China’s Red Princess: इतिहास हा केवळ राजवटींचा वा युद्धांचा दस्तावेज नसतो, तर तो मानवी संस्कृतीचा, सौंदर्यदृष्टीचा आणि श्रद्धांचा प्रवासही असतो. अनेकदा हा प्रवास शब्दांतून मांडता येतो, पण काही वेळा मातीच्या गर्भातून उगम पावलेले पुरावे इतिहासातील अनभिज्ञ पैलूंना उजाळा देतात. असाच एक अद्भुत आणि गूढ पुरावा रेड प्रिन्सेसच्या रूपात चीनमधील झिनजियांग भागात प्राचीन रेशीम मार्गावर उघडकीस आला आहे. ही केवळ एका तरुण स्त्रीची कथा नाही, तर ती सौंदर्य आणि श्रद्धेचं प्रतीक असलेल्या लाल रंगाच्या सिनेबारने रंगवलेल्या दातांतून प्रकटणारी प्राचीन विश्वाची कहाणी आहे. तिच्या अस्तित्त्वामुळे रंग, रसायन आणि धार्मिकता यांचा गुंता सौंदर्यशास्त्राशी एकरूप झाल्याची प्रचिती येते. सिनेबारसारख्या दुर्मिळ खनिजाच्या रूपाने झालेल्या व्यापाराच्या इतिहासावरही प्रकाश पडतो. या एका स्त्रीच्या थडग्यातून मिळालेले संकेत आपल्याला त्या काळातील प्रचलित सौंदर्यधारणांचा, व्यापारी संबंधांचा आणि विविध संस्कृतींतील देवाणघेवाणीचा नव्याने विचार करायला लावतात. ‘रेड प्रिन्सेस’ हा केवळ पुरातत्त्वीय शोध नसून ती एक संस्कृतींच्या संगमातून उगम पावलेली थक्क करणारी कहाणी आहे.
प्राचीन रेशीम मार्गावर सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एका तरुण स्त्रीचे अवशेष अभ्यासकांनी उघडकीस आणले आहेत. या स्त्रीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे दात सिनेबार या लाल रंगाच्या विषारी खनिजाने रंगवलेले होते. याचमुळे तिचे नाव रेड प्रिन्सेस ठेवण्यात आले. हा शोध केवळ तिच्या शारीरिक अवशेषांपुरता मर्यादित न राहता, त्या काळातील सौंदर्यदृष्टी, धार्मिक विधी, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि व्यापाराच्या व्याप्तीचा महत्त्वपूर्ण पुरावा ठरतो.
रेड प्रिन्सेसचा शोध
रेड प्रिन्सेसचा शोध चीनमधील झिनजियांग प्रांतात स्थित शेंगजिनदियान स्मशानभूमीत लागला. झिनजियांग हे ठिकाण प्राचीन रेशीम मार्गाच्या मध्यवर्ती भागात असून अनेक संस्कृतींच्या संयोगाचे केंद्र होते. २००० च्या दशकाच्या मध्यात पुरातत्त्वज्ञांनी या थडग्याचा शोध घेतला आणि त्यात चार व्यक्तींचे अवशेष सापडले. त्यामध्ये एक बालकही होते. पण त्यातील एक २० ते २५ वर्षांची स्त्री सर्वात वेगळी ठरली. तिचे दात चांगल्या अवस्थेत होते आणि विशेष म्हणजे तिच्या दातांवर सिनेबारचा लाल रंग स्पष्ट दिसत होता.
सिनेबारचा वापर का केला गेला असावा?
या असामान्य दात रंगवण्यामागे काय कारण असावे, याबाबत विविध सिद्धांत मांडले गेले आहेत. प्राचीन चीनमध्ये लाल रंग हा सौंदर्याचे, समृद्धीचे आणि सुदैवाचे प्रतीक मानला जात असे. त्यामुळे सिनेबारचा वापर धार्मिक किंवा आध्यात्मिक हेतूने एखाद्या विधीसाठी किंवा मृत्यूनंतरच्या जीवनाशी संबंधित श्रद्धांमध्ये केला गेला असावा, अशी शक्यता आहे. दुसरा सिद्धांत सौंदर्याशी संबंधित आहे. दात लाल रंगवणे हे त्या काळात सौंदर्याचे किंवा प्रतिष्ठेचे लक्षण असावे. अनेक संस्कृतींमध्ये (विशेषतः आग्नेय आशियात) दातांमध्ये बदल करणे, दात गडद रंगात रंगवणे, सजवणे ही प्रतिष्ठेची आणि सौंदर्याची निशाणी मानली जात होती. रेड प्रिन्सेसच्या कबरीत सापडलेल्या रेशीम, मातीच्या कलात्मक भांड्यांपासून मौल्यवान धातूंच्या वस्तूंवरून तिचा सामाजिक दर्जा उच्च होता, हे स्पष्ट होते. त्यामुळे तिचे लाल दात हे सौंदर्य, फॅशन किंवा उच्चवर्गीय ओळखीचे प्रतिक असण्याची शक्यता आहे.
सौंदर्य आणि विज्ञान यामागील रसायनशास्त्र
जिलिन विद्यापीठातील शास्त्रज्ञ सेन यू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या संशोधनात या दातांवर सिनेबारचे अस्तित्व स्पष्ट झाले. Raman spectroscopy (रामन स्पेक्ट्रोस्कोपी) आणि X-ray fluorescence सारख्या आधुनिक वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून सिनेबारचे अंश स्पष्टपणे ओळखण्यात आले. तसेच Fourier Transform Infrared (FTIR) spectroscopy च्या साहाय्याने असे आढळले की, त्या लाल रंगाला चिकटवून ठेवण्यासाठी एखादे प्रथिनयुक्त बाइंडर वापरण्यात आले होते. हे दर्शवते की, त्या काळातील लोकांना रासायनिक प्रक्रियांबाबत प्राथमिक तरीही प्रभावी ज्ञान होते आणि सौंदर्य किंवा विधीसाठी ते अत्यंत जाणीवपूर्वक वापर करत असावेत.
सिनेबारचे दुर्लभ स्वरूप आणि व्यापारी नेटवर्क
या शोधात अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सिनेबार हे खनिज स्थानिक पातळीवर उपलब्ध नव्हते. हे मुख्यतः मध्य चीन किंवा युरोपसारख्या दूरच्या भागांतून मिळवले जात असे. म्हणजेच रेड प्रिन्सेस किंवा तिच्या समाजाला अशा दुर्मिळ संसाधनांबद्दल माहिती होती. ही गोष्ट त्या समाजाचा व्यापारी संबंध आणि त्यांच्या जीवनमानाची उंची दर्शवते. ते केवळ स्थानिक समाज नव्हते, तर संपूर्ण आशिया खंडात (आणि कदाचित त्याहीपलीकडे) व्यापारी दुवे असलेल्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे लोक होते.
रेशीम मार्ग: केवळ व्यापार नव्हे, तर संस्कृतींचा प्रवाह
रेड प्रिन्सेसच्या कबरीत सिनेबारचा शोध ही केवळ एक पुरातत्त्वीय घटना नाही, तर ती सिल्क रोडच्या व्यापक महत्त्वाची आठवण करून देते. हा मार्ग केवळ वस्तूंच्या देवाणघेवाणीपुरता मर्यादित नव्हता, तर विचार, श्रद्धा, सौंदर्यदृष्टी आणि सामाजिक परंपरांचाही वाहक होता. सिनेबारसारख्या दुर्मिळ आणि विषारी खनिजाचा व्यापार आणि वापर हे त्या काळातील उच्चभ्रू, वैश्विक दृष्टिकोन असलेल्या समाजांचे प्रतिबिंब होते. “सिनेबारचा भौगोलिक प्रसार आणि त्याचा उपयोग करणाऱ्यांची ओळख लक्षात घेतली, तर या कबरीतील व्यक्तीची सामाजिक ओळख अपवादात्मक असावी,” असे या संशोधन पथकाने नमूद केले आहे. रेड प्रिन्सेस ही केवळ एका स्त्रीची कथा नाही, तर ती प्राचीन जगाच्या सौंदर्यशास्त्र, श्रद्धा, व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचा थक्क करणारा पुरावा आहे.