Rashmika Mandanna Reaction on Fake Viral Video अभिनेत्री रश्मिका मंदाना एका लिफ्टमध्ये प्रवेश करतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चांचे वादळ उठले आहे. हा व्हिडीओ मुळात बनावट असून तो अभिनेत्री मंदानाचा ‘डीपफेक’ व्हिडिओ आहे. मूळ व्हिडिओमध्ये ब्रिटिश भारतीय मुलगी ‘झारा पटेल’ ही आहे, व्हिडीओमध्ये झारा पटेल हीच्या मूळ चेहऱ्याऐवजी रश्मिका मंदानाचा चेहरा मॉर्फ करून लावण्यात आलेला आहे.
या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय ऊर्जा आणि तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर नमूद केले, “डीपफेक हा नवीनतम आणि चुकीच्या माहिती प्रसाराचा अधिक धोकादायक आणि हानिकारक प्रकार आहे, जो सर्रास सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतो. याशिवाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि डिजिटल फसवणुकीशी संबंधित आयटी नियमांचे कायदेशीर दायित्वही त्यांनी नमूद केले. राजीव चंद्रशेखर म्हणाले, तक्रारीच्या ३६ तासांच्या आत असे व्हिडिओ आणि चुकीची माहिती रद्दबातल ठरविणे ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची कायदेशीर जबाबदारी आहे. ते म्हणाले, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने याचे पालन केले नाही तर आयपीसीच्या तरतुदींनुसार पीडित व्यक्ती त्या सोशल प्लॅटफॉर्म विरोधात न्यायालयात जाऊ शकते.
अधिक वाचा: डीपफेक तंत्रज्ञान ठरतेय धोकादायक ! महिलांनी का राहायला हवं सावध?
आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी (AI) संबंधित तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, इंटरनेटवर डीपफेक प्रचलित होत आहेत. यामध्ये चित्र, ऑडिओ किंवा व्हिडिओ यांचा समावेश आहे, ज्याची निर्मिती सखोल तंत्रज्ञान वापरून केली जाते, ही मशीन लर्निंगची एक शाखा आहे जिथे वास्तविक दिसणारी बनावट सामग्री (चित्रे, ऑडिओ किंवा व्हिडिओ) तयार करण्यासाठी सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात डेटा समाविष्ट केला जातो. अशा स्वरूपाचे डीपफेक कसे शोधले जाऊ शकतात हे सविस्तर जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
डोळ्यांच्या अनैसर्गिक हालचाली
डीपफेक व्हिडिओत अनेकदा डोळ्यांच्या अनैसर्गिक हालचाली किंवा टक लावून पाहण्याचे नमुने असतात. अस्सल व्हिडिओंमध्ये, डोळ्यांच्या हालचाली सामान्यत: सरळ तसेच व्यक्तीच्या बोलण्याशी आणि कृतींशी समन्वयित असतात. हे वेगळेपण जाणून बनावट व्हिडीओ किंवा प्रतिमा ओळखता येवू शकतात.
रंग आणि प्रकाशाचे गणित जुळत नाही
डीपफेक निर्मात्यांना अचूक रंग छटा आणि प्रकाशाची (मूळ प्रतिमा किंवा व्हिडिओ प्रमाणे) प्रतिकृती करण्यात अडचण येऊ शकते. व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि सभोवतालच्या प्रकाशात आढळणाऱ्या कोणत्याही विसंगतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, ज्यातून फेक व्हिडीओ, प्रतिमा यांची उकल होण्यास मदत होवू शकते.
विचित्र शारीरिक आकार किंवा हालचाल
डीपफेकमुळे कधीकधी शरीराचे अनैसर्गिक आकार किंवा हालचाली होऊ शकतात. उदाहरणार्थ, शरीराच्या हालचाली दरम्यान अंग खूप लांब किंवा लहान दिसू शकते किंवा शरीर असामान्य किंवा विकृत रीतीने हलू शकते. या विसंगतीकडे लक्ष दिल्यास काही गोष्टी समजण्यास मदत होवू शकते.
अधिक वाचा: ‘सेक्सटॉर्शन’ म्हणजे नेमके काय? यापासून स्वत:ला कसे वाचवाल?
चेहऱ्यावरील वैशिष्ट्यांची अनैसर्गिक स्थिती
डीपफेक सॉफ्टवेअर हे नेहमीच चेहऱ्याची अचूक मांडणी करू शकत नाही, अधूनमधून चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांमध्ये विकृती किंवा चुकीचे संरेखन काटेकोरपणे पाहिल्यास सहज लक्षात येऊ शकते.
शरीराची विचित्र ठेवण
डीपफेकमध्ये नैसर्गिक मुद्रा, भावना यांचा अभाव असतो. शरीराची ठेवणही अनैसर्गिक असते. कारण चेहरा वेगळा व शरीर वेगळ्याच व्यक्तीचे जोडलेले असते. शिवाय अनेकदा त्यात शारीरिकदृष्ट्या अशक्य वाटणाऱ्या हालचालीही दिसतात.
वरील निरीक्षणांव्यतिरिक्त, तुम्ही व्हिडिओचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता, स्त्रोत आणि मूळ व्हिडिओ तपासण्यासाठी रिव्हर्स इमेज सर्च करू शकता. हे करण्यासाठी, https://images.google.com/ वर जा आणि ‘प्रतिमेनुसार शोधा’ (‘Search by image’) असे सांगणाऱ्या कॅमेरा आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट अपलोड करू शकता आणि त्याच्याशी संबंधित व्हिज्युअल इतर व्हिडिओंमधून घेतले असल्यास तसे Google तुम्हाला दाखवेल. आणि अशा प्रकारे तुम्ही डीपफेकची ओळख पटवू शकता!