९ जून रोजी जम्मू काश्मीरमध्ये रियासी जिल्ह्यात शिव खोडी या तीर्थस्थळाकडे जाणारी बस दरीत कोसळली. बसवर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि ती बस दरीत कोसळली. दरम्यान, रियासी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विशेष महाजन या दुर्घटनेसंदर्भात म्हणाले, काही दहशतवाद्यांनी या बसवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यात्रेकरुंची ही बस पोनी येथील तेरियात गावातून निघाली होती आणि शिव खोडी मंदिरात दर्शनासाठी जात होती. या हल्लात १० भाविकांनी आपला जीव गमावला आहे. तर ३३ जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी रेझिस्टन्स फ्रंट (The Resistance Front (TRF)) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. त्यांनी दिलेल्या संदेशात पर्यटक आणि गैरस्थानिकांना अशा प्रकारच्या हल्ल्यांचा इशारा दिला आहे. TRF ला २०२३ साली भारत सरकारने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये या संघटनेचा सहभाग आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: पुलवामा: दहशतवादी हल्ल्याची पाच वर्षे- नक्की काय घडले होते?

या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बस चालक आणि कंडक्टरसह काही पीडितांची ओळख पटली आहे. त्यापैकी बहुतांश उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील होते. या हल्ल्यात जीव गमावलेला बस चालक आणि कंडक्टर हे रियासी येथील आहेत. जखमींपैकी बहुतांश उत्तर प्रदेशचे, ५ दिल्लीचे आणि २ राजस्थानचे आहेत, असे वृत्त पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. बचावलेल्यांनी सांगितले की, वाहन दरीत पडल्यानंतरही दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार सुरूच ठेवला होता. एकाने सांगितले की, दहशतवादी घाटात उतरले आणि त्यांनी काही काळ गोळीबार सुरूच ठेवला होता त्यामुळे अनेक प्रवाशांनी मृत असल्याचे भासवले आणि स्वतःचा जीव वाचवला.

दहशतवाद्यांना शोधण्याची मोहीम

दरम्यान, या भागात सुरक्षा बळकट करण्यात आली आहे आणि दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे, असे ‘इंडिया टुडे’ने गृह मंत्रालयातील सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रियासी बस हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी पाकिस्तानी होते आणि ते त्याच गटाचे होते जे पीर पंजाल प्रदेशाच्या दक्षिण भागात गेल्या दोन वर्षांपासून सक्रिय आहेत. यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याचे काम राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) देण्यात आले आहे. ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या दाट झाडीत शोध घेण्यासाठी ड्रोनचाही वापर केला जात आहे. फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) चे एक पथकही या ऑपरेशनमध्ये सामील झाले आहे. रियासी बस हल्ल्यात तीन ते चार दहशतवादी सहभागी होते, ते रियासीतून पळून गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर The Resistance Front (TRF) या संघटनेविषयी जाणून घेणे समायोचित ठरणारे आहे.

रेझिस्टन्स फ्रंट

द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ही जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी संघटना आहे. २०२३ साली भारत सरकारने या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. या संघटनेची स्थापना भारतात झालेली असली तरी पाकिस्तानच्या लष्कर ए तैय्यबची शाखा असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात. अलीकडच्या हल्ल्याशिवाय ही संघटना अनेक काश्मिरी हिंदूंच्या, सरकारी अधिकाऱ्यांच्या, स्थानिक पोलिसांच्या आणि व्यावसायिकांच्या हत्येलाही कारणीभूत आहे. जिहादी गट लष्कर-ए-तैय्यब आणि हिजबुल मुजाहिद्दीनमधील कॅडरचा वापर करून २०१९ मध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली होती. सुरुवातीच्या कालखंडात रेझिस्टन्स फ्रंटने धर्मनिरपेक्ष, पुरोगामी प्रतिमा स्वीकारून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. संघटना समाजमाध्यमांवर अतिशय सक्रिय आहे. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर २०१९ च्या ऑगस्ट महिन्यात भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये रेझिस्टन्स फ्रंटची स्थापना करण्यात आली. आपली संघटना ही जम्मू आणि काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी आहे, असे टीआरएफने म्हटले आहे. तर टीआरएफ ही लष्कर-ए-तैय्यबची आघाडीची संघटना असल्याचा भारत सरकारचा आरोप आहे.

अधिक वाचा: पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा आमचा भाग नाही; पाकिस्तानची कबुली; काय आहे नेमके प्रकरण?

हिजबुल मुजाहिदीन यांच्यापासून आपण वेगळे आहोत हे दर्शवण्यासाठी TRF ने धर्मनिरपेक्षतेचा बुरखा ओढला होता. १ एप्रिल २०२० रोजी, कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) चार दिवस चाललेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर टीआरएफला महत्त्व प्राप्त झाले, त्या हल्ल्यात पाच भारतीय पॅराकमांडो शहीद तर पाच टीआरएफ दहशतवादी मारले गेले होते. TRF ने जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय सैन्याविरूद्ध झालेल्या अनेक हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्याचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडिया व्हिडिओ आणि पोस्टर्सचा वापर केला आहे. सातत्याने प्रशिक्षणासाठी दहशतवाद्यांची भरती करणारी TRF खोऱ्यातील महत्त्वाच्या दहशतवादी संघटनांपैकी एक ठरली आहे.

भारत सरकारने बंदी का घातली?

जानेवारी २०२३ मध्ये भारत सरकारने Unlawful Activities (Prevention) Act (UAPA) च्या अंतर्गत TRF वर बंदी घातली होती. यानंतर त्यांचा नेता शेख सज्जाद गुल याला दहशतवादी म्हणून घोषित केले. २०१८ साली जून महिन्यात काश्मिरी पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येच्या कटात TRF चा सहभाग असल्याच्या खात्रीशीर माहितीनंतर भारत सरकारने या दहशतवादी संघटनेवर बंदी घातली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reasi attack what exactly is the resistance front a terrorist organization that attacks hindu devotees in jammu and kashmir svs
Show comments