जंगलात पेटणारा वणवा ही बाब खरंतर आपल्यासाठी नवीन नाही. अनेकदा आपण यासंदर्भात ऐकलं आहे. काही महिन्यांपूर्वीच अॅमेझॉनच्या जंगलात कित्येक दिवस धुमसणाऱ्या वणव्याने अवघ्या जगाची चिंता वाढवली होती. संपूर्ण जगाच्या अस्तित्वासाठीच आवश्यक असणाऱ्या वनसंपत्तीचा ऱ्हास हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. अशाच प्रकारचे वणवे दरवर्षी भारतात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या मोठ्या प्रमाणावर जंगल परिसर असलेल्या राज्यांमध्ये लागल्याच्या घटना घडतात. या वणव्यांची संख्या शेकडोंनी, कधी हजारोंमध्ये देखील आढळल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात या वणव्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. नेमकं असं का घडलं? वणव्यांचं कारण, प्रक्रिया आणि आकडेवारी नेमकं काय सांगते?
एकट्या एप्रिल महिन्याचा विचार करता हिमाचल प्रदेशमध्ये ७५० वणव्याच्या घटना घडल्या आहेत. दुसरीकडे उत्तराखंडमध्ये हाच आकडा १५०० च्या घरात आहे. ३० एप्रिल या एकाच दिवशी उत्तराखंडमध्ये वणवा लागण्याच्या ५१ घटनांची नोंद करण्यात आली आहे. भारतातील कोणत्याही राज्यात एकाच दिवशी वणव्याच्या या सर्वाधिक घटना मानल्या जातात.
जंगलात वणवा का पेटतो?
सामान्यपणे नोव्हेंबर ते जून या कालावधीमध्ये बहुतांश वणव्याच्या घटना घडतात. वणवा लागण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. यामध्ये उष्णता, जंगलातील वनस्पती आणि आर्द्रता या कारणांचा त्यात समावेश होऊ शकतो. वणव्यांची तीव्रता आणि त्यांची वारंवारिता ही याच गोष्टींवर अवलंबून असते. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया अर्था एफएसआयच्या आकडेवारीनुसार भारतातील ३६ टक्के जंगलांमध्ये वारंवार वणवा लागण्याची शक्यता अधिक आहे. मोठ्या प्रमाणावर कोरडे तण असल्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांमध्ये जंगलात आग लागण्याच्या घटना वाढतात. यातील बहुतांश आगीच्या घटना या शेती किंवा अनियोजित पद्धतीने जमिनींचा वापर केल्यामुळे घडतात.
कसं करतात वणव्यांचं वर्गीकरण?
वणव्यांचं प्रामुख्याने तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं जातं. जमिनीच्या आतील (Ground Fire), जमिनीच्या पृष्ठभागावरील (Surface Fire) आणि क्राऊन फायर अर्थात झाडांच्या सर्वात वरच्या भागात लागणारी आग. जमिनीच्या आतल्या भगातील सेंद्रीय गोष्टी जाळून खाक करणाऱ्या आगीला ग्राऊंड फायर म्हटलं जातं. जमिनीवरील सुकलेली पानं, फांद्या आणि इतर गोष्टींमुळे लागणाऱ्या आगीला सरफेस फायर म्हणतात. असा आगी फार वेगाने पसरतात. हिमाचल प्रदेशमधील आग याच श्रेणीमध्ये मोडते. याशिवाय तिसरा प्रकार अर्थात क्राऊन फायर ही एका झाडाच्या शेंड्यापासून दुसऱ्या झाडाच्या शेंड्यापर्यंत अशा पद्धतीने पसरते. भारतात अशा प्रकारच्या घटना फार कमी आढळतात.
हिमाचल प्रदेशात आगीच्या घटना का घडल्या?
एप्रिल महिन्यात हिमाचल प्रदेशमध्ये ७५० आगीच्या घटना घडल्या असून त्यात शिमला, चंबा, बिलासपूर, धरमशाला, हमिरपुर, कुल्लू मंडी, रामपूर, नहान आणि ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क या भागातील सुमारे ५ हजार ६६२ हेक्टर जमीन आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. याउलट गेल्या वर्षी पूर्ण उन्हाळ्यामध्ये एकूण १ हजार ०४५ आगीच्या घटना घडल्या होत्या. २०१८-१९मध्ये हा आकडा २५४४ च्या घरात होता.
इथले मुख्य वनाधिकारी अजय श्रीवास्तव यांच्यामते यंदाच्या उष्ण आणि कोरड्या वातावरणामुळे हिमाचल प्रदेशमध्ये आगीच्या घटनांची संख्या वाढली आहे. एप्रिल महिन्यात सामान्यपणे इथल्या जंगलात दमट वातावरम तयार होतं. पण यंदा फेब्रुवारी महिन्यानंतर या भागात पाऊस झाला नाही. अल्प पाउस, कोरडं वातावरण, कोरडे झालेले पाईन वृक्ष आणि शून्य आर्द्रता यामुळे एखादी ठिणगी देखील इथे मोठी आग पेटवू शकते. लोकांचा निष्काळजीपणा देखील यासाठी कारणीभूत ठरतो. एक साधं सिगारेटचं थोटूक देखील भयानक आग पेटवू शकतं.
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशव्यतिरिक्त आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्रिपुरा, मिझोराम आणि ओडिशामध्ये जंगलात आगी लागण्याच्या घटना घडतात. मध्य प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, छत्तीसगड आणि महाराष्ट्र ही पाच राज्य सर्वाधिक आगी लागणाऱ्या राज्यांच्या यादीत सर्वात वर राहिली आहेत.
जंगलातील आगी कशा थांबवता येतील?
इतक्या मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या आगीच्या घटना थांबवण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. वॉच टॉवर्स उभे करणे, फायर वॉचर्स अर्थात आगीच्या घटनांचाशोध घेणाऱ्यांची नियुक्ती करणे, फायर लाईन्सची उभारणी आणि देखरेख अशा काही उपायांचा त्यात समावेश आहे.