Reason For Obesity After Marriage : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण… लग्नानंतर आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. नवनवीन नातेसंबंध तयार झाल्याने आयुष्यातील गोडवा वाढतो. तसंच पालकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. लग्नानंतर खांद्यावरील जबाबदाऱ्यांचं ओझं वाढतं आणि प्रत्येक व्यक्ती संसारात रमतो. परंतु, या सर्वांमध्ये एक प्रश्न पुरुष आणि महिलांना पडतो अन् तो म्हणजे लग्नानंतर पोट का सुटतं? नुकतंच या विषयावर पोलंडमधील वॉर्सा येथे एक संशोधन करण्यात आलं. त्यामध्ये काही महत्त्वाची कारणं समोर आली आहेत. अभ्यासात नेमकं काय म्हटलंय, ते जाणून घेऊ…

लग्नानंतर पुरुषांचं पोट का सुटतं?

लग्नानंतर बहुतांश पुरुषांचं पोट सुटतं आणि लठ्ठपणा वाढतो, त्यामुळे काही जण विनोदाने म्हणतात की, लग्नाअगोदर पुरुषाच्या मनात एक काळजी असते, ती म्हणजे आपले लग्न होईल की नाही? बायको चांगली मिळेल की नाही? तेच लग्न झाल्यानंतर त्याची चिंता दूर होते. शिवाय लग्नानंतर तो पत्नीच्या हातचं जेवण पोटभरून करतो. परिणामी, हळूहळू त्याचं पोट सुटायला लागतं. पण, हा विनोदाचा विषय अजिबात नसून ती एक गंभीर समस्या आहे. पोलंडमधील संशोधनात असं आढळून आलंय की, विवाहित पुरुषांना अविवाहित पुरुषांच्या तुलनेत लठ्ठपणाचा धोका ६२ टक्के जास्त असतो. त्याच वेळी महिलांमध्ये लग्नानंतर लठ्ठपणाचे परिणाम ३९ टक्के दिसून आले आहेत.

संशोधन नेमकं कसं करण्यात आलं?

पोलंडच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजीच्या संशोधकांनी नुकतचं लठ्ठपणाच्या समस्येवर संशोधन केलं. यासाठी त्यांनी दोन हजार ४०५ लोकांवर अभ्यास केला. त्यापैकी बहुतेकांनी वयाची पन्नाशी गाठली होती. या व्यक्तींपैकी ३५.३ टक्के लोकांचं वजन सामान्य होतं, तर ३८.३ टक्के व्यक्तींचं वजन प्रमाणापेक्षा जास्त होतं. विशेष म्हणजे यातील २६.४ टक्के व्यक्ती लठ्ठपणाने ग्रासलेले होते. संशोधनात असं आढळून आलं की, लग्नानंतर पुरुषांमध्ये लठ्ठपणाचा धोका तीन पटीनं वाढतो, तर महिलांमध्ये हा परिणाम कमी दिसून आला.

आणखी वाचा : America vs India : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावरील संताप नेमका कशासाठी?

संशोधनातून काय समोर आलं?

संशोधकांनी केलेला अभ्यास, वाढलेले वजन, वय, वैवाहिक स्थिती मानसिक आरोग्य आणि इतर घटकांवरील सांख्यिकी विश्लेषणावर आधारित होता. पोलंडमधील वॉर्सा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजीच्या डॉ. अलिजा सिचा-मिकोलाज्झिक यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी केलेला हा अभ्यास मे २०२५ मध्ये स्पेनमधील मालागा येथे होणाऱ्या युरोपियन कॉंग्रेस ऑन ओबेसिटीमध्ये सादर केला जाणार आहे.

लग्नानंतर वजन वाढण्याची कारणं कोणती?

लग्नानंतर पुरुषांमध्ये वजन वाढण्याची मुख्य कारणं – जास्त आहार, बाहेरील पदार्थ खाण्याच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यांसारख्या गोष्टी मानल्या जातात. द गार्डियनच्या मते, ओबेसिटी हेल्थ अलायन्सच्या संचालिका कॅथरीन जेनर म्हणाल्या, “हा अभ्यास आणखी एका गोष्टीची आठवण करून देतो. ती म्हणजे, केवळ आहारामुळेच नाही तर सामाजिक, मानसिक आणि व्यापक पर्यावरणीय घटकांमुळेही लठ्ठपणाचा धोका वाढतो.” संशोधकांच्या मते, महिलांमध्ये लठ्ठपणा येण्याच्या शक्यतेवर अनेक गुणांचा प्रभाव असल्याचं दिसून आलं.

लग्नानंतर महिलांमधील लठ्ठपणा का वाढतो?

आरोग्य साक्षरतेची कमतरता असल्यानं उचभ्रू समुदायातील महिलांमधील लठ्ठपणाचा धोका ४३ टक्क्यांनी वाढला आणि नैराश्याचा धोका दुप्पट झाला, तर लहान समुदायांमधील महिलांमध्ये लठ्ठपणा जास्त प्रमाणात दिसून आला. विशेष म्हणजे, यापैकी कोणत्याही घटकांमुळे पुरुषांमध्ये लठ्ठपणाचा धोका वाढला नाही. जेनर म्हणाल्या, “विशेषतः महिलांमध्ये प्रत्येक वर्षानंतर, जास्त वजन किंवा लठ्ठपणासह मृत्यूचा धोका वाढत जातो. पुरुषांमध्ये लग्न आणि लठ्ठपणा यांच्यातील संबंध जीवनशैलीतील बदल, सवयी आणि सामाजिक अपेक्षांबरोबर जोडला गेला आहे. व्यक्तींना दोष देण्याऐवजी, आपल्याला अशा धोरणांची आवश्यकता आहे, ज्या चांगले अन्न, वातावरण आणि शिक्षणाशी निगडीत असतील.”

लठ्ठपणा वाढण्यावर यापूर्वीही अनेक अभ्यास

२०२४ मध्ये केलेल्या एका चिनी अभ्यासानुसार, लग्नानंतर पहिल्या पाच वर्षांत पुरुषांचा बीएमआय वाढतो. त्यामागचं कारण म्हणजे, जास्त कॅलरीयुक्त पदार्थ्यांचं सेवन आणि तुलनेनं कमी व्यायाम करणं हे आहे. याव्यतिरिक्त अभ्यासात असंही आढळून आलं की, लग्नानंतर पुरुषांच्या वजनामध्ये ५.२ टक्के वाढ झाल्याचं दिसून येतं. याशिवाय लठ्ठ पुरुषांचं प्रमाणही २.५ टक्क्यांनी वाढलं होतं. बाथ विद्यापीठानं केलेल्या पूर्वीच्या अभ्यासानुसार, विवाहित पुरुषांचं वजन अविवाहित पुरुषांपेक्षा साधारणपणे १.४ किलो जास्त असतं.

लग्नानंतर पुरुष लठ्ठ का होतात?

द गार्डियनच्या वृत्तानुसार, लग्नानंतर पुरुषांचा बीएमआय वाढतो आणि घटस्फोटानंतर तो कमी होतो. या वृ्त्तात बाथ विद्यापीठातील व्यवसाय अर्थशास्त्राच्या व्याख्याता जोआना सिएर्डा यांनी २०१७ मध्ये केलेल्या अभ्यासाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या अभ्यासात लठ्ठपणाची वेगवेगळी कारणंही मांडण्यात आली आहे. पहिलं म्हणजे, लग्नासाठी जोडीदार शोधणारे पुरुष विवाहित पुरुषांपेक्षा जास्त तंदुरुस्त आणि फिट राहण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे ते शरीराची काळजी घेतात आणि वजनावर नियंत्रण ठेवतात. दुसरं म्हणजे, विवाहित तरुण हे लग्नानंतर त्यांच्या आतेष्टांबरोबर नियमित आणि जास्त जेवण करतात, ज्यामुळे त्यांचं पोट सुटतं आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो.

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, कागदाऐवजी प्लास्टिकच्या स्ट्रॉ वापरा; काय आहे यामागचं कारण?

लठ्ठपणा वाढण्यावर तज्ज्ञांचं मत काय?

पुरुषांचे आरोग्य मंचाचे सल्लागार जिम पोलार्ड यांनी या निष्कर्षांबद्दल जास्त काळजी न करण्याचा सल्ला दिला आहे. अहवालानुसार त्यांनी म्हटलंय की, खाण्याच्या वाईट सवयी आणि कामाचा ताण विवाहित पुरुषांचा बीएमआय वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो. ते म्हणाले, “पुरुषांमध्ये हृदयरोग आणि कर्करोगाने अकाली मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. या परिस्थितीत वजन हा एक महत्त्वाचा घटक असतो. पुरुष आणि महिलांच्या लठ्ठपणावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. सरकारने पुरुषांच्या आरोग्य धोरणाचे आणि महिलांच्या आरोग्य धोरणाचे आश्वासन दिले आहे. हे संशोधन दर्शवते की धोरणं योग्य प्रकारे राबवणं किती महत्त्वाचे आहे.”

भारतात लठ्ठपणाचे वाढते प्रमाण

लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या असून, ज्याचा सामना जगातील जवळजवळ सर्व देशांना करावा लागत आहे. जगभरातील २.५ अब्जाहून अधिक प्रौढ आणि मुलं जास्त वजनाचे किंवा लठ्ठ आहेत. १९९० पासून लठ्ठपणाचं प्रमाण दुप्पट झालं आहे. लॅन्सेटच्या एका अभ्यासानुसार, २०५० पर्यंत जगभरात एक तृतीयांश मुलं आणि अर्ध्याहून अधिक प्रौढ लठ्ठ असतील. भारतातही लठ्ठपणाची समस्या गंभीर होत चालली आहे. २०१६ च्या एका अभ्यासानुसार, भारतात ५५% पेक्षा जास्त व्यक्ती लठ्ठपणाने त्रस्त आहेत. शहरी भागातील लोक ग्रामीण भागातील लोकांच्या तुलनेत अधिक लठ्ठ आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, लठ्ठपणाचे प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आहे. चुकीच्या आहाराची सवय, व्यायामाचा अभाव, अनियमित जीवनशैली, मानसिक तणाव आणि आर्थिक व सामाजिक स्थिती यांसारख्या कारणांमुळे भारतीयांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे.