भारतीय स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी शासकीय कार्यालये, संस्था तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणी देशात ठिकठिकाणी भारतीय ध्वज फडकवला जातो. या ध्वजारोहणाच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद साजरा केला जातो. दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर देशाचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. तसेच पंतप्रधान देशाला संबोधित करून भारताच्या आगामी वाटचालीबद्दल भाष्य करत असतात, म्हणूनच या कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. दरम्यान, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून दिल्लीतील लाल किल्ल्यावरच हा कार्यक्रम का पार पडतो? त्याचे कारण काय? लाल किल्ला आणि स्वातंत्र्य दिन यात काय संबंध? हे जाणून घेऊ या….
सत्तेच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम दिल्लीमध्येच
सत्तेच्या दृष्टीने दिल्ली आणि दिल्लीतील लाल किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४७ साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १६ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा भारताचा तिरंगा झेंडा फडकवला होता. सत्तेचे हस्तांतरण केल्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नेहरुंनी स्वत:ला प्रधान सेवक म्हटले होते. त्यानंतर प्रत्येक स्वातंत्र्य दिनाला पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते.
१२०६-१५०६ या काळात दिल्ली महत्त्वाचे सत्ताकेंद्र
स्वातंत्र्य दिन आणि दिल्लीतील लाल किल्ला हे एक समीकरण झाले आहे. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याला विशेष महत्त्व असते. कारण दिल्ली शहराकडे कायम एक सत्ताकेंद्र म्हणून पाहिले जाते. दिल्लीवर सत्ता म्हणजे देशावर सत्ता असे म्हटले जाते. त्यामुळे दिल्लीतील लाल किल्ल्याचे महत्त्व जाणून घेण्याआधी दिल्ली शहर सत्ताकेंद्र कसे बनले हे जाणून घेणे गरजेचे आहे. १२०६-१५०६ या काळात दिल्ली हे महत्त्वाचे सत्ताकेंद्र बनले. या शहराला तेव्हा राजधानीचा दर्जा देण्यात आला. या शहरातूनच उत्तर भारताच्या मोठ्या प्रदेशाचा कारभार हाकला जायचा.
शाहजहानच्या काळात दिल्ली पुन्हा राजधानी
बाबर राजाला (१४८३-१५३०) मुघल साम्राज्याचे संस्थापक म्हटले जाते. बाबरच्या काळात ‘दिल्ली म्हणजे पूर्ण हिंदूस्तानची राजधानी’, असे म्हटले जायचे. मात्र, अकबराने (१५४२-१६०५) काही काळासाठी मुघल साम्राज्याची राजधानी दिल्लीवरून आग्रा या शहरात हलवली होती. आग्रा शहराला राजधानीचा दर्जा दिला असला तरी, अकबराला मात्र दिल्लीचा शासक म्हणूनच ओळखले जायचे. पुढे शाहजहानने (१५९२-१६६६) ‘शाहजहानाबाद’ नावाचे शहर वसवले. याला जुनी दिल्ली म्हटले जाते. या शहराच्या स्थापनेसह शाहजहानच्या काळात पुन्हा एकदा दिल्ली मुघल साम्राज्याची राजधानी झाली. याच भागात लाल किल्ला आहे. लाल किल्ल्यावरून शाहजहानने पुढे १८५७ पर्यंत आपला राज्यकारभार हाकला. पुढे मुघलांचा प्रभाव कमी होत गेला. तरीदेखील मुघल दिल्लीशी निगडीत असल्यामुळे त्यांच्याकडे प्रतिकात्मकपणे भारताचे शासक म्हणूनच पाहिले गेले.
दिल्ली आणि मुघलांना महत्त्वाचे स्थान
याबाबत इतिहासकार स्वप्ना लिडल यांनी २०२१ साली ‘इंडियन एक्स्प्रेस’साठी एक लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी दिल्ली आणि मुघलांचे प्रतिकात्मक महत्त्व याबाबत सविस्तर सांगितले होते. “मुघलांचे राज्य आणि त्यांच्या राजाचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला. मात्र, त्यांचे प्रतिकात्मक महत्त्व कायम होते. याच कारणामुळे ईस्ट इंडिया कंपनीसह अनेक राज्ये मुघलांचे नाव वापरूनच राज्य करायचे. ईस्ट इंडिया कंपनी १९ व्या शतकापर्यंत मुघलांच्या नावाने नाणे काढायची”, असे लिडल यांनी सांगितले आहे. दिल्लीचे प्रतिकात्मक महत्त्व सांगायचे झाल्यास १८५७ सालच्या उठावाचे उदाहरण देता येईल. १८५७ सालचा उठाव झाल्यानंतर बंडखोरांनी थेट दिल्ली गाठली होती. तसेच वयोवृद्ध झालेल्या बहादूरशाह जफर (१७७५-१८६२) या मुघल शासकाला आपला राजा म्हणून घोषित केले होते.
स्वातंत्र्यसैनिकांनाही दिल्ली महत्त्वाचे सत्ताकेंद्र वाटायचे
त्या काळात ईस्ट इंडिया कंपनीला दिल्ली फारशी महत्त्वाची नव्हती. कारण दिल्लीमध्ये खूप कमी युरोपियन राहायचे. मात्र, तरीदेखील १८५७ च्या उठावातील स्वातंत्र्यसैनिकांना दिल्ली हे महत्त्वाचे शक्तीकेंद्र, सत्तास्थान वाटायचे. पुढे ईस्ट इंडिया कंपनीने दिल्ली काबीज केल्यानंतर १८५७ च्या उठावाचे भवितव्यही अंधकारमय झाले. दिल्ली काबीज केल्यानंतर ब्रिटिशांनी या शहराला (शाहजहानाबाद) उद्ध्वस्त करण्याचे ठरवले. मुघलांचे अस्तित्व जमेल त्या मार्गाने संपुष्टात आणण्यासाठी ब्रिटिशांनी हा निर्णय घेतला होता. याचाच एक भाग म्हणून ब्रिटिशांनी मुघलांनी बांधलेल्या अनेक इमारती नेस्तनाबूत केल्या. दर्यागंजमधील अकबराबादी मशीद, चांदनीचौक परिसरातील उर्दू बाजार हे यापैकीच एक होते.
ब्रिटिशांनी लाल किल्ल्याची केली होती नासधूस
ब्रिटिशांनी दिल्ली काबीज केल्यानंतर लाल किल्ल्याचीही मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. हा किल्ला पूर्णपणे नेस्तनाबूत केला नसला तरी ब्रिटिशांनी किल्ल्याचे सर्व वैभव हिरावून घेतले होते. ब्रिटिशांनी लाल किल्ल्यातील खजाना लुटला. तसेच किल्ल्यातील कलाकुसर नष्ट केली. ब्रिटिशांनी किल्ल्याच्या आतील संरचनादेखील आपल्या सोईनुसार बदलली होती. असे म्हटले जाते की, ब्रिटिशांनी लाल किल्ल्याच्या आतील ८० टक्के भाग उद्ध्वस्त करून टाकला होता. लाल किल्ल्याच्या आत ब्रिटिशांनी आपल्या सैन्याला राहण्यासाठी जागा तयार केली. तसेच या किल्ल्यातील ‘दिवान ए आम’मध्ये रुग्णालय उभारले होते.
दिल्लीचे महत्त्व कमी करण्याचा ब्रिटिशांचा प्रयत्न
१८५७ सालानंतर ब्रिटिशांनी दिल्लीचे महत्त्व मुद्दामहून कमी करण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील दिल्लीकडे कायमच सत्तेचे केंद्र म्हणून पाहण्यात आले. १९११ साली ब्रिटिशांनी आपली राजधानी दिल्लीहून कोलकात्याला हलवण्याचा निर्णय घेतला होता.
म्हणूनच नेहरूंनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले
मात्र, भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही वर्षांआधी दिल्लीचे आणि लाल किल्ल्याचे महत्त्व आणखी वाढायला लागले. याबाबत स्वप्ना लिडल यांनी लिहिले आहे. “ब्रिटिशांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आपल्या साम्राज्याचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. त्याच लाल किल्ल्यावरील सत्ता आपल्याकडे पुन्हा एकदा घेणे हे प्रतिकात्मकदृष्ट्या गरजेचे होते”, असे लिडल म्हणालेल्या आहेत. कदाचित याच कारणामुळे नेहरू यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आली हे दर्शवण्यासाठी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले होते.