतिसाद दिला नाही”, असे एस. के. बॅनर्जी यांनी त्यांच्या ‘हुमायून बादशाह’ या पुस्तकात म्हटले आहे. कर्णावतीने हुमायूनची मदत मागितल्याचे बॅनर्जी सांगत असले तरी त्यांनी तिच्याकडून ‘राखी’ पाठवल्याचा उल्लेख केलेला नाही. यावरूनच राणीने फक्त मदतीसाठी पत्र पाठवले असेल असं सूचित होत. परंतु ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये हुमायूनकडून तिला झालेल्या मदतीचा कोणताही संदर्भ सापडत नाही. किंबहुना ग्वाल्हेर किल्ल्यात मुक्काम केल्यानंतर हुमायून ४ मार्च, १५३३ रोजी आग्र्याला परतला. तर २४ मार्च, १५३३ रोजी झालेल्या करारात चित्तौड़चा पहिला वेढा संपल्याचा उल्लेख आहे. म्हणजे त्या सुमारास हुमायून ग्वाल्हेर किल्ल्यात असताना मदतीसाठी गेला नाही. बनर्जींनी नमूद केलेल्या हुमायून आणि कुतुबुद्दीन बहादूर शाह यांच्यातील पत्रांच्या देवाणघेवाणीतून आणखी एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे हुमायून ग्वाल्हेरमध्ये होता तेव्हा त्याला बहादूर शाहचे पत्र मिळाले होते. गुजरातच्या सुलतानाने इस्लामिक कायद्याचा संदर्भ देऊन हस्तक्षेप न करण्याचे या पत्रात सुचवले होते.

अधिक वाचा: दख्खनमधील ‘या’ गुलामाने केला होता मुघलांचा पराभव

गद्दारीचा बदला!

पहिल्या वेढ्यानंतर १५३३ मध्ये बहादूर शाहचा चित्तौड़च्या राणाबरोबर तह झाला होता. या तहात त्याला काही प्रदेश मिळाले. परंतु तहाच्या दोन वर्षानंतर त्याने चित्तौड़ उध्वस्त केले. बहादूर शाह चित्तौड़ला दुसरा वेढा घालण्यात व्यग्र असताना हुमायूनला हवा असणारा मोहम्मद जामा हा गुजरातमध्ये होता. हुमायूनने सांगूनही शाहने जामाला परत पाठवण्यास नकार दिल्याने मुघलांनी गुजरातवर हल्ला केला. या हल्ल्यात बहादूर शाहचा सेनापती तातार खान पराभूत झाला. यावेळी बहादुरशाह सिसोदियांशी युद्धात गुंतलेला असताना हुमायून त्याच्यावर हल्ला करण्यासाठी किंवा चित्तौड़गड वाचवण्यासाठी गेला नाही. याच दरम्यान हुमायून हा उज्जैनमध्ये दबा धरून राहिला कारण त्याला बहादूर शहावर हल्ला करायचा होता आणि त्याने तो केलाही. हुमायूनने शेवटी गुजरात सल्तनतचा शेवट केला. यामागे उदिष्ट एकच होते ते म्हणजे बहादूर शाहने हुमायुनाशी गद्दारी करणाऱ्याला आश्रय दिला होता, त्याचा बदला त्याला घ्यायचा होता. यात कोठेही चित्तौड़चा संबंध नव्हता.

एकूणच, कर्णावती आणि हुमायून यांची कथा ही अर्धसत्य आहे हेच यातून सिद्ध होते!

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raksha bandhan 2024 the myth and reality behind rajput rani karnavati sending a rakhi to mughal emperor humayun svs
Show comments