अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आता हे मंदिर सर्वसमान्यांसाठी खुले झाले आहे. दरम्यान, भारतभरातील भाविक प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत येणार आहेत. अयोध्येत येणाऱ्या या भाविकांची संख्या प्रचंड असणार आहे. परिणामी अयोध्या हे आता व्यापार आणि व्यवसायाचेही मोठे केंद्र ठरू शकते. हीच बाब लक्षात घेता देशातील वेगवेगळ्या उत्पादन कंपन्यांनी अयोध्येत आपल्या उत्पादनांच्या प्रचारास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राम मंदिरामुळे अयोध्येतील व्यापार आणि व्यवसाय उदिमात काय बदल होतील? वेगवेगळ्या कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काय काय करत आहेत? हे जाणून घेऊ या….
अयोध्या ठरणार मोठी बाजारपेठ
अयोध्येतील राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या काही दिवस अगोदरपासूनच देशातील वेगवेगळ्या उत्पादन कंपन्या अयोध्येत आपल्या उत्पादनांची जाहिरात करत आहेत. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्पादनांच्या जाहिरातीसाठी जास्तीत जास्त वापर करून घेण्याचा प्रयत्न या कंपन्यांचा होता. आगामी काळात अयोध्येत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन या कंपन्यांनी जाहिरातींसाठी आपली रणनीती आखलेली आहे. आपल्या उत्पादनांचे फलक, बॅनर्सपासून ते आपल्या फक्त प्राणप्रतिष्ठेनिमित्त तयार करण्यात आलेली मोजक्या उत्पादनांमार्फत कंपन्यांनी आपली जाहिरात करण्याचा प्रयत्न केला.
अयोध्येतील दुकाने, ढाबे, रेस्टॉरंट्स तसेच उत्तर प्रदेशमधील लखनौ, गोरखपूर, वाराणसी अशा प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात फलकं लावण्यात आली आहेत. तसेच दुकानं, ढाबे आणि रेस्टॉरंट्समध्ये कुलर्स, वेंडिंग मशीन नव्याने बसवून त्यांच्या माध्यमातून जाहीरात करण्याचा प्रयत्न केला जातोय.
मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात जाहिरात
कोका-कोला, पार्ले, डाबर तसेच आयटीसी यासारख्या एफएमसीजी कंपन्यांनीही आपापल्या पद्धतीने अयोध्येत जाहिरात केली आहे. यातील अनेक कंपन्यांनी अयोध्येतील मंदिर परिसरात आपली जाहिरात कशी होईल, यासाठी प्रयत्न केलेले आहेत. या कंपन्यांनी मंदिर परिसरात वेगवेगळे होर्डिंग्स लावले आहेत. यातील काही कंपन्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आपली जाहिरात व्हावी यासाठी काही कोटी रुपये खर्च केलेले आहेत.
धाबे, उपहारगृहांची डागडुजी
अयोध्येकडे जाणाऱ्या मार्गावरील धाबे, उपहारगृहे यांनीदेखील आपली रिब्रँडिंग करण्यास सुरुवात केली आहे. डाबर या कंपनीने महामार्गालत असलेल्या अशा भोजनालयांशी करार केले आहेत. या भोजनालयांजवळ डाबरने आपले स्टॉल उभारले आहेत. उत्पादनांचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा यासाठी या कंपनीकडून लोकांना चहा, केसांचे तेल यासारख्या उत्पादनांचे नमुने (सँपल) दिले जात आहेत.
आयटीसीकडून ‘खुशबू पथा’ची निर्मिती
आयटीसीने आपल्या अगरबत्तीच्या जाहिरातीसाठी थेट श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राशी हातमिळवणी केली आहे. आयटीसी या ट्रस्टच्या मदतीने मंदिर परिसरात एक ‘खुशबू पथा’ची निर्मिती करत आहे. मंदिर परिसरात असलेल्या या पथावर सुगंधित अगरबत्त्या असणार आहेत. आयटीसीने मंदिरातील रोजच्या प्रार्थनेसाठी पुढील सहा महिन्यांसाठी धूप दान केले आहे. मंदिरातील गर्दीचे नियोजन करता यावे यासाठी आयटीसीने मुख्य मंदिर परिसरात ३०० आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ १०० बॅरिकेड्स दिले आहेत.
भाविकांची संख्या १० पटीने वाढण्याची शक्यता
अयोध्येतील लोकसंख्या साधारण ३ लाख ५० हजार आहे. राम मंदिर होण्यापूर्वी अयोध्येतील बाजारपेठ छोटी होती. तज्ज्ञांच्या मतानुसार आगामी काळात अयोध्येला भेट देणाऱ्यांची संख्या १० पटीने वाढणार आहे. त्यामुळे हे शहर भविष्यात मोठी बाजारपेठ ठरणार आहे. येथे रोजच्या जीवनावश्यक वस्तू तसेच पूजेसाठी लागणाऱ्या इतर सामानाची मागणी वाढणार आहे. हीच बाब लक्षात घेता वेगवेगळ्या कंपन्यांनी अयोध्येतील आपल्या उत्पादन पुरवठ्यात वाढ केली आहे.
उत्पादनांचे उभारले स्टॉल
डाबर कंपनीचे सीईओ मोहीत मल्होत्रा यांनी ‘द हिंदू बिझनेसलाईन’ला बोलताना अयोध्येत केल्या जाणाऱ्या जाहिरातींविषयी प्रतिक्रिया दिली. “राम मंदिरातील राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही एक ऐतिहासिक बाब आहे. दैनंदिन आवश्यक वस्तूंच्या मागणीत होणारी वाढ लक्षात घेऊन आम्ही अयोध्येत विशेष झोन तयार करत आहोत. येथे भाविक वेगवेगळे ज्यूस, डाबर आमला हेअर ऑईल, डाबर वेदिक चहा यासारख्या आमच्या उत्पादनांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतात. आमच्या उत्पादनांना स्पर्श करू शकतात,” असे मल्होत्रा यांनी सांगितले.
कोका-कोला, डाबर कंपन्यांची जाहिरात
कोका कोला या कंपनीने आपल्या उत्पादनांच्या रंगात बदल करून रामलल्लाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर या कंपनीने ५० वेंडिंग मशीन ठेवल्या आहेत. आपली उत्पादने किरकोळ विक्रेत्यांपर्यंत वेळेत पोहोचावीत यासाठी या कंपनीकडून प्रयत्न केले जात आहेत. या कंपनीकडून स्थानिक विक्रेत्यांना त्यांच्या दुकानांमध्ये सुधारणा करण्यासाठी मदत केली जात आहे. कोका-कोला कंपनीने भाविकांसाठी चेंजिंग रुम, पार्क तयार केले आहेत.
पार्ले कंपनीचेही अयोध्येवर लक्ष
पार्ले कंपनीही अयोध्येवर लक्ष ठेवून आहे. “अयोध्येची लोकसंख्या ३ ते ५ लाख आहे. मात्र राम मंदिरामुळे या शहरात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे,” असे पार्ले कंपनीचे सिनियर कॅटेगिरी हेड कृष्णराव बुद्धा यांनी सांगितले.
ज्वेलर्सकडून खास ‘सियाराम कलेक्शन’
अयोध्येतील आऊटडोअर जाहिरातीच्या दरात ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जाहिरातीची अनेक ठिकाणं याआधीच कंपन्यांनी करारबद्ध करून ठेवली आहेत. काही काही कंपन्यांना तर जाहिरातीसाठी योग्य ठिकाण भेटत नाहीये. आभूषणे तयार करणाऱ्या सेन्को गोल्ड अँड डायमंड्स या ब्रँडनेही अयोध्येत आपली जाहिरात सुरू केली आहे. या ब्रँडकडून खास अशा ‘सियाराम कलेक्शन’ची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये पेंडेंट, नेकलेस, इअररिंग्सचा समावेश असून या आभूषणांवर राम मंदिर कोरण्यात आले आहे. इतर ज्वेलर्सनेदेखील खास अयोध्या कलेक्शनची निर्मिती केली आहे. या आभूषणांत राम आणि सीता आहेत. जयपूरच्या एका घड्याळ निर्मिती करणाऱ्या कंपनीने प्रभू रामाचे चित्र असलेल्या खास घड्या अयोध्येत विकण्यासाठी आणल्या आहेत.
‘अमूल दूध’ची खास जाहिरात
भारतभरात दूध उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या अमूल या कंपनीनेही राम मंदिर उद्घाटनाचे औचित्य साधून खास जाहिरात केली आहे. या जाहिरातीत एक मुलगी अनवाणी पायाने उभी असून राम मंदिरासमोर प्रार्थना करताना दाखवलेली आहे. तर ‘लक्षावधी लोकांचे आशास्थान असलेल्या राम मंदिराचे आम्ही स्वागत करतो,’ असा मजकूर या जाहिरातीवर लिहिण्यात आलेला आहे.
जाहिरात करताना कंपन्या घेतायत काळजी
दरम्यान, हवाई वाहतूक तसेच ट्रॅव्हल्स कंपन्यादेखील अयोध्यावारीसाठी जाहिरात करणार आहेत. या कंपन्या फक्त मंदिर सर्वांसाठी खुले होण्याची वाट पाहात होत्या. मात्र अयोध्येत वेगवेगळ्या कंपन्या आपल्या उत्पादनांच्या जाहिराती करत असल्या तरी त्यासाठी विशेष काळजी घेत आहेत. कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत, याचा या कंपन्या कटाक्षाने प्रयत्न करत आहेत.