दिल्लीत महाभयंकर पूरपरिस्थिती पाहायला मिळाली. या आठवड्यात यमुनेच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे ४५ वर्षांचे विक्रम मोडीत निघाले आहेत. दिल्लीची अनेक महत्त्वाची ठिकाणे जलमय झालेली पाहायला मिळाली. लाल किल्ल्यातही पाणी शिरले. यानिमित्ताने दिल्लीतील लाल किल्ल्याचे १९ व्या शतकातील एक चित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रामध्ये लाल किल्ला आणि सलीमगड किल्ल्याला यमुनेने वेढा घातल्याचे स्पष्ट दिसत आहे. हे चित्र मुघल शहर शाहजहानाबादचे असल्याचे सांगितले जाते. गुरुवारी (दि. १३ जुलै) यमुनेने लाल किल्ल्याला पुन्हा एकदा वेढा घातल्यानंतर जुन्या आणि नव्या फोटोची तुलना केली गेली.

नक्की काय घडले

यमुना नदी प्रदूषित पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याप्रमाणे आहे, अशी दिल्लीकरांची समज गेल्या काही वर्षांत झाली होती. मात्र, गुरुवारी यमुनेच्या पाणी पातळीत २०८.६६ मीटरची वाढ झाली आणि दिल्लीत कित्येक वर्षांनंतर सर्वात भीषण पूरपरिस्थिती ओढवली. १९७८ साली यमुनेने २०७.४९ मीटरची पातळी गाठली होती. तेव्हापासून दरवर्षी पाण्याच्या पातळीची नोंद ठेवण्यास सुरुवात झाली. दिल्लीत २०५.३३ मीटर ही धोक्याची पातळी मानली जाते. गुरुवारी पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर लाल किल्ल्याबाहेरील रिंग रोड पाण्याखाली गेला आणि खवळलेली यमुना लाल किल्ला आणि सलीमगड किल्ल्याच्या भिंतीवर सपासप आपटत होती. काश्मिरी गेट, सिव्हील लाइन्स, आयटीओ आणि राजघाटचा परिसर पुराच्या पाण्याखाली गेला.

Elphinstone Road Over Bridge
Elphinstone Bridge: मुंबईतील १२५ वर्ष जुना ब्रिटिशकालीन पूल पाडला जाणार; वाहतूक कोंडीमुळे हाल होणार?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
dilapidated, bridge, Mumbai, traffic ,
मुंबईतील आणखी एक पूल जीर्ण, पुनर्बांधणीसाठी वाहतूक बंद
12 TMC water to be released from Ujani Dam for Solapur Pandharpur
सोलापूर, पंढरपूरसाठी आणखी दोन आवर्तनांस मंजुरी; उजनीतून १२ टीएमसी पाणी सोडणार
thane creek bridge 3 loksatta news
ठाणे खाडी पूल ३ : दक्षिणेकडील मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात, फेब्रुवारीअखेरीस मार्गिका वाहतूक सेवेत
reconstruction of Bridge located between Mahim and Bandra stations successfully completed
माहीम-वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण
new pamban bridge
समुद्रात उभारलेला पंबनचा जुना पूल वर्षांनुवर्ष टिकला; नवीन पुलाचं आयुष्य ५८ वर्षच का?
landslide in left main canal of Tilari Dam
तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या कालव्याला भगदाड; त्यामुळे रस्ता, शेती, बागायतीमध्ये पाणी

१९७८ साली आलेल्या यमुनेच्या पुरामुळे रिंग रोड आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी निवासस्थाने पाण्याखाली गेली होती. मात्र, त्यावेळी आजच्या इतकी दाहक परिस्थिती नव्हती. पाण्याचा निचरा तुलनेने लवकर झाला होता. मात्र, मागच्या काही वर्षांमध्ये या परिसरात अक्षरधाम टेम्पल कॉम्प्लेक्स, कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेज, दिल्ली सचिवालय वापरत असलेली खेळाडूंची इमारत आणि इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमचे बांधकाम
झालेले आहे. त्याचा ताण पाण्याच्या प्रवाहावर आलेला दिसला.

हे वाचा >> चंदीगड आणि उत्तर भारतात मुसळधार पाऊस होण्याचे कारण काय?

किल्ला आणि नदी यांचे नाते

१५४६ साली शेर शाह सुरी याचा मुलगा सलीम शाह सुरी याने नदीच्या बेटावर सलीमगड किल्ल्याचे बांधकाम केले. यमुनेच्या प्रवाहाच्या पश्चिमेस १६४८ साली आता लाल किल्ला बांधण्यात आला होता. सध्या जे चित्र व्हायरल होत आहे, ते मझहर अली खान यांनी रंगवले होते. दिल्लीतील मुघल आणि मुघलांच्या आधीपासून दिल्लीत असलेल्या महत्त्वाच्या स्मारकांची १३० चित्रे मझहर अली खान यांनी रंगविली होती. वसाहतीचे प्रशासक चार्ल्स मेटकाल्फ यांनी मझहर अली खान यांना चित्र साकारण्याची जबाबदारी दिली होती. या चित्रामध्ये स्पष्ट दिसत आहे की, दोन्ही किल्ल्यांना एक पूल जोडत आहे आणि त्या पुलाखालून यमुना नदीच्या पाण्याचा प्रवाह वाहत आहे. हा पूल मुघल बहादूर शाह जफर यांनी बांधला होता.

शाहजहान यांच्या लाल किल्ल्याला एकूण १४ दरवाजे होते. पाण्याच्या मार्गावर असलेला किंवा थेट पाण्यात उघडणारा खिज्री दरवाजाही त्यापैकी एक होता. यापैकी दिल्ली गेट, काश्मिरी गेट, अजमेरी गेट, तुर्कमन गेट आणि निगमबोध गेट हे आता उरले आहेत. लाहोरी दरवाजा, काबुली दरवाजा, लाल दरवाजा आणि खिज्री दरवाजा आता राहिले नाहीत. लाल किल्ला बांधून पूर्ण झाल्यानंतर शाहजहान यांनी याच खिज्री दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केला होता. दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना नौकेत बसून यमुना नदी ओलांडावी लागली होती.

इतिहासकार, लेखिका राना सफ्वी यांनी त्यांच्या “शाहजहानाबाद : द लिविंग सिटी ऑफ ओल्ड दिल्ली” पुस्तकात लिहिले की, लाल किल्ल्याचे उद्घाटन करताना शाहजहान यांनी खिज्री दरवाजा ओलांडून आत प्रवेश केला होता. त्यावेळी किल्ल्यात जश्न-ए-महतबी साजरा केला गेला आणि किल्ल्यात दिव्यांची आकर्षक रोषणाई केली गेली. विशेष म्हणजे जवळपास २०० वर्षांनंतर जेव्हा ब्रिटिशांविरोधातील उठाव फसला, तेव्हा १७ सप्टेंबर १८५७ साली याच दरवाजातून शेवटचा मुघल शासक बहादूर शाह जफर याने रात्रीच्यावेळी पळ काढला होता. मुघलांचा लाल किल्ल्यातील प्रवेश आणि किल्ल्यातून काढलेला पळ एकाच दरवाजातून झाल्यामुळे इतिहासाचे एक चक्र पूर्ण झाले.

हे ही वाचा >> हवामान बदलामुळे जुलै महिन्यात पावसाचे थैमान? जाणून घ्या नेमके कारण काय?

किल्ले बांधण्यासाठी यमुना तट का निवडला?

यमुनेच्या तीरावर असलेल्या दोन्ही किल्ल्यांना नदीच्या पाण्याचा खूप उपयोग झाला. सलीमगड आणि लाल किल्ला बांधण्यासाठी मुद्दामहून नदीचा परिसर निवडण्यात आला होता. याची दोन कारणे होती. एकतर नदीमुळे किल्ल्याभोवती आयते कुंपण लाभले होते, ज्यामुळे किल्ल्याची सुरक्षा होत होती आणि दुसरे म्हणजे, किल्ल्याच्या परिसरात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी मुबलक पाणी मिळत होते. नदीभोवतीचे वातावरण आल्हाददायक असते, याचाही लाभ झाला. किल्ल्याच्या आतमध्ये जलवाहिन्या काढल्या होत्या, ज्याच्यासाठी नदीतूनच पाणी घेतले जात होते, अशी माहिती राना सफ्वी यांनी आपल्या पुस्तकात दिली.

काही दशकांपासून नदीने मार्ग बदलला

“लाल किल्ल्याभोवती यमुना नदीचा वेढा असल्यामुळे किल्ल्याची सुरक्षा करणे सोपे जात होते. मात्र, कालांतराने नदीने मुहम्मद शाह ‘रंगिला’ (कार्यकाळ १७१९-४८) यांच्या काळाच्या आसपास आपल्या चालीप्रमाणे प्रवाह बदलायला सुरुवात केली”, अशी माहिती लेखक आणि वारसा स्थळांचे अभ्यासक सोहेल हाश्मी यांनी दिली.

हाश्मी यांच्या मते १९११ साली ब्रिटिशांनी बंगालमधील राजधानी दिल्लीला हलविण्याचा निर्णय घेतला. दिल्लीतील कोरोनेशन पार्कवर पाचवे राजे जॉर्ज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. याच ठिकाणी नवी इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण तत्पूर्वी १९११ सालच्या पावसामध्ये कोरोनेशन पार्क – किंग्जवे कॅम्प परिसर, सिव्हिल लाईन्स आणि मॉडेल टाऊनचा परिसर पाण्याखाली गेला.

कोरोनेशन पार्क – किंग्जवे कॅम्पचा परिसर हा सतत पाण्याखाली येत असल्यामुळे राजधानीसाठी लागणाऱ्या इमारतींचे बांधकाम रायसीना हिल्सवर केले गेले, असेही हाश्मी यांनी सांगितले.

old delhi map
ब्रिटिशांनी १९११ साली हा नकाशा तयार केला होता. यात लाल वर्तुळ केलेला भाग दोन्ही किल्यामधील नदीचा प्रवाह असल्याचे दाखवत आहे. (Photo – Wikimedia Commons)

भारतीय भूपट्टा आणि मृदू माती

‘इंटाक’च्या (Indian National Trust for Art and Cultural Heritage) नैसर्गिक वारसा विभागाचे मुख्य संचालक मनु भटनागर म्हणाले की, देशाच्या उत्तर भागातील नद्यांचे प्रवाह बदलणे ही बाब असामान्य नाही. भूपट्ट विवर्तनाची (Indian Tectonic Plate) हालचाल हे नदीचा प्रवाह बदलण्यासाठी महत्त्वाचे कारण मानले जाते.

भारतीय भूपट्टा हा उत्तरेकडे सरकत असल्यामुळे हिमालयाची उंची वाढत आहे. (हिमालय सर्वात तरुण पर्वत असल्याचे त्यामुळेच म्हटले जाते. ही प्रक्रिया हजारो वर्षांपासून सुरू असून त्याच्यातील बदल हे अतिशय सूक्ष्म असतात) भूपट्टा सरकत असल्यामुळे यमुनेचा प्रवाह पूर्वेच्या दिशेला वळत असल्याचे भटनागर यांनी सांगितले. यामुळे उत्तर भारतातील गाळाच्या प्रदेशात (पुराच्या पाण्याने वाहून आणलेल्या मातीने बनलेला प्रदेश) नदीचा मार्ग बदलण्याची शक्यता जास्त असते.

गाळाच्या मातीचा प्रदेश हा नदीचा प्रवाह बदलण्यासाठी अतिशय सुलभ असतो. भटनागर म्हणाले की, गंगा नदीच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास, १७८६ साल आणि आजची तुलना केल्यास गंगा नदीच्या प्रवाहाने ३४ किमीचा मार्ग बदलला आहे. उत्तर प्रदेशमधील बदाऊ येथून गंगा नदी पूर्वी जिथे वाहत होती, तिथून १० किलोमीटर अंतरावर सध्या वाहत आहे. उत्तरेत अनेक ठिकाणी नदीचा घाट दिसतो, पण तिथे आता नदी दिसत नाही. खरंतर जगभरात आपल्याला नदीच्या वर बांधलेले जुने पूल दिसू शकतील, पण त्या ठिकाणी आता नदी वाहत नसल्याचे दिसते.

पूर्वी ज्या ठिकाणी यमुना नदीचा प्रवाह वेढा देऊन वाहत होता, त्या ठिकाणी आता रिंग रोड बांधलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बहादूर शाह जफर यांनी बांधलेला पूल आणि त्यानंतर ब्रिटिशांनी बांधलेल्या रेल्वे मार्गावरील पुलाच्या खांबांना व्यवस्थित आकार दिलेला आहे. या खांबांना नदीचे पाणी धडकून त्याचे नुकसान होऊ नये, अशा पद्धतीने त्याचे बांधकाम केले गेले होते, अशीही माहिती भटनागर यांनी दिली.

Story img Loader