– अन्वय सावंत
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या ‘आयपीएल’ सामन्यात राजस्थान रॉयल्सचा डाव अवघ्या ५९ धावांत आटोपला. ‘आयपीएल’च्या इतिहासातील ही तिसरी सर्वांत निचांकी धावसंख्या ठरली. या सामन्यानंतर राजस्थानच्या फलंदाजांच्या हाराकिरीची जितकी चर्चा रंगली, तितकीच चर्चा रविचंद्रन अश्विन ‘डायमंड डक’वर बाद होण्याची झाली. बंगळूरुचा यष्टीरक्षक अनुज रावतने अश्विनला धावचीत केले. अश्विन एकही चेंडू न खेळता खाते न उघडता माघारी परतला.
‘डायमंड डक’ म्हणजे नक्की काय?
कोणत्याही फलंदाजासाठी शून्यावर माघारी परतावे लागणे ही निराशाजनक बाब. विशेषत: ‘डायमंड डक’ ही फलंदाजासाठी बाद होण्याची सर्वांत वाईट पद्धत. फलंदाज खातेही न उघडता बाद झाला किंवा क्षेत्ररक्षकाला अडथळा आणल्यामुळे त्याला बाद ठरवण्यात आले आणि त्यापूर्वी त्याने एकही चेंडू खेळलेला नसेल, तर तो फलंदाज ‘डायमंड डक’वर बाद झाला असे म्हटले जाते. बंगळूरुविरुद्धच्या सामन्यात शिमरॉन हेटमायर आणि अश्विन या राजस्थानच्या फलंदाजांमधील ताळमेळ चुकला. हेटमायरने चेंडू मारल्यानंतर एक धाव काढली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अश्विन धावचीत झाला. त्यावेळी अश्विनने एकही चेंडू खेळला नव्हता. त्यामुळे त्याला आपले खाते उघडण्याचीही संधी मिळाली नाही.
फलंदाज खातेही न उघडता बाद होण्याचे प्रकार किती?
फलंदाज खातेही न उघडता बाद झाल्यास, क्रिकेटच्या भाषेत तो ‘डक’वर बाद झाला असे म्हटले जाते. फलंदाज शून्यावर बाद होण्याचे ‘डायमंड डक’ व्यतिरिक्त अन्य आठ प्रकार आहेत.
गोल्डन डक :
फलंदाज पहिल्या चेंडूवर खातेही न उघडता बाद झाल्यास तो ‘गोल्डन डक’वर बाद झाला असे म्हटले जाते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘गोल्डन डक’चा नकोसा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे.
सिल्व्हर डक :
फलंदाज डावातील दुसऱ्या चेंडूवर खाते न उघडता बाद होण्यास ‘सिल्व्हर डक’ असे संबोधले जाते.
ब्रॉन्झ डक :
फलंदाज केवळ तीन चेंडू खेळून खाते न उघडता बाद होतो, त्यास ब्रॉन्झ डक असे म्हटले जाते.
रॉयल डक :
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमधील ‘ॲशेस’ कसोटी मालिकेदरम्यान सलामीवीर डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यास तो ‘रॉयल डक’वर बाद झाला असे म्हटले जाते.
लाफिंग डक :
फलंदाज जेव्हा खातेही न उघडता बाद होतो आणि तो बाद झाल्यानंतर त्याच्या संघाचा डाव संपुष्टात येतो, त्यास ‘लाफिंग डक’ असे संबोधले जाते.
ए पेअर :
फलंदाज एकाच सामन्याच्या दोनही डावांमध्ये शून्यावर बाद होणे याला क्रिकेटच्या भाषेत ‘ए पेअर’ म्हटले जाते.
किंग पेअर :
एखादा फलंदाज एकाच सामन्याच्या दोनही डावांमध्ये पहिल्याच चेंडूवर खातेही न उघडता बाद झाल्यास त्याला ‘किंग पेअर’ असे म्हटले जाते. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये २२ फलंदाज ‘किंग पेअर’वर बाद झाले आहेत.
हेही वाचा : विश्लेषण : यशस्वीला भारतीय संघात स्थान मिळेल का?
बॅटिंग हॅटट्रिक :
एखादा फलंदाज सलग तीन कसोटी डावांमध्ये पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यास त्याला ‘बॅटिंग हॅटट्रिक’ असे म्हटले जाते.