देशभरात पालेभाज्या, फळभाज्यांसह अन्नधान्यांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईच्या झळा बसत आहेत. खरीप हंगामात अन्नधान्यांच्या विक्रमी उत्पादनाचा अंदाज आहे. पण, यामुळे महागाई आटोक्यात येईल का, याविषयी…
अन्नधान्य, डाळी, तेलबिया उत्पादनाचा अंदाज
यंदाच्या खरीप हंगामात (२०२४ – २५) मध्ये देशात विक्रमी १६४७.०५ लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा पहिला अंदाज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जाहीर केला आहे. प्रामुख्याने तांदूळ, मका आणि भुईमुगाच्या उत्पादनात उच्चांकी वाढीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अन्नधान्यांचे एकूण उत्पादन सुमारे १६४७.०५ लाख टनांवर जाईल. हे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत ८९.३७ लाख टनांनी आणि खरीप उत्पादनाच्या सरासरीच्या १२४.५९ लाख टनांनी जास्त असेल. तांदूळ उत्पादन उच्चांकी म्हणजे ११९९.३४ लाख टन होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षापेक्षा ६६.७५ लाख टनांनी जास्त असेल. तर खरीप तांदूळ उत्पादनाच्या सरासरीपेक्षा ११४.८३ लाख टनांनी जास्त असेल. मका उत्पादन २४५.४१ लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे. तर पौष्टिक तृणधान्य (श्री अन्न) उत्पादन ३७८.१८ लाख टन होण्याचा अंदाज आहे. डाळींचे उत्पादन ६९.५४ लाख टन आणि तेलबियांचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत १५.८३ लाख टनांनी वाढून २५७.४५ लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे. भुईमुगाच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याचा अंदाज असून, १०३.६० लाख टन भुईमूग आणि १३३.६० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज आहे. देशात ४३९९.३० लाख टन उसाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा >>>विश्लेषण: ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’साठी इतका खर्च का?
देशातील महागाईची स्थितीची काय?
देशात महागाई सातत्याने वाढते आहे. ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई दर ६.२१ टक्क्यांवर पोहोचला होता. सप्टेंबर महिन्यात हा दर ५.५ टक्के होता. खाद्यपदार्थ, विशेषत: भाज्या आणि उत्पादित खाद्य वस्तूंच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या, ज्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार, उत्पादित खाद्य वस्तूंचा महागाई दर ९.६९ टक्क्यांवर पोहोचला, जो सप्टेंबर महिन्यात ८.३६ नोंदवला गेला. तर भाज्यांचा महागाई दर ४२.१८ टक्क्यांवर वर पोहोचला. हा दर सप्टेंबर महिन्यात ३५.९९ टक्के नोंदवण्यात आला. फळांचा महागाई दर वाढून सप्टेंबर महिन्यातील ७.६५ टक्क्यांवरून ८.४३ टक्क्यांवर पोहोचला. या शिवाय कडधान्यांच्या महागाई दरातही किंचित वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यातील ६.८४ टक्क्यांच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात हा दर ६.९४ टक्के नोंदवण्यात आला आहे. तसेच मांस आणि माशांच्या महागाई दरातही २.६६ टक्क्यांवरून ३.१७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
तांदूळ उत्पादनाचा सकारात्मक परिणाम?
तांदूळ उत्पादन उच्चांकी म्हणजे ११९९.३४ लाख टन होण्याचा अंदाज आहे. खरीप तांदूळ उत्पादन सरासरीपेक्षा ११४.८३ लाख टनांनी जास्त असेल. उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे पुढील वर्षभर तांदळाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहण्याचे अंदाज आहेत. बासमती, बिगर-बासमतीच्या उत्पादनातही चांगल्या वाढीचे अंदाज आहेत. केंद्र सरकार कल्याणकारी योजनांसाठी खरेदी करत असलेल्या कमी दर्जाच्या तांदळाच्या उत्पादनात वाढीचा अंदाज आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या तांदळाचे दर आवाक्यात राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. देशाच्या बहुतेक भागांत घराघरांत दररोज तांदूळ खाल्ला जात असल्यामुळे वाढीव तांदूळ उत्पादनाचा महागाईवर सकारात्मक परिणाम होण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा >>>नॉनव्हेज आहार, मानसिक छळ आणि एअर इंडियाच्या वैमानिक तरुणीची आत्महत्या; नेमकं प्रकरण काय?
तेलबियांचा वाढीव उत्पादन दिलासा?
तेलबियांचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत १५.८३ लाख टनांनी वाढून २५७.४५ लाख टनांवर जाण्याची शक्यता आहे. भुईमुगाच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याचा अंदाज असून, १०३.६० लाख टन भुईमूग आणि १३३.६० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज आहे. तेलबियांच्या वाढीव १५.८३ लाख टनांच्या उत्पादनामुळे देशांतर्गत खाद्यतेलाच्या उत्पादनातही सुमारे १० ते १२ लाख टनांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. पाण्याची चांगली उपलब्धता असल्यामुळे रब्बी हंगामात मोहरीच्या उत्पादनातही वाढ होण्याचा अंदाज आहे. तेलबियांचे एकूण उत्पादन ३८० ते ४०० लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील वर्षांत खाद्यतेलाची आयात दहा लाख टनांनी कमी होण्याचा अंदाज आहे, तसेच खाद्यतेलाचे दरही स्थिर राहण्याचा अंदाज द सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोशिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. भारत मेहता यांनी व्यक्त केला आहे.
भाज्या, फळांच्या महागाईत फार घट नाही?
अन्नधान्य, तेलबिया, कडधान्यांच्या उत्पादनात वाढीचा अंदाजामुळे महागाईपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी पालेभाज्या, फळभाज्या आणि फळांच्या महागाईबाबत तशी शक्यता नाही. हवामान बदलाचा पहिला आणि थेट परिणाम कांदा, बटाटा, टोमॅटोसह अन्य फळभाज्या, पालेभाज्यांवर होताना दिसत आहे. दिवसेंदिवस नैसर्गिक आपत्तींमध्येही वाढ होत आहे. फळबागा बहुवर्षिक असतात त्यामुळे त्यांच्या उत्पादनाचा अंदाज बांधता येतो. पण, भाज्यांची लागवड आणि काढणी तीन महिन्यांत पूर्ण होत असल्यामुळे शेतकरी हंगाम, तापमान, थंडी आणि पाण्याची उपलब्धता पाहून लागवड करतात, त्यामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचा अंदाज बांधणे कठीण असते. पण, हवामान बदलाचा परिणाम म्हणून भविष्यात पालेभाज्या, फळभाज्या आणि फळांच्या महागाईत वाढ होण्याची टांगती तलवार कायम राहणार आहे.
dattatray.jadhav@expressindia.com