बलात्काराच्या आरोपाखाली भारताबाहेर पळालेल्या स्वयंघोषित स्वामी नित्यानंद याने केलेल्या एका दाव्यामुळे त्याचा तथाकथित देश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २४ फेब्रुवारी रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या जिनिव्हा येथे संपन्न झालेल्या “आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क” परिषदेत ( United Nations Committee on Economic, Social and Cultural Rights – CESCR) चर्चा करण्यासाठी नित्यानंदच्या तथाकथित देश ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’चे प्रतिनिधी सहभागी झाले होते. स्वतः नित्यानंद यांनी आपल्या ट्विटरवर या बैठकीचे फोटो ट्विट केले आहेत. या फोटोंमध्ये एका महिलेने भगवी साडी परिधान केलेली आहे, तिच्या डोक्यावर पगडी असून अंगावर दागिने आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विशेष म्हणजे नित्यानंदचा ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’ (USK) हा देश संयुक्त राष्ट्र संघाच्या नोंदणी केलेल्या १९३ देशापैकी नाही. २०१९ साली नित्यानंदवर बलात्कार आणि लहान मुलांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नित्यानंदने भारतातून पलायन केले. २०२० साली नित्यानंदने इक्वाडोरच्या समुद्रकिनारी असलेले एक बेट विकत घेऊन तिथे स्वतःचा देश स्थापन केल्याचा दावा केला. या देशाला ‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’ असे नाव देण्यात आले असून त्यांचा स्वतःचा ध्वज आहे, संविधान, आर्थिक व्यवस्था, पासपोर्ट आणि स्वतःचे प्रतीक देखील आहे.

संयुक्त राष्ट्र संघातर्फे जिनिव्हामध्ये “आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क” परिषदेची १९ वी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत युएसकेकडून काही सदस्य सहभागी झाले. तर दोन सदस्यांनी युएसकेकडून चर्चेत सहभाग घेतला, असे आयएएनएस या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. युएसकेच्या प्रतिनिधिंनी या चर्चेत सहभाग कोणत्या आधारावर घेतला, हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. या बैठकीत सहभाग घेण्यासाठीची प्रक्रिया CESCR च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या उच्च मानवाधिकार आयोगाच्या वेबसाईटनुसार CESCR हे सध्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क आणि शाश्वत विकासावर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करत आहे. २४ फेब्रुवारी झालेली बैठक ही या समितीमधील सदस्यांशी चर्चा करुन अंतिम मसुदा ठरविण्यासाटी आयोजित करण्यात आली होती. CESCR ची स्थापना २९ मे १९८५ रोजी झालेली आहे.

युएसके प्रतिनिधींनी या बैठकीत काय म्हटले?

आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, युएकेच्या विजयाप्रिया नित्यानंद या प्रतिनिधीने दावा केला की, कैलासा हा प्राचीन हिंदू धोरणे आणि देशी उपायांची अंमलबजावणी करणारा देश आहे. हिंदू तत्त्वांनी वेळोवेळी आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. शाश्वत विकासासाठी स्वदेशी उपाय योग्य असल्याचे विजयाप्रिया यांनी सांगितले. तसेच नित्यानंद यांचा भारतात छळ करण्यात आल्याचेही विजयाप्रिया यांनी नमूद केले. नित्यानंद यांच्या प्रवचनावर बंदी घालण्यात आली तसेच त्यांना त्यांच्या मातृभूमीतून हद्दपार व्हावे लागले. नित्यानंद यांना मदत करण्यासाठी काय केले जाऊ शकते? असा प्रश्न विजयाप्रिया यांनी पॅनेलला विचारला. आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार पॅनेलमधील कोणत्याही तज्ज्ञाने युएसकेच्या प्रश्नांना किंवा टिप्पण्यांना उत्तर दिले नाही.

‘युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा’ची लोकसंख्या किती?

दक्षिण अमेरिकेच्या इक्वाडोर येथील एक बेट नित्यानंद यांनी विकत घेतले आहे. भारतापासून १७ हजार किमीच्या दुरीवर हे बेट आहे. लोकसंख्येच्या बाबत बोलायचे झाल्यास कैलासाच्या वेबसाईटने दावा केला आहे की, हिंदू धर्माला माननारे जगातील २०० कोटी लोक त्यांचे नागरिक आहेत. मात्र संयुक्त राष्ट्र संघात बोलत असताना विजयाप्रियाने कैलासामध्ये २० लाख हिंदू राहत असल्याचे सांगितले. तसेच १५० देशांमध्ये कैलासाने दूतावास कार्यालय आणि स्वयंसेवी संस्था स्थापन केल्या आहेत. या देशाचा हिंदू हा एकमेव धर्म असून इथे संस्कृत, तामिळ आणि इंग्रजी भाषा बोलल्या, वापरल्या जातात. तसेच कैलासामध्ये स्वतःची घटना असून हिंदू शास्त्र आणि मनुस्मृतीच्या आधारावर ही घटना आहे.

कोण आहे नित्यानंद?

नित्यानंदचे खरे नाव राजशेखरन असून त्याचा जन्म १ जानेवारी १९७८ साली तामिळनाडू राज्यात झाला. त्याच्या वडीलांचे नाव अरुणाचलम आणि आईचे नाव लोकनायकी आहे. १९९५ साली नित्यानंदने मॅकेनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. असे सांगितले जाते की, वयाच्या १२ व्या वर्षांपासूनच त्याने रामकृष्ण मठात धार्मिक शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. १ जानेवारी २००३ रोजी त्याने स्वतःचा पहिला आश्रम बंगळुरुच्या बिदादी येथे सुरू केला. त्यानंतर त्याने अनेक ठिकाणी आश्रम सुरू केले. तो स्वत:ला ईश्वराचा अवतार मानतो.

२०१० साली दोन मुलींचे अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप नित्यानंदवर करण्यात आला होता. या प्रकरणी गुजरातमधील अहमदाबाद पोलिसांकडे गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर बलात्कार प्रकरणात पौरुषत्वाची चाचणीचे प्रकरणही चांगलेच गाजले होते. २०१९ साली गुजरात पोलिसांनी नित्यानंदने भारतामधून पलायन केल्याची माहिती न्यायलयाला दिली. कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ साली नित्यानंदला जामीन मंजूर झाला. याचाच फायदा घेत तो देशातून पळून गेला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape accused fugitive nityananda fictional country kailasa attended un event representatives kvg