बोटीवर आपत्कालीन सुरक्षा सामग्रीचा अभाव होता. अपघाताची सूचना किनाऱ्यावर देण्यासाठी कुठलीच यंत्रणा अस्तित्वात नव्हती. त्यामुळे बोटीला अपघात झाल्याची सूचना मिळूच शकली नाही. मदतीसाठी कोणी येऊ शकले नाही. त्यामुळे दुर्घटनेत तब्बल ६२५ जणांचा बुडून मृत्यू झाला.
मुंबईहून घारापुरी बेटावर जाणाऱ्या बोटीला नुकतीच नेव्हीच्या स्पीड बोटने धडक दिली या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला तर ९८ जण थोडक्यात बचावले. या दुर्घटनेमुळे अरबी समुद्रात १९४७ मध्ये झालेल्या रामदास बोट दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. टायटॅनिक जहाजाचा अपघात जितका भीषण होता तितकीच ही दुर्घटना भयानक होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोकण किनापट्टीवरील जल वाहतुकीचे महत्त्व..

अरबी समुद्रात मुंबई ते गोवा दरम्यान पूर्वीपासून जलप्रवासी बोटीचीं वाहतूक सुरू होती. या बोटी रेवस, जयगड, रत्नागिरी, मालवणमार्गे गोव्याला जात असत. बोट सेवा १९६० च्या दशकात बंद पडली. त्याच धर्तीवर स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुंबईतील भाऊचा धक्का ते रेवस दरम्यान जलप्रवासी वाहतूक होत होती. अलिबागहून मुंबईला जाण्यासाठी सागरी महामार्ग प्रमुख दळणवळणाचे साधन होते. रस्त्यांची आणि पुलांची कामे झाली नसल्याने दैनंदिन वाहतुकीसाठी याच मार्गाचा अवलंब केला जात असे. अलिबाग परिसरातील स्थानिक कामानिमित्ताने मुंबईतील लालबाग, परळ, गिरगाव या परिसरात वास्तव्याला होते. ते सुट्टीच्या दिवशी गावाकडे येण्यासाठी या मार्गाचा अवलंब करत असत.

हेही वाचा >>> Land Acquisition Act 2013 : भूसंपादन कायदा काय आहे? शेतकरी त्यासाठी आंदोलन का करत आहेत?

दुर्घटना कशी घडली?

१७ जुलै १९४७ रोजी रामदास बोट साडेआठशे प्रवाशांना घेऊन रेवसच्या दिशेने सकाळी आठच्या सुमारास निघाली होती. अमावस्या असल्याने समुद्राला मोठे उधाण होते. भल्या मोठ्या लाटा उसळत होत्या. सोसाट्याचा वारा सुटला होता. काळ्या ढगांनी आकाशात गर्दी केली होती. बोटीचे कॅप्टन शेख सुलेमान मात्र निर्धास्त होते. कारण हा मार्ग त्यांच्यासाठी नवीन नव्हता. मात्र मुंबई पासून साधारणपणे नऊ सागरी मैलावर असताना बोट काश्याच्या खडकाजवळ वादळात सापडली. लाटांच्या तडाख्यात सापडल्याने बोट कलंडली. भारताच्या सागरी इतिहासातील ही सर्वात मोठ्या बोट दुर्घटना ठरली.

अपघाची भीषणता किती?

भारताच्या सागरी वाहतूक इतिहासातील ही सर्वात मोठी दुर्घटना ठरली. बोट कलंडल्यामुळे बोटीवरील साडेआठशे प्रवासी पाण्यात पडले. बोटीवर आपत्कालीन सुरक्षा सामग्रीचा अभाव होता. अपघाताची सूचना किनाऱ्यावर देण्यासाठी कुठलीच यंत्रणा अस्तित्वात नव्हती. त्यामुळे बोटीला अपघात झाल्याची सूचना मिळूच शकली नाही. मदतीसाठी कोणी येऊ शकले नाही. त्यामुळे दुर्घटनेत तब्बल ६२५ जणांचा बुडून मृत्यू झाला. ज्यांना चांगले पोहता येत होते असे लोक पोहत किनाऱ्याच्या दिशेने निघाले. काहींना मच्छीमार बोटी दिसल्या. त्यांनी पोहणाऱ्या प्रवाशांना बाहेर काढून रेवस किनाऱ्यावर आणले. तर काही जण पोहत ससुन डॉक बंदरावर पोहोचले. यानंतर बोट दुर्घटनेची माहिती यंत्रणांना कळली.

दुर्घटनेचा परिणाम काय झाला?

रामदास बोट दुर्घटनेनंतर जलप्रवासी वाहतुकीमधील सुरक्षा त्रुटी पहिल्यांदा अधोरेखित झाल्या. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे, बोटींच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणे, सुरक्षा साधन सामग्रींचा बोटीवर आभाव असणे, आणि खराब हवामान या सारखे घटक अपघातास कारणीभूत ठरले. यानंतर जलप्रवासी वाहतुक नियमात आमूलाग्र बदल केले गेले. खराब हवामानात बोटींच्या वाहतुकीवर निर्बंध आले. बोटींवर दूरसंचार उपकरणे बाळगण्यास सुरवात झाली. जलप्रवासी वाहतुकीचे सुरक्षित मार्ग निश्चित करण्यात आले.

कोकण किनारपट्टीवर यापूर्वी झालेल्या दुर्घटना कोणत्या?

रामदास बोट दुर्घटनेपूर्वीही कोकण किनारपट्टीवर दोन मोठे बोट अपघात झाले होते. १९२७ साली जयंती आणि तुकाराम नावाच्या दोन बोटी एकाच दिवशी बुडाल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या या दोन बोटींच्या दुर्घटनांत १४३ जणांचा मृत्यू झाला होता. जयंती बोटीवरील सर्व ९६ जणांचा तर तुकाराम बोटीवरील ४७ जणांचा मृत्यू झाला होता.

अलिकडच्या काळात झालेल्या बोट दुर्घटना कोणत्या?

४ जून २०२१ रोजी आलेल्या तौक्ते वादळात ओएनजीसी कंपनीचा पी ३०५ तराफा आणि वरप्रदा नौका बुडाली होती. या दुर्घटनेत ८६ जणांचा मृत्यू झाला होता. तर १८८ जण बचावले होते. १४ मार्च २०२० रोजी गेट वे ऑफ इंडिया येथून मांडवा येथे जाणारी अजंठा कंपनीची एक बोट बुडाली होती. मांडवा पासून ५०० मीटरवर असतांना बोट खडकावर आदळून बोटीचा खालचा भाग फुटला होता. त्यामुळे बोट बुडाली. यावेळी ८५ प्रवाशी आणि ५ खलाशी बोटीत होते. मात्र याच वेळी पोलीसांची गस्ती नौका जात होती. त्यांनी तातडीने बोटीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती.

कोणत्या उपाय योजना गरजेच्या?

बोट दुर्घटना टाळण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक रोखणे, बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लाईफ जॅकेटची सक्ती करणे, रिंग बोयाज तसेच इतर सुरक्षा सामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवणे. जीर्ण आणि जुन्या झालेल्या बोटींच्या वापरावर निर्बंध आणणे, बोटींची वाहतूक करताना नेमून दिलेल्या मार्गाचा अवलंब करण्याची सक्ती करणे आणि खराब हवामान असताना बोटींना समुद्रात जाण्यापासून रोखणे, बेदरकार चालणाऱ्या स्पीड बोटींवर कारवाईचा बडगा उगारणे असे उपाय अत्यावश्यक ठरतात.

harshad.kashalkar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas boat accident india s titanic tragedy that killed 625 in 1947 year print exp zws