Graham Staines murder case: भारतीय संस्कृती तिच्या सहिष्णूतेसाठी प्रसिद्ध आहे. परंतु याच सहिष्णूतेला काळिमा फासणारी एक घटना १९९९ साली घडली. अलीकडे हत्या, बलात्कार या घटना भारतासाठी तशा नेहमीच्याच झालेल्या असल्या तरी या घटनेमुळे मात्र त्यावेळेस जगभर भारताला नाचक्कीला सामोरे जावे लागले होते. दोन लहान मुलांसह त्यांच्या वडिलांना जिवंत जाळण्यात आले होते. घटना जुनी असली तरी आता मात्र त्या घटनेतील एका आरोपीची चांगल्या वर्तनामुळे सुटका झाल्याने हा मुद्दा परत एकदा चर्चेत आला आहे. इतकंच नाही तर सध्या भारतीय राजकारणातील तापत असलेले गोहत्या, धर्मांतरणासारख्या मुद्द्यांचीही झालर या प्रकरणाला आहे.
गोहत्या आणि धर्मांतरण ही होती कारण..
ऑस्ट्रेलियन धर्मप्रचारक ग्रॅहॅम स्टेन्स आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांच्या हत्या प्रकरणातील दोषी महेंद्र हेंब्रम याची ओडिशाच्या केओनझार जिल्ह्यातील (Keonjhar district, Odisha) तुरुंगातून बुधवार, १६ एप्रिल रोजी सुटका करण्यात आली. १९९९ साली ऑस्ट्रेलियन धर्मप्रचारक ग्रॅहॅम स्टेन्स आणि त्यांच्या दोन लहान मुलांची हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणात महेंद्र हेंब्रम याला दोषी ठरवण्यात आलं होतं. त्याच्याबरोबर रबिंद्र पाल सिंग ऊर्फ दारा सिंग यालाही दोषी ठरवण्यात आलं होतं. सध्या दारा सिंग तुरुंगात आहे. सुटकेनंतर ५१ वर्षीय महेंद्र हेंब्रमने सांगितले की, त्याला चुकीच्या आरोपाखाली अडकवण्यात आले होते. तो फक्त गोहत्या आणि धर्मांतरणाच्या विरोधात होता. या घटनेनंतर भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी तीव्र शब्दात निषेध केला होता. ही घटना जगाच्या कृष्णकृत्यांच्या यादीतील भयावह घटना असल्याचे त्यांनी म्हटले होते.
स्टेन्स कुटुंब कोण होतं?
१९६० च्या दशकात ग्रॅहॅम स्टेन्स हे भारतात आले होते. ते मुख्यतः मयुरभंज येथील इव्हॅंजेलिकल मिशनरी सोसायटीशी संलग्न असलेले ख्रिश्चन धर्मप्रचारक होते. त्यांनी ओडिशामध्ये ३४ वर्षांहूनही अधिक काळ कुष्ठरोग्यांसाठी कार्य केलं. त्या काळात समाजातील कुष्ठरोगाशी संबंधित समज-गैरसमज यांमुळे ग्रॅहॅम स्टेन्स यांचे कार्य महत्त्वाचे मानले जात होते. त्यांनी १९८३ साली ऑस्ट्रेलियन धर्मप्रचारिका ग्लॅडिस यांच्याशी विवाह केला. या दाम्पत्याला एकूण तीन मुलं होती. हे कुटुंब मयुरभंज जिल्ह्यातील बारिपदा येथे राहत होतं.
ग्रॅहॅम स्टेन्स हत्या प्रकरण काय होतं?
१९९९ साली जानेवारी महिन्यात १० वर्षांचा फिलिप आणि ६ वर्षांचा टिमोथी ही दोन्ही मुलं त्यांच्या वडिलांबरोबर केओनझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथील जंगलात होणाऱ्या एका ख्रिश्चन सभेत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी ग्लॅडिस आणि त्यांची मुलगी इस्थर ऊटीमध्ये होत्या. लाठ्या-काठ्यांनी सज्ज ५० लोकांच्या जमावाने २२ जानेवारीच्या रात्री स्थानिक बजरंग दल कार्यकर्ता दारा सिंग याच्या नेतृत्वाखाली त्या छावणीवर हल्ला केला. यावेळी ग्रॅहॅम स्टेन्स आणि त्यांची दोन अल्पवयीन मुलं स्टेशन वॅगनमध्ये झोपलेली होती. जमावाने या गाडीला आग लावून त्या तिघांना जिवंत जाळून ठार केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसर हा हल्ला कथित धर्मांतरणावरून निर्माण झालेल्या तणावाशी संबंधित होता.
भारतीय परंपरेला काळिमा
या अमानवी हत्याकांडानंतर संपूर्ण जगभरातून संताप आणि निषेध नोंदवण्यात आला. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारतातील धर्मप्रचारकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली. राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी या हत्येचा तीव्र निषेध करत म्हटलं की, “ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी दिलं, त्यांना समाजात आदर्श म्हणून गौरविण्याऐवजी अशा पद्धतीने ठार मारणं, ही भारताच्या सहिष्णुतेच्या आणि मानवतेच्या परंपरेपासून दूर नेणारी भयंकर बाब आहे.”
या घटनेनंतर २३ जानेवारी रोजी आनंदपूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १४७, १४८, ४३५, ४३६, ३०२ आणि १४९ तसेच शस्त्र कायद्यातील कलम २५ आणि २७ अंतर्गत एफ आय आर (FIR) दाखल करण्यात आला.
या हत्याकांडाशी संबंधित तब्बल ४९ जणांना अटक करण्यात आली होती. परंतु, दारा सिंग बराच काळ फरार होता. ही केस ओडिशा राज्याच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली आणि नंतर ती केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सुपूर्त करण्यात आली. CBI ने २९ मार्च १९९९ रोजी अधिकृतपणे गुन्हा नोंदवला. केंद्र सरकारने या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. पी. वाधवा यांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाने आपला अहवाल १९९९ साली जून महिन्यात सादर केला. ३१ जानेवारी २००० रोजी दारा सिंग याला केओनझारच्या जंगलात अटक करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दारा सिंगने आत्मसमर्पण केलं होतं. त्यानंतर १९९९ ते २००० या कालखंडात या प्रकरणाशी संबंधित एकूण ५० जणांना अटक करण्यात आली होती. या ५० जणांपैकी तब्बल ३७ लोकांना निर्दोष मुक्त करण्यात आले होते.
कोर्टाने काय निर्णय दिला?
२००३ साली सप्टेंबर महिन्यात भुवनेश्वरमधील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) विशेष न्यायालयाने दारा सिंगला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. तर, इतर १२ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. नंतर, ओडिशा उच्च न्यायालयाने महेंद्र हेंब्रम वगळता उर्वरित ११ जणांची निर्दोष मुक्तता केली. २००५ साली मे महिन्यात ओडिशा उच्च न्यायालयाने दारा सिंगला देण्यात आलेली मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेमध्ये रूपांतरित केली. हा निर्णय २०११ सालीही सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर बाल न्यायालयात खटला चालवण्यात आला होता. त्याची २००८ साली सुटका करण्यात आली होती. १९ मार्च २००५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओडिशा सरकारला आदेश दिला की, मागील २५ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या दारा सिंगच्या शिक्षा माफ करण्याच्या (remission) अर्जावर निर्णय घ्यावा. आपल्या अर्जात सिंगने नमूद केलं की, त्याने २४ वर्षं तुरुंगात घालवली आहेत. शिवाय तरुण वयात रागाच्या भरात केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप होत आहे.
ग्रॅहम स्टेन्स यांच्या पत्नीची प्रतिक्रिया
मिशनरी ग्रॅहम स्टेन्स यांच्या पत्नी ग्लॅडिस स्टेन्स यांनी त्यांचे पती आणि दोन मुलाची हत्या करणाऱ्यांना क्षमा केल्याचे जाहीर केले होते. त्यांची ही प्रतिक्रिया क्षमाशीलता आणि त्यांनी झेललेल्या भीषण दु:खाला दिलेलं शांत आणि संयमित उत्तर म्हणून ओळखली जाते. या प्रकरणात आरोपींना शिक्षा सुनावल्यानंतर ग्लॅडिस स्टेन्स यांनी एक निवेदन जारी करून सांगितले की, त्यांनी या गुन्हेगारांना क्षमा केली आहे आणि त्यांच्याविषयी मनात कोणताही तिरस्कार नाही. किंबहुना ऑस्ट्रेलियात परत जाण्याऐवजी स्टेन्स यांनी भारतातच थांबण्याचा निर्णय घेतला. बरोबर त्यांची मुलगी होती. “जे लोक आमच्यावर प्रेम करतात आणि आमच्यावर विश्वास ठेवतात, त्यांना मी सहजपणे सोडू शकत नाही. मला भारतातील लोकांबद्दल आणि त्यांच्या सहिष्णुतेबद्दल खूप आदर आहे.” असे त्यांनी म्हटले होते.