भारतीय उद्योग क्षेत्राचा खरा चेहरा असलेले रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. टाटा या ब्रिटिशकालीन भारतीय उद्योगसमूहाने स्वातंत्र्योत्तर काळात स्थैर्याला प्राधान्य दिले होते. पण रतन टाटांनी १९९१मध्ये समूहाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही वर्षांतच युरोपातील एकापेक्षा एक बड्या कंपन्या खरीदण्यास सुरुवात केली. त्यांच्या या भरारीमुळे ‘टाटा’ हा केवळ एक प्रतिष्ठित भारतीय ब्रँड न राहता, तो खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय म्हणजे ‘ग्लोबल ब्रँड’ बनला.

जगात भरारी

टेटले ही ब्रिटिश चहानिर्मिती कंपनी, कोरस ही अँग्लो-डच पोलादनिर्मिती कंपनी, जग्वार लँड रोव्हर ही ब्रिटिश आलिशान मोटारनिर्मिती कंपनी अशी टाटांनी अधिग्रहित केलेली काही बड्या कंपन्यांची नावे. २००४मध्ये एका मुलाखतीमध्ये रतन टाटा म्हणाले होते, की येत्या १०० वर्षांमध्ये आमच्या पाऊलखुणा जगभर दिसून येतील, याविषयी मी आशावादी आहे. भारताप्रमाणेच जगातही आम्ही आत्मविश्वासाने वावरताना दिसू. जगात भरारी घेण्याचे टाटांचे धोरण अत्यंत धाडसी होते. अनेकांनी त्यावेळी टाटांच्या या धाडसाविषयी संदेह व्यक्त केला होता. बहुतेकांची भावना ही ‘भारतीय कंपन्यांची जागतिक भरारीसाठी सिद्धता नाही’ अशीच होती. त्या वेळेपर्यंत भारतीय कंपन्या आणि कुशल कामगार जागतिक सॉफ्टवेअर उद्योगामध्ये झळकू लागल्या होत्या. त्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी टाटांनी भलती उद्दिष्टे ठेवू नयेत, असा एक मतप्रवाह होता. पण रतन टाटांनी अर्थातच या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. तीन बड्या ग्लोबल कंपन्यांपैकी कोरस स्टील कंपनीचे अधिग्रहण पूर्णतया यशस्वी ठरले असे म्हणता येत नाही. कारण अजूनही ही कंपनी नफ्यात नसून, ब्रिटनमध्ये कामगारांच्या संपासारखे मुद्दे वारंवार उपस्थित होतात. पण टाटा मोटर्स कंपनीच्या उत्पन्नापैकी ८० टक्के उत्पन्न जग्वार लँड रोव्हरकडून (जेएलआर) येते ही बाब रतन टाटांच्या द्रष्टेपणाची साक्ष पटवते.

Success Story of Dr. Arokiaswamy Velumani founder of Thyrocare Technologies who built 3000 crore company
परिस्थिती नव्हती पण जिद्द होती, शून्यातून कसं निर्माण केलं कोटींचं साम्राज्य? जाणून घ्या वेलुमणी यांचा प्रेरणादायी प्रवास
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
women employees ratio in indian companies reached 36 6 percent in current year
विश्लेषण : भारतीय महिलांचा टक्का वाढतोय ?
Benefits of PPF Investment in 2024
‘पीपीएफ’ गुंतवणूकदारांना मिळणार ७.१ टक्क्यांचा लाभ; पोस्टाच्या योजनांवरील व्याजदर सलग तिसऱ्या तिमाहीत जैसे थे!
Ikra predicts that banks will raise funds through bonds as growth in bank deposits slows
बँकांची रोख्यांवर मदार, ठेवीतील वाढ मंदावल्याने पाऊल; १.३ लाख कोटींच्या निधी उभारणीचा इक्राचा अंदाज
9 out of 10 people make losses in F&Os according to a report by capital markets regulator SEBI
‘एफ अँड ओ’मध्ये १० पैकी ९ जण तोट्यात; भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड
“मीसुद्धा २० तास काम करायचो”, ईवाय कंपनीतील तरुणीच्या मृत्यूनंतर इतर कंपन्यांमधील माजी कर्मचाऱ्यांनी सांगितला अनुभव!
supreme court telecom companies marathi news
दूरसंचार कंपन्यांना थकीत देणींबाबत दिलासा नाहीच!

हे ही वाचा… Ratan Tata Death Live Updates: “त्यांनी जगाला दाखवून दिलं की खरी प्रगती…”, सचिन तेंडुलकरची रतन टाटांना आदरांजली!

टेटलेवर ताबा

टेटले या ब्रिटिश चहानिर्मिती कंपनीच्या अधिग्रहणाचे प्रयत्न टाटा समूहाने २०००मध्ये सुरू केले. चहाच्या उत्पादनात टाटा टी हा ब्रँड भारतात स्थिरावला होता. पण भारत जगातील बड्या चहा उत्पादक देशांमध्ये गणला जात असूनही टाटा टी किंवा इतर भारतीय ब्रँडचे जागतिक बाजारपेठेतील स्थान नगण्य होते. त्याऐवजी युनिलिव्हरसारख्या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा दबदबा भारतातही होता. अशा वेळी टेटले या कंपनीचा ताबा घेण्याची संधी चालून आली. टेटले ही त्यावेळी जगातील दुसऱ्या क्रमांकाची चहानिर्मिती कंपनी होती. रतन टाटांनी जवळपास २७ कोटी ब्रिटिश पौंड (आजच्या मूल्यांकनानुसार ६३०० कोटी रुपये) मोजून टेटले खरेदी केली.

जग्वार लँड रोव्हरची खरेदी

ब्रिटनमधील कंपन्यांचा ताबा मिळवण्याच्या बाबतीत रतन टाटा उत्सुक होते. या यादीत सर्वांत मोठे आणि प्रतिष्ठेचे अधिग्रहण ठरले, जग्वार लँड रोव्हर या आलिशान मोटार कंपनीचे. ही कंपनी त्यावेळी अमेरिकेतील फोर्ड समूहाच्या ताब्यात होती. टाटा मोटर्स कंपनी त्यावेळी प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेत भारतात स्थिरावू लागली होती. पण पहिल्या चारातही नव्हती. अशा परिस्थितीत दूरच्या बड्या मोटार कंपनीवर ताबा मिळवण्याचा खटाटोप कशासाठी, असे प्रश्न त्यावेळी उपस्थित केले गेले. पण टाटांनी कुणाचेच ऐकले नाही. काहींनी या निर्णयाचे वर्णन ‘रिव्हर्स कलोनायझेशन’ असे केले, कारण रतन टाटा ब्रिटिश कंपन्या खरेदी करत होते. खुद्द टाटांसाठी हा व्यवहार वेगळ्या अर्थाने प्रतिष्ठेचा होता. २००८मध्ये जग्वार लँड रोव्हरवर टाटांनी ताबा घेतला, त्याच्या नऊ वर्षे आधी टाटांनी त्यांची तोट्यात गेलेली प्रवासी वाहन कंपनी विकण्यासाठी त्यावेळी फोर्ड मोटार कंपनीकडे विचारणा केली होती. पण फोर्डच्या व्यवस्थापनाने त्या प्रस्तावाची खिल्ली उडवली होती. पुढे त्याच फोर्ड कंपनीला आपला एक प्रतिष्ठित ब्रँड टाटा कंपनीला विकावा लागला!

हे ही वाचा…. Ratan Tata’s Successors : कोण होणार रतन टाटांचा उत्तराधिकारी? टाटा समुहाची धुरा कोण सांभाळणार?

कोरस स्टील आणि इतर ब्रँड

कोरस स्टील ही बडी अँग्लो-डच पोलादनिर्मिती कंपनी खरीदण्यासाठी टाटांनी ताकद लावली. पण ती खरेदी आजतागायत फार यशस्वी ठरलेली नाही. २००७मध्ये टाटा स्टीलने कोरसवर ताबा मिळवला. त्यासाठी १२०० कोटी डॉलर मोजले. मात्र नंतरच्या काळात जागतिक मंदी, घटलेली मागणी, ब्रिटनमधील कामगारांचे प्रश्न, करोना, जागतिक पुरवठा साखळीवरील विपरीत परिणाम अशा अनेक कारणांमुळे कोरसला अपेक्षित यश मिळू शकले नाही. सिंगापूरमधील नॅटस्टील या पोलदनिर्मिती कंपनीची खरेदीही फार यशस्वी ठरली नाही. त्यापेक्षा दक्षिण कोरियातील डेवू व्यावसायिक वाहननिर्मिती कंपनीची खरेदी कितीतरी अधिक यशस्वी ठरली. टाटा केमिकल्सच्या माध्यमातून रतन टाटांनी ब्रुनर माँड ही ब्रिटिश रसायननिर्मिती कंपनी खरेदी केली. याशिवाय आणखीही काही आंतरराष्ट्रीय कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. पण टेटले आणि जेएलआर या सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, टाटा समूह आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या खरेदीसाठी, जागतिक विस्तारासाठी मागेपुढे पाहात नाही हा संदेश जागतिक उद्योग जगतात पोहोचला. याचे श्रेय निःसंशय रतन टाटा यांचेच.