रामनाम हे एक वेगळेच समीकरण आहे. त्याच्या केवळ स्मरणाने वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. आणि संपूर्ण जगाला रामायण स्वरूपी रसायनाने वेड लावले. रामायणाच्या या वेडाला जात, धर्म, देश अशी कोणतीच बंधन अडवू शकली नाहीत. याचेच दाखले वेगवेगळ्या प्रांतिक- भाषक रामायणांतून मिळतात. याच रामनामाची भुरळ एका मुघल सम्राटाच्या आईला आणि तिच्या मुलालाही पडली होती. रामनवमीच्या निमित्ताने याविषयी जाणून घेणे नक्कीच रंजक ठरणारे आहे.
अधिक वाचा: विश्लेषण: रामायण एक अन्वयार्थ अनेक!
कोण होता ‘तो’ मुघल सम्राट?
१६ व्या शतकाच्या उत्तरार्धात तुलसीदासांनी अवधीमध्ये ‘रामचरितमानस’ रचण्यास सुरुवात केली. त्याच कालखंडात दिल्लीतील एका मुघल सम्राटाने रामायणाचे फारसीमध्ये भाषांतर करण्यास सुरुवात केली. या प्रकल्पाची सुरुवात १५७४ मध्ये झाली. हा मुघल सम्राट दुसरा तिसरा कोणी नाही, तर अकबर होता. अकबराने सुरू केलेल्या या भाषांतराच्या प्रकल्पाची सांगता १५८४ साली झाली. मूळ संस्कृत श्लोकांचे भाषांतर अकबराच्या दरबारातील ब्राह्मणांनी अवधी भाषेत केले. त्यानंतर त्याचे अवधीतून फारसीमध्ये भाषांतर करण्यात आले. आणि त्यात संबंधित लघुचित्रांचाही समावेश करण्यात आला. अकबर हा तत्त्वज्ञान, साहित्य, कला प्रेमी असल्यानेच त्याने हिंदू रामायण- महाभारत या संस्कृत महाकाव्यांचे फारसीमध्ये भाषांतर करवून घेतल्याचे मानले जाते. परंतु अकबराच्या रामायणाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू त्याची आई हमीदा बानो बेगम ही होती. अकबराची आई रामायणाचे पठण करत असे, असा संदर्भ अनेक इतिहासकार नमूद करतात. हमीदा बानो बेगम यांची रामायणाची स्वतःची अशी एक खास प्रत होती.
दोहा रामायण
हमीदा बानो बेगम यांची रामायणाची प्रत दोहा येथील ‘म्युझियम ऑफ इस्लामिक आर्ट’ या वस्तूसंग्रहालयात आहे. त्यामुळे हे रामायण दोहा रामायण म्हणूनही ओळखले जाते. १९९० पर्यंत ही प्रत अज्ञातवासात होती. नाजूक नक्षीकाम असलेल्या या हस्तलिखितात मूळ वाल्मिकी रामायणाचाही संदर्भ सापडतो. हमीदा बानो बेगम या मृत्यूशय्येवर असताना त्यांनी रामायणाची प्रत पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे रामायण हे त्यांच्या हृदयाच्या जवळ असल्याचे अनेक इतिहासकार नमूद करतात. हमीदा बानो बेगम या सीतेच्या वेदनांशी जोडल्या गेल्या होत्या. सीतेच्या कथेशी त्या आपले जीवन जोडण्याचा प्रयत्न करत, असेही अनेक अभ्यासक नमूद करतात. त्यामुळेच हमीदा बानो यांची अकबराची आई या खेरीज ओळख काय होती हे जाणून घेणेही तेवढेच महत्त्वाचे ठरते.
कोण होत्या हमीदा बानो बेगम?
हमीदा बानो बेगम ही दुसरा मुघल सम्राट हुमायून याची पत्नी, तर तिसरा मुघल सम्राट अकबर याची आई होती. अकबराच्या कालखंडात त्यांना पादशाह बेगम आणि मरणोत्तर मरियम माकानी या पदव्या बहाल करण्यात आल्या होत्या. मूलतः पर्शियन वंशातील हमीदा बानो बेगम यांचा जन्म इ.स. १५२७ साली वडील शेख अली अकबर आणि आई माह अफरोज बेगम यांच्या पोटी झाला. शेख अली अकबर जामी हे पहिला मुघल सम्राट बाबर याचा सर्वात धाकटा मुलगा मुघल राजपुत्र हिंदल मिर्झा याचे शिया गुरू होते. एकूणात, हमीदा बानो बेगम हिची जडणघडण एका धर्माभिमानी मुस्लीम कुटुंबात झाली होती.
लग्नाला नकार
हमीदा बानो बेगम ही चौदा वर्षांची असताना तिचा विवाह हुमायुनशी ठरवण्यात आला. याच कालखंडात शेरशाह सुरीच्या सैन्यामुळे हुमायूनला दिल्लीतून हद्दपार केले होते. त्यामुळे हुमायुनची उठबस मिर्झा हिंदलच्या घरी वाढली होती. हमीदा बानो बेगमबरोबर हुमायूनच्या लग्नाच्या वाटाघाटी सुरू असताना, हमीदा आणि हिंदल या दोघांनीही या लग्नाच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला होता. त्यामुळे हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात गुंतलेले होते अशी शक्यता इतिहासकार नोंदवितात.
हिंदलची बहीण आणि हमीदाची जवळची मैत्रीण गुलबदन बेगम हिने तिच्या हुमायुन-नामा या पुस्तकात हमीदा बानो हीचा वावर आपल्या आईच्या- दिलदार बेगमच्या आणि भावाच्या वाड्यात असायचा असे नमूद केले आहे. त्यामुळे हमीदा हिंदलच्या प्रेमात असण्याची शक्यता होती, परंतु सध्या ते सिद्ध करणारे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. सुरुवातीला हमीदाने हुमायून बादशहाला भेटण्यास नकार दिला; अखेर चाळीस दिवसांच्या पाठपुराव्यानंतर आणि दिलदार बेगमच्या सांगण्यावरून तिने त्याच्याशी लग्न करण्यास होकार दिला.
अधिक वाचा: विश्लेषण : रामानं नाही, लक्ष्मणानं केला रावणाचा वध – जैन रामायण
विवाह, परंतु स्थैर्य नाही!
हुमायून आणि हमीदा बानो यांचा विवाह १५४१ मध्ये सिंधमधील दादू जिल्ह्यातील पाट येथे झाला. ही हुमायूनची बेगा बेगम नंतरची दुसरी पत्नी होती. हा विवाह तत्कालीन राजकीयदृष्टया हुमायूनसाठी फायदेशीर ठरला. परंतु हमीदा बानो हिच्या नशिबात या विवाहानंतर सततची भटकंती आली. याच भटकंतीत २२ ऑगस्ट १५४२ रोजी हुमायून हमीदा बानो बेगमसह उमरकोट येथे पोहचला. राणा प्रसाद या हिंदू सोधा राजपूत शासकाने त्याला आश्रय दिला. तिथेच दोन महिन्यानंतर हमीदा बानो हिने अकबराला जन्म दिला. यानंतर तिने अनेक वर्षे पतीबरोबर खडतर प्रवास केला. अकबराच्या कालखंडात तिच्या आयुष्याला स्थिरता लाभली. या कालखंडात तिने महिलांच्या न्यायालयीन प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप केल्याची अनेक उदाहरणे आहेत, जी तिची मुघल दरबारातील भूमिका पुरती स्पष्ट करतात. आयुष्यभर केलेला खडतर प्रवास हा तिला सीतेच्या वनवासाप्रमाणे भासत होता.
२९ ऑगस्ट १६०४ रोजी आग्रा येथे तिच्या मृत्यू झाला. इंग्रज प्रवासी थॉमस कॉरिएटने नोंदविले आहे की, अकबराने तिला प्रचंड आदर दिला. लाहोर ते आग्रा या प्रवासादरम्यान अकबर स्वतः तिची पालखी नदीच्या पलीकडे घेऊन गेला होता. अकबराने आपल्या संपूर्ण आयुष्यात केवळ दोन वेळाच मुंडन केले होते. पहिल्यांदा त्याची पालक-माता माहम अनगा आणि दुसऱ्यांदा हमीदा बानो बेगम यांच्या मृत्यूनंतर. जहांगीर हमीदा बानो बेगम यांना ‘हजरत’ म्हणून संबोधात असे. हमीदा बानो बेगम यांच्या विषयीची माहिती हुमायूननामा, अकबरनामा, ऐन-इ-अकबरी या ग्रंथांमधून मिळते.