१ जुलै १९३३ रोजी जन्मलेले, कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार (CQMH) अब्दुल हमीद यांना असल उत्तरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याच्या पॅटन रणगाड्यांशी सामना करताना वीरमरण आले. १९६५ चे भारत-पाक युद्ध हे प्रामुख्याने रणगाड्यांचे युद्ध मानले जाते. त्यात रणगाड्यांचा सर्वाधिक वापर करण्यात आला. अब्दुल हमीद यांना त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यासाठी परमवीर चक्र हा भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान मरणोत्तर प्रदान करण्यात आला. सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हमीद यांच्या मूळ गावाला धामुपूरला भेट दिली. यावेळी मोहन भागवत यांनी ‘मेरे पापा परमवीर’ आणि ‘भारत का मुस्लिम’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन केले. त्याच निमित्ताने अब्दुल हमीद यांच्या कार्यकर्तृत्त्वाचा घेतलेला हा आढावा.
असल उत्तरची लढाई काय होती?
असल उत्तर हे पंजाबमध्ये असून भारत-पाकिस्तान सीमेच्या जवळ आहे. तर खेम करण शहरापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर आहे. १९६५ साली सप्टेंबर महिन्यात भारत- पाकिस्तान युद्ध सुरु झाले. युद्ध सुरू झाल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या पहिल्या आर्मर्ड डिव्हिजनने सीमा ओलांडून खेम करणच्या अनेक भागांवर कब्जा करून आक्रमण सुरू केले. बियास नदीवरील पुलापर्यंत पोहोचण्याचे आणि अमृतसरसह पंजाबचा मोठा भाग उर्वरित भारतापासून तोडण्याचे त्यांचे ध्येय होते. हा हल्ला भारताच्या चौथ्या माऊंटन डिव्हिजनला स्तिमित करणारा होता. परंतु, लष्कराच्या पश्चिमी विभागाचे कमांडर, लेफ्टनंट जनरल हरबक्ष सिंग यांनी चौथ्या माऊंटन डिव्हिजनच्या मुख्यालयाला भेट दिल्यानंतर परिस्थिती लवकरच आटोक्यात आली. त्यांनी असल उत्तर रोडला कडक सुरक्षा देण्याचा सल्ला दिला. तसेच या भागात दुसऱ्या आर्मर्ड ब्रिगेडला आणण्यात आले, जेणे करून पाकिस्तानकडून झालेल्या कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देता येईल.
पॅटन रणगाडे पाकिस्तानने गमावले
८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर दरम्यान ही लढाई झाली. भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. या युद्धात पाकिस्तानी लष्कराने ९७ पॅटन रणगाडे गमावले. शिवाय, पाकिस्तानच्या एका संपूर्ण आर्मर्ड रेजिमेंटने त्याच्या कमांडिंग अधिकाऱ्यासह भारतीय सैन्याला आत्मसमर्पण केले. परंतु युद्धविराम जाहीर होईपर्यंत खेम करण हे शहर पाकिस्तानच्याच ताब्यात राहिले. पाकिस्तानमधील भारताच्या ताब्यात असलेल्या भागाच्या बदल्यात ते भारताला परत करण्यात आले होते.
हमीद यांचे योगदान
या युद्धादरम्यान हमीद हे भारतीय सैन्याच्या चौथ्या ग्रेनेडियर्स बटालियनच्या सेवेत होते. त्यांना अमृतसर- खेम करण रस्त्यावर असलेल्या चिमा गावाच्या बाहेर नियुक्त करण्यात आले होते. ते रिकोइलेस गनच्या तुकडीचे नेतृत्व करत होते. असल उत्तरच्या परिसरात असलेल्या शत्रूंचे रणगाडे त्यांचे लक्ष्य होते. १० सप्टेंबर रोजी हमीद यांना चार पाकिस्तानी पॅटन रणगाडे दिसले आणि त्यांनी पॉइंट-ब्लँक रेंजमधून रणगाड्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यातील तीन रणगाडे नष्ट केले तर एक निकामी केला. या सगळ्या प्रक्रियेत हमीद यांना शत्रूची गोळी लागली आणि त्यांना वीरमरण आले. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या मृत्यूची जागा आता युद्ध स्मारकाचा भाग आहे. या युद्धात ताब्यात घेतलेला पाकिस्तानी पॅटन रणगाडा या स्मारकाच्या प्रवेशद्वारापाशी रखवालदारी करत आहे. लढाईत लढलेल्या आणि शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली म्हणून या टँकचा तोफेचा भाग जमिनीच्या दिशेने झुकता ठेवण्यात आला आहे.