देशात दोन हजारांच्या चलनी नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये दोन हजाराची एकही नोट छापली गेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चलनी नोटेचे सारख्या प्रमाणात वितरण होत नसल्याचेही ‘आरटीआय’मधून उघड झाले आहे. दोन हजारांच्या नोटांच्या माहितीसाठी ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेने ‘आरटीआय’ दाखल केली होती.
नोटाबंदीनंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून प्रयत्न केले जात आहेत. देशातील एकूण चलनापैकी ५०० आणि १००० रुपयांच्या ८० टक्के नोटा नोटाबंदीच्या घोषणेनंतर चलनातून बाद झाल्या होत्या. नोटा छापण्याची प्रक्रिया अहोरात्र सुरू असतानादेखील एवढी मोठी रक्कम परत चलनात आणणे आरबीआयला अवघड गेले होते. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये ५०० आणि १००० च्या जुन्या नोटांवर बंदी घातली होती. त्यानंतर २००० ची नवी कोरी नोट चलनात आणण्यात आली.
ठाण्यात आठ कोटींच्या बनावट नोटा जप्त
तीन वर्षातील नोटांच्या छपाईची स्थिती काय?
२०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या तीन वर्षांमध्ये २००० हजाराची एकही नोट छापण्यात आली नाही, अशी माहिती ‘आरटीआय’मधून समोर आली आहे. ‘आरबीआय नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड’नं २०१६-१७ या आर्थिक वर्षात ३५,४२९ कोटी मुल्याच्या २००० च्या नोटा छापल्या आहेत. त्यानंतर २०१८-१९ या वर्षात २००० हजारांच्या केवळ ४६६.९० कोटी मुल्याच्या नोटा छापण्यात आल्या आहेत.
विश्लेषण: डायबिटीज रुग्णांना डेंग्यूचा मोठा धोका; डास चावल्यास रक्तातील साखर वाढते का? जाणून घ्या
देशात बनावट नोटांमध्ये वाढ
‘आरबीआय’ने २०१५ मध्ये ‘महात्मा गांधी सिरीज-२००५’ च्या सर्व नोटा नव्या क्रमांकासह चलनात आणल्या आहेत. या नोटांमधील खास सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे बनावट आणि खऱ्या नोटांमध्ये फरक करता येणे शक्य आहे. अर्थव्यवस्थेत सापडलेल्या बहुतांश बनावट नोटा कमी प्रतिच्या आणि सुरक्षा खबरदारीशिवाय बनवण्यात आल्याचे पुढे आले आहे.
‘एनसीआरबी’च्या आकडेवारीचा अहवाल सरकारने संसदेत नुकताच सादर केला आहे. यामध्ये २०१६ ते २०२० या कालावधीत बनावट चलनी नोटांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पुढे आले आहे. २०१६ मध्ये २००० हजारांच्या २,२७२ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर २०१७ मध्ये ७४,८९८, २०१९ मध्ये ९०,५६६ आणि २०२० मध्ये सर्वाधिक दोन लाख ४४ हजार ८३४ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
बनावट नोटांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँकांना वेळोवेळी खबरदारीच्या सुचना दिल्या जातात. बँकेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना बनावट नोटा ओळखण्याचे प्रशिक्षणही आरबीआयकडून दिले जाते, अशी माहिती ‘आरटीआय’मध्ये देण्यात आली आहे.